माझा दहावीचा निकाल होता. निकाल लागेपर्यंत माझी अवस्था क्रिकेटच्या बॉलसारखी झाली होती. सगळ्यांचं लक्ष बॉलवर असतं. आता चौका जातो का छक्का? सगळे फक्त चेंडूकडे बघत असतात. मी नापास झाली असती तर? तर माझ्या बाबानी लगेच माझं लग्न लावून दिलं असतं.
२९ जुलैला दहावीचा निकाल लागला. मला ७९.६०% मिळाले. शाळेत माझा तिसरा नंबर फक्त एका पॉईंटने निसटला. आमच्या नाथजोगी समाजात आतापर्यंत एकही मुलगी दहावी पास झाली नाहीये. या वर्षी आमच्या समाजाच्या आणखी तिघी जणी परीक्षेत पास झाल्या.
मी नाव खुर्द [ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा] नावाच्या छोट्या गावी राहते. आमच्या गावात फक्त आमच्याच समाजाचे लोक राहतात. आमचे लोक इथून पुणे, मुंबई, नागपूरला जाऊन भीक मागायचं काम करतात. माझ्या आई-बाबासारखे बाकी काही जण आजूबाजूच्या गावात मजुरीला जातात.
माझे आई-बाबा – भाऊलाल साहेबराव सोळंके, वय ४५ आणि आई द्रौपदा सोळंके, वय ३६ – शेतात मजुरीला जातात. गहू, ज्वारी, कपास किंवा सोयाबीनचं काम असतं. आठ तासाच्या मजुरीचे प्रत्येकी २०० रुपये मिळतात. सध्या कसं सगळेच काम शोधून राहिलेत आणि कामं नाहीत नं, त्यामुळे त्यांना महिन्याला कसं तरी करून १०-१२ दिवसांचं काम मिळतं.
माझ्या बाबानी पाचवीत शाळा सोडली आणि तो मजुरी करायला लागला. माझ्या दोघी बहिणी आहेत मोठ्या. रुक्मा, वय २४ कधीच शाळेला गेली नाही आणि नीना, वय २२ पाचवी शिकली. दोघींची आता लग्नं झालीत. शाळा सुटली तशी त्या मजुरीच करतायत. माझा भाऊ, देवलाल २० वर्षांचा आहे. तो पण मजुरी करतो. त्यानी नववीत शाळा सोडली. मी दहा वर्षांची झाली ना तेव्हा बाबा म्हणाला, “तू पण आता कामाला जात जा. नको जाऊ शाळेत.” तो एकटाच नाही, शाळेत जाताना रोज मला गावातली काकू भेटते. एक दिवस रागावून ती बोललीः “तुझ्या बहिणी नाय शिकल्या, तू काहून शिकू र्हायली? शिकूनशनी तुला का नोकरी लागणारे का?”









