“पूर्वी जसं होतं, तसं चित्र आता नाही. आज कोणकोणत्या गर्भनिरोधक पद्धती उपलब्ध आहेत ते बायकांना माहितीये,” सलाह खातून सांगतात. विटा-मातीचं काम असलेल्या आपल्या घराच्या व्हरांड्यात उन्हात त्या उभ्या आहेत. भिंतींना समुद्री हिरवा रंग दिलाय.
त्या गेल्या दहा वर्षांच्या आपल्या अनुभवाच्या आधारावर हे सांगतायत. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या हसनपूर गावात सलाह आणि त्यांच्या भाच्याची बायको, शमा परवीन कुटुंब नियोजन आणि मासिक पाळीदरम्यान घेण्याच्या काळजीबद्दल सल्ला देतायत. अधिकृत नाही तरी अनौपचारिकपणे त्यांच्यावर हे काम सोपवलं गेलंय.
बाया बऱ्याच वेळा त्यांच्याकडे त्यांच्या शंका घेऊन येतात. गर्भनिरोधकांबद्दल प्रश्न असतात, ती हवी असतात किंवा पाळणा कसा लांबवायचा, पुढची लसीकरणाची फेरी कधी आहे अशी माहिती त्यांना हवी असते. आणि काही जणी गर्भनिरोधक इंजेक्शन घ्यायलाही येतात. गुपचुप.
त्यांच्या छोट्याशा दवाखान्यात, शमाच्या घरातल्या कोपऱ्यातल्या एका खोलीत कप्प्यांमध्ये छोट्या कुप्या आणि औषधांच्या गोळ्या ठेवलेल्या आहेत. चाळिशी पार केलेल्या शमा आणि पन्नाशी पार केलेल्या सलाह स्नायूत द्यायचं हे इंजेक्शन देतात. दोघींपैकी कुणीच प्रशिक्षित नर्स नाही. “कधी कधी बाया एकट्याच येतात. इंजेक्शन घेतात आणि आल्या पावली परत जातात. त्यांच्या घरच्या कुणाला काही कळायचा संबंधच नाही,” सलाह सांगतात. “बाकीच्या आपले पती किंवा नात्यातल्या महिलांसोबत येतात.”
गेल्या दहा वर्षांतला हा फारच लक्षणीय फरक आहे. फुलपारस तालुक्यातल्या सैनी ग्राम पंचायती अंतर्गत येणाऱ्या २५०० लोकसंख्येच्या हसनपूर गावातले रहिवासी तेव्हा कुटुंब नियोजनाची फारशी साधनंच वापरत नव्हते.
हा बदल झाला तरी कसा? “यह अंदर की बात है,” शमा म्हणतात.







