दोघीही १७ वर्षांच्या, दोघीही गरोदर. दोघी इतक्या खळखळून हसतात, नजर खाली ही आईवडलांची शिकवण विसरूनच जातात. पुढे काय या विचाराने मात्र दोघीही भयभीत झालेल्या आहेत.
सलिमा परवीन आणि अस्मा खातून (नावं बदलली आहेत) गेल्या वर्षी सातवीत शिकत होत्या. गावातली सरकारी शाळा २०२० च्या संपूर्ण शैक्षणिक वर्षात बंदच होती. टाळेबंदी शिथिल व्हायला लागली तसं पटणा, दिल्ली आणि मुंबईला काम करणारी त्यांच्या कुटुंबातली पुरुष मंडळी घरी म्हणजेच बिहारच्या अरारिया जिल्ह्यातल्या बंगाली टोला नावाच्या वस्तीवर परतायला लागली. आणि त्यानंतर लग्नं जुळायला सुरुवात झाली.
“करोना में हुई शादी,” दोघींमधली थोडी जास्त बडबडी असणारी अस्मा सांगते. “माझं लग्न करोनामध्ये झालंय.”
सलिमाचा निकाह दोन वर्षं आधीच झाला होता आणि साधारण १८ वर्षांची झाल्यावर गौना होणार होता म्हणजेच ती नांदायला जाणार होती. मग टाळेबंदी लागली. आणि त्यांच्याच वस्तीवर राहणारा शिलाईकाम करणारा तिचा २० वर्षांचा नवरा आणि त्याच्या घरचे तिला नांदायला घेऊन जातो म्हणून मागे लागले. त्याला काही काम नव्हतं, तो घरीच होता. घरातली इतर पुरुष मंडळी देखील घरी होती. कामाला दोन हात आले तर बरंच होणार होतं.
अस्माला तर मनाची तयारी करायला एवढा वेळ पण मिळाला नाही. २०१९ साली तिची मोठी बहीण कर्करोगाने वारली आणि गेल्या वर्षी जून महिन्यात तिच्या मेव्हण्याने टाळेबंदीच्या काळात अस्माशी लग्न करायचं असा आग्रह धरला. जून २०२० मध्ये निकाह झाला.
मूल कसं जन्माला येतं हे दोघींनाही माहित नाहीये. “आई या गोष्टी काही समजावून सांगत नाही,” अस्माची आई रुखसाना सांगते. मुलींचं हसणं सुरूच असतं. “लाज की बात है.” सगळ्यांचं मत काय तर ही आणि इतरही माहिती देणारी योग्य व्यक्ती म्हणजे नवरीची वहिनी. पण अस्मा आणि सलिमा नणंदा भावजया आहेत आणि दोघींपैकी कुणीच गरोदरपण किंवा बाळंतपणाविषयी सल्ला देऊ शकत नाही.










