कांता भिसेंची मुलगी जग सोडून गेली त्याला पाच वर्षं होऊन गेलीयेत. आज त्या तिच्याबद्दल बोलतायत कारण त्यांच्या मनात संताप आहे. “आमच्या गरिबीने आमची लेक नेली,” कांता म्हणतात. २० जानेवारी २०१६ रोजी त्यांच्या मुलीने, मोहिनी भिसे हिने आपलं आयुष्यं संपवलं होतं.
मृत्यूसमयी मोहिनी १८ वर्षांची होती, बारावीची विद्यार्थिनी. “बारावीनंतर तिला शिकविण्याची काही आमची ऐपत नव्हती. म्हणून तिचं लग्न लावून द्यावं म्हणून आम्ही पाहुणे हुडकायलो होतो,” ४२ वर्षीय कांता सांगतात. त्या लातूर जिल्ह्याच्या भिसे वाघोली गावच्या रहिवासी आहेत.
लग्न म्हणजे खर्च आला. त्यामुळे कांता आणि त्यांचे पती पांडुरंग, वय ४५, काळजीत होते. “आम्ही दोघं शेतात मजुरीला जाताव. मोहिनीच्या लग्नासाठी पैसा उभा करणं काही आमच्याच्याने हुईल असं काही वाटेना गेलतं. त्या टायमाला १ लाख हुंडा सुरू होता.”
या दोघांवर आधीच एका खाजगी सावकाराचं अडीच लाखांचं कर्ज होतं, महिना ५ टक्के व्याजाने घेतलेलं. २०१३ साली त्यांच्या थोरल्या मुलीच्या, अश्विनीच्या लग्नासाठी हे कर्ज काढलेलं होतं. मोहिनीच्या लग्नासाठी जमीन विकण्याशिवाय दुसरा काही पर्याय दिसत नव्हता – जमिनीचे २ लाख तरी आले असते.
भिसे वाघोलीत त्यांची एकरभर पडक जमीन होती. “पाणी नाही अन् आमच्या भागात कायमचाच दुष्काळ,” कांता सांगतात. २०१६ साली दुसऱ्याच्या रानात मजुरीला गेलं तर कांतांना १५० तर पांडुरंग यांना ३०० रुपये रोज मिळत होता. दोघांत मिळून महिन्याला दोन-अडीच हजारांची कमाई होत होती.



