जवळातल्या जवळ आरोग्य सेवा मिळण्याची शक्यता असलेल्या दवाखान्यात जायचं तर धरणाच्या जलाशयात सुरू असणारी बोट पकडून दोन तासांचा प्रवास करावा लागणार. नाही तर पर्याय म्हणजे उंच डोंगररांगांमधून अर्धवट बांधलेल्या रस्त्याने प्रवास करून जायचं.
प्रबा गोलोरीचा नववा महिना भरलाय आणि बाळंतपण कधीही होऊ शकतं.
दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मी कोटागुडा पाड्यावर पोचले तेव्हा प्रबाच्या शेजारपाजारची मंडळी तिच्या झोपडीभोवती जमली होती. मूल काही जगायचं नाही असंच त्यांना वाटत होतं.
३५ वर्षांच्या प्रबाचा पहिला मुलगा तीन महिन्यांचा होऊन वारला. तिची मुलगी आता सहा वर्षांची आहे. गावातल्या सुइणींच्या मदतीने तिची दोन्ही बाळंतपणं घरीच पार पडली होती, फार काही त्रासही झाला नव्हता. पण या खेपेला मात्र सुइणी जरा खळखळ करत होत्या. त्यांच्या लक्षात आलं होतं की हे बाळंतपण अवघड जाणार आहे.
मी जवळच्याच एका गावात वार्तांकनासाठी गेले होते तेव्हाच फोन वाजला. माझ्या मित्राची मोटरसायकल घेऊन (डोंगरातल्या वाटांवर माझी नेहमीची स्कूटी काही उपयोगाची नव्हती), मी कोटागुडाला पोचले. ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातला हा जेमतेम ६० लोकांचा पाडा.
चित्रकोंडा तालुक्यातल्या या गावी पोचणं खडतरच आहे. सोबत मध्य भारतातल्या आदिवासी पट्ट्यातल्या इतर गावांप्रमाणे इथे देखील राज्याचं सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये कायमच संघर्ष सुरू आहे. इथे अनेक ठिकाणी रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा अपुऱ्या आणि विरळ आहेत.
कोटागुडात जी मोजकी घरं आहेत ते सगळे परोजा आदिवासी आहेत. घरी खाण्यापुरती हळद, आलं, डाळी आणि भात अशी पिकं ते घेतात. आणि तिथे येऊन खरेदी करणाऱ्या गिऱ्हाइकांसाठी इतर काही पिकं.
पाच किलोमीटरवरचं प्राथमिक आरोग्य केंद्र इथून जवळ आहे मात्र तिथे नियमितपणे डॉक्टर येत नाहीत. त्यात टाळेबंदीमध्ये हे केंद्र बंद झालं आणि तेव्हाच ऑगस्ट, २०२० मध्ये प्रबाच्या बाळंतपणाची तारीख जवळ आली होती. कुडुमुळुगुमो गावातलं सामुदायिक आरोग्य केंद्र इथून १०० किलोमीटरवर. त्यात या खेपेला प्रबाला शस्त्रक्रियेची गरज भासू शकते ज्याची सोय त्या केंद्रातही नाही.
त्यामुळे ४० किलोमीटरवरचं चित्रकोंडातलं उप-विभागीय रुग्णालय हा एकमेव पर्याय हाती होता. पण चित्रकोंडा-बालिमेला जलाशयातल्या बोटी संध्याकाळ झाल्यानंतर सुरू नसतात. आणि उंच डोंगरातल्या रस्त्याने जायचं तर मोटारसायकल किंवा पायी जाण्याशिवाय पर्याय नाही – आणि हे दोन्ही पर्याय दिवस भरलेल्या प्रबासाठी बिलकुलच योग्य नव्हते.
मलकानगिरीच्या जिल्हा मुख्यालयात माझ्या ओळखीचे काही लोक होते त्यांची मदत घेण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनी मला सांगितलं की इतक्या खराब रस्त्याने अँब्युलन्स पाठवणं अवघड होतं. जिल्हा रुग्णालयाची पाण्यावर चालणारी अँब्युलन्स होती पण टाळेबंदीमुळे तीसुद्धा येऊ शकणार नव्हती.
