“चले जाव आंदोलनादरम्यान तुमचे पती, बैद्यनाथ १३ महिने तुरुंगात होते. तुमच्यासाठी सगळं अवघड झालं असेल तेव्हा. नाही का?” पुरुलियामध्ये मी भबानी महातोंना विचारलं. “एवढं मोठं कुटुंब आणि बाकी सगळं काम...”
“ते आले ना की जास्त अवघड व्हायच्या गोष्टी,” थंडपणे पण ठासून त्या सांगतात. “ते आले की त्यांच्यासोबत मित्रांचा गोतावळा आणि मग त्यांच्यासाठी स्वयंपाक करा. ते डबे घेऊन जाणार. कधी ५, कधी १० तर कधी २०. एक क्षण विश्रांती म्हणून नसायची.”
“पण खरंच, चले जाव आंदोलनात तुमचा सहभाग...”
“कसला डोंबलाचा सहभाग? माझा तसल्या कशाशीच काय संबंध?” त्या विचारतात. “त्या लढ्याशी माझं काहीही देणंघेणं नाही. माझे पती बैद्यनाथ महातो, त्यांचंच काय ते तसलं चालायचं. माझा सगळा वेळ हे भलं थोरलं कुटुंब सांभाळण्यात, तेवढ्या लोकांसाठी रांधा वाढा, उष्टी काढा करण्यात जात होता. किती स्वयंपाक करायला लागायचा – दररोज वाढतच जायचं सगळं काम!” भबानी सांगतात. “शेती मीच पाहत होते, लक्षात घ्या.”
आम्ही एकदमच नाराज झालो. आणि ती नाराजी बहुतेक आमच्या चेहऱ्यांवर दिसली असावी. पश्चिम बंगालच्या एकदम दुर्गम भागात लांबचा प्रवास करून आम्ही अद्याप हयात असलेल्या काही स्वातंत्र्य सैनिकांच्या शोधात इथे पोचलो होतो. मनबझार ब्लॉक I मधल्या चेपुआ गावात आमच्या समोर बसलेल्या भबानी महातो त्यासाठी एकदमच योग्य व्यक्ती होत्या. पण भारताच्या ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामाशी आपला तीळमात्रही संबंध नसल्याचं त्या स्पष्ट सांगत होत्या.
१०१ ते १०४ वयाच्या भबानी महातो अगदी स्पष्टपणे आणि ठामपणे बोलतात. कितीही प्रयत्न केला तरी इतक्या दूरवरच्या गावपाड्यातल्या म्हाताऱ्या माणसांचं वय नक्की किती ते सांगणं हे फार खडतर काम असतं. त्या जन्मल्या तेव्हा म्हणजेच शंभरेक वर्षांपूर्वी तर ही यंत्रणाच नव्हती. पण आम्ही काही तर करून त्यांच्या वयाचा अंदाज बांधला. आता हयात नसलेल्या त्यांच्या पतींच्या काही नोंदी तसंच त्यांच्या प्रचंड मोठ्या गोतावळ्यावरून, एक मुलगाच आता सत्तरीत आहे त्यावरून. आणि आम्ही पुरुलियाच्या ज्या भागात फिरत होतो तिथल्या त्यांच्याहून वयाने थोड्या लहान असलेल्या समवयस्कांच्या वयावरूनही.
भबानींच्या पिढीतल्या लोकांची वयं ज्या ढिसाळ पद्धतीने आधारच्या कुचकामी यंत्रणेमध्ये नोंदवण्यात येतात त्यापेक्षा आमचा अंदाजच जास्त विश्वासार्ह होता. आधारवर त्यांचं जन्म वर्ष १९२५ असं नोंदवलं गेलंय. म्हणजे त्या ९७ वर्षांच्या होतात.
त्यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे त्या १०४ वर्षांच्या आहेत.









