दक्षिण कन्नड जिल्ह्याच्या बेळतांगडी तालुक्यातल्या डोंगरदऱ्यांमध्ये आजकाल गाईच्या गळ्यातल्या घंटांची टणटण क्वचितच कानावर पडते. “आता या घंटा कुणीच बनविना गेलंय,” हुकरप्पा सांगतात. पण ही काही साधीसुधी घंटा नाही बरं. त्यांच्या गावात, शिबाजेमध्ये गुरांच्या गळ्यातल्या घंटा धातूच्या नसतात. त्या बांबूपासून बनतात, हाताने. आणि साठी पार केलेले, सुपारीची शेती करणारे हुकरप्पा गेली किती तर वर्षं या अनोख्या घंटा तयार करतायत.
“मी पूर्वी गुरामागे जायचो,” हुकरप्पा सांगतात. “कधी कधी गायी कुठे तरी हरवायच्या. तेव्हा आमच्या डोक्यात कल्पना आली की त्यांच्या गळ्यात बांबूच्या घंटा करून घालाव्या.” घंटांच्या आवाजावरून डोंगरदऱ्यात वाट चुकलेल्या किंवा दुसऱ्याच्या पिकात तोंड घालायला गेलेल्या गायी शोधायला सोपं जाईल. मग गावातल्या एका जाणत्या माणसाने त्यांना ही घंटा करायची कला शिकवली आणि मग हुकरप्पा स्वतः घंटा बनवायला लागले. आणि लवकरच ते वेगवेगळ्या आकाराच्या घंटा बनवण्यात अगदी तरबेज झाले. बांबू दारातच होता त्यामुळे तीही अडचण नव्हती. त्यांचं गाव, बेळतांगडी कुद्रेमुख अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात आहे. पश्चिम घाटाच्या कर्नाटक प्रांतातल्या या भागात तीन प्रकारचे बांबू आढळतात.
हुकरप्पा तुळू बोलतात. या भाषेत बांबूच्या या घंटेला ‘बोम्का’ म्हणतात. कन्नडमध्ये तिला ‘मोंटे’ म्हणतात. शिबाजेमध्ये या घंटेचं विशेष स्थान आहे. इथल्या दुर्गा परमेश्वरीच्या देवळात देवीला या घंटा वाहण्याची परंपरा आहे. देवळाच्या आवारालाही इथे मोंटेतड्का म्हणतात. आपल्या गायीगुरांवर लक्ष राहू दे म्हणून लोक देवीला नवस बोलतात आणि हुकरप्पांकडून घंटा बनवून घेतात. “लोक नवस फेडण्यासाठी या घंटा बनवून घेतात. समजा, एखादी गाय गाभण राहत नसेल तर मग देवीला घंटा वाहतात,” ते सांगतात. “एका घंटेचे ५० रुपये देतात. आणि मोठी घंटा असेल तर ७०.”