मग मी गावातल्या आशा कार्यकर्तीला खाजगी पिक-अपमधून सोबत येण्याची विनंती केली. १,२०० रुपये खर्च येणार होता आणि ती देखील दुसऱ्या दिवशी येऊ शकणार होती.
आम्ही निघालो. रस्त्याचं काम सुरू असलेल्या एका पट्ट्यात, चढावर ती गाडी बंद पडली. तेवढ्यात आम्हाला सीमा सुरक्षा दलाचा एक ट्रॅक्टर दिसला. जळण शोधण्यासाठी ते आले असावेत. आम्ही त्यांना मदत करण्याची विनंती केली. त्यांनी डोंगरमाथ्यावर सीमा सुरक्षा दलाचा तळ आहे, तिथे आम्हाला नेलं. हंतलगुडाच्या या तळावरच्या कर्मचाऱ्यांनी वाहनाची सोय केली आणि प्रबाला चित्रकोंडाच्या उप-विभागीय रुग्णालयात पोचवण्याची व्यवस्था केली.
तिथे रुग्णालयाच्या लोकांनी सांगितलं की तिला मलकामगिरीला न्यावं लागेल, म्हणजे आणखी ६० किलोमीटरचा प्रवास. त्यासाठी गाडीची सोय करायला त्यांनी मदत केली.
आम्ही उशीरा दुपारी जिल्हा रुग्णालयात पोचलो. मी घाईघाईने कोटागुडाला गेले त्याला एक दिवस उलटून गेला होता.
तिथे, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी वेणा सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत होते आणि तीन दिवस प्रबाने कळा सहन केल्या. अखेर आम्हाला सांगण्या आलं की सिझेरियन करावं लागेल.
१५ ऑगस्टचा दिवस होता. दुपारच्या वेळी प्रबाचा मुलगा जन्माला आला – जन्माच्या वेळी त्याचं वजन छान तीन किलो भरलं. पण डॉक्टर म्हणाले की त्याला गुदद्वारच नाहीये आणि लगेचच्या लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल. पण त्यासाठी मलकानगिरीच्या रुग्णालयात पुरेशा सुविधाच उपलब्ध नव्हत्या.
नवजात बाळाला १५० किलोमीटरवरच्या कोरापुटमधल्या नव्या आणि जास्त सुविधा असणाऱ्या शहीद लक्ष्मण नायक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल.
बाळाचा बाबा, पोडू गोलोरी पूर्णपणे खचून गेला होता, आई अजून शुद्धीवर यायची होती. म्हणून मग आशा कार्यकर्ती (जी खाजगी गाडीतून कोटागुडा पाड्यावरून सोबत आली होती) आणि मी बाळाला घेऊन कोरापुटला निघालो. १५ ऑगस्ट, संध्याकाळचे ६ वाजले होते.
आम्ही रुग्णालयाच्या अँब्युलन्सने निघालो. तीन किलोमीटर गेलो नाही तर ती बंद पडली. आम्ही दुसरी गाडी बोलावली ती ३० किलोमीटर गेल्यावर बंद पडली. घनदाट जंगलात, मुसळधार पावसात आम्ही अँब्युलन्सची वाट पाहत होतो. अखेर आम्ही मध्यरात्री, टाळेबंद कोरापुटला पोचलो.
तिथे डॉक्टरांनी बाळाला सात दिवस निरीक्षणाखाली अतिदक्षता विभागात ठेवलं. दरम्यानच्या काळात आम्ही प्रबा आणि पोडू यांना कोरापुटला घेऊन आलो. बाळंतपणानंतर एक आठवडा उलटल्यावर तिने आपल्या बाळाचा चेहरा पाहिला. आणि मग त्यानंतर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की इतक्या छोट्या बाळावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या सुविधा आणि कौशल्य त्यांच्यापाशी नाही.
आता बाळाला आणखी एका हॉस्पिटलला न्यावं लागणार होतं. आणि ते होतं ७०० किलोमीटरवर असलेलं एमकेसीजी महाविद्यालय आणि रुग्णालय, बेरहामपूर. आम्ही परत एकदा अँब्युलनसच्या प्रतीक्षेत आणि आणखी एका लांबच्या प्रवासासाठी सज्ज झालो.
