राधाच्या धाडसाची किंमत तिच्या कुत्र्यांना मोजावी लागली. एकाला लंगडा केला, दुसऱ्याला विष घातलं, तिसरा बेपत्ता झाला आणि चौथ्याला तिच्या डोळ्यांदेखत मारून टाकलं. "माझ्यावर अत्याचार केला त्यासाठी गावातले चार मोठे लोक जेलमध्ये आहेत," ती म्हणते. "मी बलात्काराचा खटला मिटवला नाही म्हणून ते माझा रागराग करतात."
त्या चार पुरुषांनी राधावर (नाव बदललं आहे) बलात्कार केला त्या घटनेला आता सहा वर्षं झालीत. ती आपल्या गावाहून - शहरापासून सुमारे १०० किमी दूर – बीडला चालली होती तेव्हा एका खासगी गाडीच्या चालकाने तिला लिफ्ट देण्याच्या नावाखाली तिचं अपहरण केलं. नंतर त्याने त्याच गावातल्या आपल्या तीन मित्रांसोबत तिच्यावर बलात्कार केला.
"त्यानंतर बरेच आठवडे मी धक्क्यात होते," ४० वर्षीय राधा सांगते. "मी त्यांना कायद्याने शिक्षा द्यायचं ठरवलं, आणि पोलिसात तक्रार केली."
तिच्यावर बलात्कार झाला तेव्हा राधा बीड शहरात राहत होती, नवरा आणि मुलांसोबत. "माझा नवरा तिथे एका फायनान्स एजन्सीत कामाला होता. मी अधनंमधनं गावाकडे जाऊन शेतीकडे लक्ष द्यायची," ती म्हणते.
तक्रार दाखल केल्यावर राधावर खटला मागे घेण्यासाठी खूप दबाव आला. गुन्हेगार आणि त्यांच्या नातेवाईकांची ग्राम पंचायत आणि गावातील बड्या प्रस्थांशी सोयरीक असल्याचं ती सांगते. "माझ्यावर दबाव आणत होते. पण मी गावापासून लांबवर राहत होते. शहरात लोक पाठीशी होते. मला थोडं सुरक्षित वाटत होतं, जरा धीर येत होता."
मात्र, मार्च २०२० मध्ये कोविड-१९ चा उद्रेक झाला आणि जणू तिचं सुरक्षा कवच गळून पडलं. देशव्यापी टाळेबंदी जाहीर होताच तिचा नवरा मनोज (नाव बदललं आहे) आपली नोकरी गमावून बसला. "त्यांना १०,००० पगार होता," राधा सांगते. "आम्ही एका भाड्याच्या फ्लॅट मध्ये राहत होतो, पण मनोजची नोकरी गेल्यावर आम्ही भाडं देऊ शकत नव्हतो. जगणं मुश्किल झालं होतं."
दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नसल्याने राधा, मनोज आणि त्यांची मुलं मुकाट्यानं गावाकडे राहायला आली – त्याच गावात जिथे राधावर बलात्कार झाला. "इथं आमची तीन एकर जमीन आहे, म्हणून आम्ही राहायला आलो. दुसरं काहीही सुचत नव्हतं," ती म्हणते. हे कुटुंब आता आपल्या जमिनीवर एका झोपडीत राहतं आणि राधा तिथे कापूस आणि ज्वारीचं पीक घेते.
राधा गावात राहायला आली तोच गुन्हेगारांच्या कुटुंबांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. "केस चालू होती. ती मागे घ्यायला खूप दबाव आणत होते," ती म्हणते. पण तिने खटला मागे घ्यायला नकार दिला, तेव्हा दबावाऐवजी तिला थेट धमक्या येऊ लागल्या. "गावात मी त्यांच्या डोळ्यासमोर होते. मला धमकावणं, छळणं सोपं झालं," राधा म्हणते. मात्र, तिने माघार घेतली नाही.




