"कोरोना आल्यापासून कोचियाने [मध्यस्थ] आमच्या गावी येणंच बंद केलंय," जमुना बाई मांडवी सांगतात. "तो टोपल्या घ्यायला शेवटचा आला त्याला पण तीन आठवडे होऊन गेलेत. म्हणून आम्हाला आता ना काही विकता येत, आणि पैसा नाही त्यामुळे ना काही विकत घेता येत."
चार मुलांची आई असणाऱ्या जमुना बाई विधवा आहेत. धमतरी जिल्ह्यातील नागरी तालुक्यातील कौहाबहारा गावात त्या राहतात. अंदाजे चाळिशीच्या असलेल्या जमुना कमार आदिवासी आहेत. गृह मंत्रालयाच्या सूचीनुसार ही जमात छत्तीसगडमधील विशेष बिकट स्थितीतील आदिवासी समूहात (पी.व्ही.टी.जी.) मोडते. गावाच्या या भागात त्यांच्यासारखी आणखी ३६ कमार कुटुंबं राहतात. त्यांच्यासारखंच सगळे जण भोवतालच्या जंगलातून बांबू गोळा करून आणि टोपल्या विणून उदरनिर्वाह करतात.
त्या ज्या 'कोचिया' बद्दल बोलत आहेत, तो जमुना बाई आणि इतर विणकरांसाठी फार मोलाचा आहे. हे मध्यस्थ, किंवा व्यापारी, दर आठवड्यात टोपल्या विकत घ्यायला गावात येतात, नंतर त्या टोपल्या शहरातल्या तसंच गावातल्या आठवडी बाजारात विकतात.
कौहाबहाराला तो शेवटच्या आला त्याला लवकरच महिना उलटेल - कोविड-१९ टाळेबंदी सुरु झाल्यापासून त्यांनी येणं बंद केलंय.
जमुना यांना चार मुली आहेत - लालेश्वरी, वय १२, जिने इयत्ता ५ वी नंतर शाळा सोडली, तुलेश्वरी, वय ८, लीला, वय ६ आणि लक्ष्मी, वय ४. त्यांचे पती सियाराम चार वर्षांपूर्वी अतिसाराने मृत्यूमुखी पडले. जमुना व मुली आता जगण्याच्या निर्दय लढा लढतायत. लॉकडाऊनमुळे केवळ टोपल्यांमधल्या नाही, तर इतर ठिकाणहून मिळणाऱ्या कमाईवरसुद्धा परिणाम झालाय.
जंगलात मोहाच्या फुलांना [महुआ] (ज्यांची स्थानिक दारू बनवण्यात येते) बहर आलाय –खडतर काळात आदिवासींसाठी हे उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन असतं.