आता सरकारी दवाखान्यातून अँब्युलन्स आली पण हा सगळा भाग संवेदनशील असल्यामुळे आम्हाला ५०० रुपये द्यावे लागले. (मी आणि माझ्या मित्र-मंडळींनी सगळा खर्च केला – या सगळ्या प्रवासांवर मिळून आमचे ३,०००-४,००० रुपये तरी खर्च झाले असतील). बेहरामपूरच्या हॉस्पिटलला पोचायला आम्हाला १२ तास तरी लागल्याचं माझ्या स्मरणात आहे.
तिथे पोचेपर्यंत आम्ही चार वेगवेगळ्या दवाखान्यांच्या वाऱ्या केल्या होत्या त्याही व्हॅन, ट्रॅक्टर, वेगवेगळ्या अँब्युलन्स आणि बसने. चित्रकोंडा, मलकानगिरी, कोरापुट आणि बेरहामपूर – १००० किलोमीटरचा प्रवास झाला होता.
ही शस्त्रक्रिया अवघड असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. बाळाच्या फुफ्फुसांनाही इजा झाली होती आणि काही भाग काढून टाकावा लागणार होता. मळ बाहेर काढण्यासाठी पोटामध्ये एक भोक करण्यात आलं. गुदद्वाराची जागा तयार करण्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया गरजेची होती. पण बाळाचं वजन आठ किलो भरेपर्यंत ती करता येणार नव्हती.
माझं या कुटुंबाशी शेवटचं बोलणं झालं, तोपर्यंत तरी वजनात तितकी वाढ झाली नव्हती. त्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया अजूनही व्हायचीच आहे.
इतकी सगळी दिव्यं पार पाडल्यानंतर या बाळाचा जन्म झाला. त्यानंतर महिनाभराने त्याच्या बारशासाठी मला बोलावलं होतं. मी त्याचं नाव ठेवलं मृत्यूंजय. १५ ऑगस्ट २०२० – भारताचा स्वातंत्र्यदिन. त्याने स्वतःचं भाग्य त्या दिवशी स्वतः लिहिलं आणि आपल्या आईप्रमाणे तोही यात विजयी झाला.
*****
प्रबाचा हा सगळा प्रवास जरा जास्तच खडतर ठरला असला तरी मलकानगिरी जिल्ह्याच्या अनेक दुर्गम आदिवासी पाड्यांवर, आरोग्यसेवांची आणि पायाभूत सुविधांची वानवा असल्यामुळे अशा संकटाला तोंड देणं इथल्या बायांना नवीन नाही.
मलकानगिरीच्या १,०५५ गावांमध्ये ५७ टक्के लोक परोजा आणि कोया आदिवासी आहेत. या समूहांची संस्कृती, परंपरा आणि इथली नैसर्गिक संसाधनं याचे गोडवे कायमच गायले जात असले तरी त्यांच्या आरोग्याच्या गरजा मात्र बहुतेक वेळा दुर्लक्षितच राहतात. इथली भौगोलिक स्थिती – डोंगररांगा, जंगलं आणि जलाशय – शिवाय अनेक वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आणि शासनाचं दुर्लक्ष यामुळे इथल्या गाव-पाड्यांवर जीवदायी सेवा सुविधांपर्यंत पोचणं मुश्किल आहे.
मलकानगिरी जिल्ह्यातल्या किमान १५० गावांना रस्ताच नाहीये (संपूर्ण ओडिशामध्ये रस्ता नसलेल्या गावांची संख्या १,२४२ असल्याचं पंचायती राज व पेय जल मंत्री प्रताप जेना यांनी १८ फेब्रुवारी २०२० रोजी विधानसभेत माहिती देताना सांगितलं).
