घरचे लोक सारखे फोन करून बरं आहे का ते विचारतायत असं सोमा कडाली सांगतात. "आरं, नका काळजी करू," असं म्हणत ८५ वर्षांचे सोमा त्यांची समजूत काढतात.
अकोले तालुक्यातल्या वरणघुशी गावचे हे आजोबा अहमदनगरच्या अकोले ते लोणी या दरम्यान निघालेल्या मोर्चासाठी आले आहेत. "माझं सगळं आयुष्य शेतात गेलंय," आपण या मोर्चात का आलो आहोत तेच जणू सोमा सांगतात. वयाचा बिलकुल अडसर नाही.
डोक्यावर २.५ लाखांचं कर्ज असलेले सोमा म्हणतात, "सत्तर वर्षं शेतात राबल्यावर पण शेतीचं काही सुधरणार नाही असं वाटलं नव्हतं." सोमा महादेव कोळी आहेत. गावी त्यांची पाच एकर जमीन आहे. सध्या वातावरण इतकं लहरी झालंय तसं या आधी कधी पाहिलं नसल्याचं ते सांगतात.
"मला सांधेदुखी आहे. चाललं की गुडघे दुखतात. सकाळी उठुशी वाटत नाही. तरीसुद्धा चालत जाणार," ते म्हणतात.












