वर्ष होतं १९९७.
महिलांच्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धा सुरू होत्या आणि अंतिम सामन्यात पश्चिम बंगाल आणि मणिपूरची लढत होणार होती. दर वर्षी होणाऱ्या आंतर राज्य स्पर्धांमध्ये गेली तीन वर्षं बंगालला मणिपूरकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण तरीही आपल्या पिवळ्या आणि मरुन रंगाच्या जर्सीमध्ये महिलांचा हा संघ नेटाने सामन्यासाठी सज्ज झाला होता. पश्चिम बंगालच्या हलदियामध्ये दुर्गाचाक स्टेडियममधला हा सामना बंदना पालसाठी घरच्या मैदानावरचा सामना होता.
शिट्टी झाली आणि खेळ सुरू झाला.
या आधी उप-उपांत्य सामन्यामध्ये १६ वर्षांच्या बंदनाने सलग तीन गोल केले होते आणि आपल्या संघाला गोव्याविरुद्ध विजय मिळवून दिला होता. “उपांत्य सामना पंजाबविरुद्ध होता. पण माझा पाय प्रचंड दुखत होता. त्या दिवशी आमचा संघ जिंकला आणि अंतिम सामन्यात गेला पण मला पायावर उभं देखील राहता येत नव्हतं.”
पश्चिम बंगालची सर्वात तरुण खेळाडू असलेली पाल स्पर्धेचा अंतिम सामना बाकड्यावरूनच पाहत होती. सामना संपायला काही मिनिटं राहिली होती आणि कोणत्याच टीमने गोल केला नव्हता. पश्चिम बंगालच्या प्रशिक्षक शांती मलिक अगदी नाखूष होत्या. त्यांची चिंता वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री त्या दिवशी उपस्थित होते. मलिक आल्या आणि त्यांनी पालला तयार व्हायला सांगितलं. “‘माझी हालत पहा एकदा,” मी त्यांना सांगितलं. पण कोच म्हणाल्या, ‘तू गेलीस तर गोल होणार नक्की. माझं मन मला सांगतंय’,” बोनी सांगतो.
मग वेदना तात्काळ थांबाव्या यासाठी दोन इंजेक्शन आणि घोट्याला क्रेप बँडेज घट्ट बांधून खेळासाठी बंदना सज्ज झाली. मॅचमध्ये एकही गोल झाला नाही आणि एक्स्ट्रा टाइम सुरू झाला. ज्या कुठल्या टीमचा गोल होणार ती विजयी.
“मी क्रॉसबारचा निशाणा साधत बॉल मारला आणि तो स्विंग होऊन उजवीकडे गेला. गोलकीपरने उडी मारली. पण तिला पार करून बॉल मागे गेला आणि जाळ्यात पोचला.”





