यातलंच एक आहे टेंटापल्ली, कोटागुडाहून दोन किलोमीटरवर असलेल्या या पाड्यालाही रस्ता नाही. “बाबू, आमचं आयुष्य असं चोहीकडून पाण्याने वेढलेलं आहे. आम्ही जिवंत आहोत का मेलोय, कुणाला फरक पडतो?” ७० वर्षांच्या कमला खिल्लो म्हणतात. त्यांचं सारं आयुष्य टेंटापल्लीमध्ये गेलंय. “आयुष्याचा बहुतेक सारा काळ फक्त हे पाणी पाहण्यात गेलाय. बाया आणि पोरींचं जिणं यानेच अवघड केलंय.”
इतर गावांना जायचं असेल तर धरणक्षेत्रातील जोडाम्बु पंचायतीतल्या टेंटापल्ली, कोटागुडा आणि इतर तीन पाड्यावरच्या लोकांना मोटरबोटीने दीड ते चार तासाचा प्रवास करावा लागतो. ४० किलोमीटरवर असलेल्या चित्रकोंडाच्या दवाखान्यात जाण्यासाठी बोटीचा पर्याय सगळ्यात बरा. १०० किलोमीटरवरच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी इथल्या लोकांना आधी बोटीने आणि त्यानंतर बस किंवा शेअर जीपने प्रवास करावा लागतो.
जलसंसाधन विभागाची मोटर लाँच सेवा बेभरवशाची आहे. वारंवार आणि पूर्वसूचना न देताच ही बंद पडते. आणि या बोटी केवळ एकच खेप करतात. खाजगी पॉवर बोट २० रुपये तिकिट घेते, सरकारी बोटीपेक्षा दहा पट जास्त. पण ती देखील संध्याकाळनंतर बंद असते. त्यामुळे, अचानक काही झालं तर वाहतूक ही मोठं दिव्यच ठरतं.
“आधारचं काम असो किंवा डॉक्टरचं, आम्हाला याच्याशिवाय [प्रवासाची साधनं] दुसरा पर्याय नाही आणि म्हणूनच अनेक बाया बाळंतपणासाठी दवाखान्यात जायला खळखळ करतात,” कोटागुडाची कुसुम नारिया सांगते. २० वर्षांच्या कुसुमला तीन लेकरं आहेत.
पण आता आशा कार्यकर्त्या या पाड्यांवर यायला लागल्या आहेत, त्या सांगतात. पण इथे काम करणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना फारसा अनुभव किंवा माहिती नाही. त्या महिन्यातले दोन दिवस येतात आणि गरोदर बायांना लोह, फॉलिक ॲसिड आणि कोरडा शिधा देऊन जातात. मुलांच्या लसीकरणाच्या नोंदी थोड्या ठेवल्या आहेत, थोड्या नाही. कधी कधी, बाळंतपण अवघड आहे असं वाटलं तर त्या गरोदर बाईबरोबर दवाखान्यात जातात.
इथल्या गावांमध्ये नियमित बैठका किंवा जाणीवजागृतीचे कार्यक्रम होत नाहीत, किशोरवयीन मुली आणि बायांसोबत आरोग्याच्या प्रश्नांवर चर्चा होत नाहीत. शाळेमध्ये आशा कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित करावेत अशी अपेक्षा असली तरी इथे हे होत नाहीत कारण कोटागुडामध्ये शाळाच नाही (टेंटापल्लीमध्ये मात्र एक शाळा आहे, पण शिक्षक कधी तिथे फारसे फिरकतच नाहीत) आणि अंगणवाडीची इमारत अर्धवट बांधून तशीच पडून आहे.
या भागात आशा असलेल्या जमुना खारा सांगतात की जोडाम्बोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त साध्या आजारांवर इलाज होतात, गरोदर बायांसाठी किंवा काही गुंतागुंत झाली असली तर तिथे काहीच सेवा उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्या आणि इतर आशा चित्रकोंडाच्या सामुदायिक आरोग्य केंद्रात जाणं पसंत करतात. “पण ते फार लांब आहे आणि जायला धड रस्ता देखील नाही. बोटीचा प्रवास धोकादायक असतो. सरकारी लाँच नेहमी चालू नसते. त्यामुळे वर्षानुवर्षं आम्ही दाईमावरच अवलंबून आहोत.”
