मदुरै जिल्ह्यातील तृतीयपंथी लोककलावंतांसाठी वर्षाचे पहिले सहा महिने कळीचे असतात. या काळात गावात जत्रा आणि मंदिरांत सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. पण टाळेबंदी दरम्यान मोठ्या सार्वजनिक समारंभांवर प्रतिबंध आल्यामुळे तमिळनाडूतील जवळपास ५०० तृतीयपंथी महिला कलावंतांना प्रचंड नुकसान झालंय.
मागी ही अशीच एक कलावंत आहे. मदुरै शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेलं विलंगुडी येथील तिचं दोन खोल्यांचं घर हे इतर तृतीयपंथी महिलांसाठी एकत्र जमायची आणि विसाव्याची जागा आहे. पेरणीनंतर बीज अंकुरलं की त्याचा सोहळा म्हणून पारंपरिक कुम्मी पाटू गाणी सादर करणाऱ्या तृतीयपंथी महिला या जिल्ह्यात आहेत. त्यातलीच एक आहे मागी. तमिळनाडूत जुलै महिन्यात होणाऱ्या दहा दिवसांच्या मुलैपारी उत्सवादरम्यान पाऊस, जमिनीची सुपीकता आणि चांगलं पीक यावं म्हणून या गाण्यातून गावदेवीची प्रार्थना केली जाते.
तिच्या सगळ्या मैत्रिणी आणि सोबतिणी या गाण्यांवर ठेका धरतात. बराच काळ त्यांच्यासाठी हे एक उत्पन्नाचं साधन होतं. पण महामारीमुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जुलै २०२० आणि यंदाच्या महिन्यातही हा उत्सव साजरा करण्यात आला नाही. (पाहा: मदुरैतील तृतीयपंथी लोककलावंतांची व्यथा) आणि त्यांचं नेहमीचं उत्पन्नाचं साधन – मदुरै किंवा अगदी बेंगळुरूमध्ये आजूबाजूच्या दुकानांत जाऊन बाजार मागणं – देखील ठप्प झालं. त्यामुळे टाळेबंदी दरम्यान महिन्याची कमाई रू. ८,००० ते रू. १०,००० वरून चक्क शून्यावर आली.







