“आम्ही आमचा दसहरा नाच सादर करणार आहोत,” इतवारी राम मच्छिया बैगा सांगतात. “हा दसऱ्याला सुरू होतो आणि त्यानंतर पुढचे तीन चार महिने, फेब्रुवारी-मार्चपर्यंत सुरू राहतो. दसरा साजरा केल्यानंतर आम्ही आमच्या बैगा लोकांच्या गावांना जातो आणि रात्रभर नाचतो,” छत्तीसगड बैगा समाज या संघटनेचे अध्यक्ष असलेले इतवारी राम सांगतात.
साठी पार केलेले इतवारी राम शेती करतात आणि कबीरधाम जिल्ह्याच्या पंडरिया तालुक्यातल्या अमनिया गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या मेळ्यातल्या इतरांसोबत ते राज्य शासनाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय आदिवासी नृत्य उत्सवाच सामील होण्यासाठी रायपूरला आले आहेत.
बैगा समुदायाचा समावेश विशेश बिकट स्थिती जगणाऱ्या आदिवासी समूहांमध्ये केला जातो. छत्तीसगडमध्ये असे सात आदिवासी समूह आहेत. मध्य प्रदेशातही बैगांची वस्ती आहे.