टेंटापल्लीच्या परोजा आदिवासी असणाऱ्या सामरी खिल्लो दुजोरा देतातः “मेडिकलपेक्षा आमचा दाईमावर जास्त विश्वास आहे. माझी तिन्ही बाळंतपणं गावातल्या दाईनेच केलीयेत – आमच्या गावात तिघी जणी आहेत.”
आसपासच्या १५ गावांतल्या बाया बोढकी डोकरीवरच अवलंबून आहेत – इथल्या देसिया भाषेत दाई किंवा सुईण. “आमच्यासाठी त्या वरदान आहेत. त्यांच्यामुळे आम्ही दवाखान्यात न जाता आम्ही सुखरुप बाळंत होऊ शकतो,” सामरी सांगतात. “आमच्यासाठी त्याच डॉक्टर आहेत आणि त्याच देवासमान. त्या पण बायाच आहेत त्यामुळे त्यांना आमचा त्रास समजतो - ‘पुरुषांना कळतच नाही की आम्हाला देखील मन असतं आणि आम्हालाही वेदना होतात. त्यांना वाटतं की आमचा जन्म पोरं जन्माला घालण्यासाठीच झालाय.”
इथल्या सुइणी ज्या बायकांना दिवस जात नाहीत त्यांना काही झाडपाल्याची औषधं देतात. त्याचा प्रभाव झाला नाही तर त्यांचे नवरे दुसरं लग्न करतात.
कुसुम नरियाचं १३ व्या वर्षी लग्न झालं आणि विशी येईपर्यंत तिला तीन मुलं देखील झाली. ती सांगते की तिला मासिक पाळीबद्दलही काही माहित नव्हतं. गर्भनिरोधकं तर लांबची गोष्ट. “मी लहानच होते, मला काहीही माहित नव्हतं,” ती म्हणते. “पण जेव्हा ती [पाळी] आली तेव्हा आईने कपडा वापरायला सांगितला आणि मी मोठी झालीये असं सांगत फटक्यात माझं लग्न करून टाकलं. मला शरीर संबंध म्हणजे काय तेही माहित नव्हतं. माझ्या पहिल्या बाळंतपणात तो मला एकटीला दवाखान्यात सोडून गेला, बाळ जगलं का वाचलं त्याची त्याला फिकीर नव्हती – मुलगी झाली होती ना. पण माझी लेक जगली.”
कुसुमला नंतर दोन मुलं झाली. “मी लगेच दुसरं मूल नको असं म्हटलं तर मला मारहाण झाली कारण सगळ्यांनाच मुलगा पाहिजे होता. मला किंवा माझ्या नवऱ्याला दवाई [गर्भनिरोधक] बद्दल काहीच माहित नव्हतं. माहित असतं, तर असे हाल झाले नसते. पण मी विरोध केला असता, तर त्यांनी मला हाकलून दिलं असतं.”
कुसुमाच्या घरापासून प्रबाचं घर अगदी हाकेच्या अंतरावर. त्या दिवशी ती मला म्हणालीः “मी जिवंत आहे, यावरच माझा विश्वास बसत नाहीये. तेव्हा जे काही होत होतं ते मी कसं सहन केलं कुणास ठाऊक. मला भयंकर वेदना होत होत्या. माझे हाल बघून माझा भाऊ रडायला लागला होता. आणि मग या दवाखान्यातून त्या दवाखान्यात, आणि मग हे बाळं झालं तरी त्याला आठवडाभर पाहता आलं नव्हतं. पण आम्ही सगळ्या घाटी पोरी आहोत आणि आमचं सगळ्याचं जिणं हे असंच असतं.”
मृत्यूंजयला जन्माला घालताना प्रभाला जे दिव्य पार करावं लागलं आणि इथल्या गावांमधल्या अनेकींच्या कहाण्या, भारतातल्या आदिवासी क्षेत्रांमध्ये बाया कशा बाळंत होतात ते सगळंच विलक्षण आहे. पण इथे आमच्या मलकानगिरीमध्ये काय होतंय याची कुणाला तरी फिकीर आहे का?
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया
[email protected]
शी संपर्क साधा आणि
[email protected]
ला सीसी करा
अनुवादः मेधा काळे