२०१४ साली ओदिशाच्या बिस्समकटक तालुक्यातल्या वन खात्याचा एक अधिकारी कांधुगुडा गावी गेला, गावकरी आणि वनखात्यामध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा करण्यासाठी. बैठकीला सगळ्या बाया आलेल्या पाहून आणि त्यातल्या वयस्कांनी घेतलेला पुढाकार पाहून कदाचित तो विस्मयचकित झाला असावा. भारतातल्या इतर कोणत्याही गावामध्ये कदाचित त्याची गाठ सभेसाठी आलेल्या बहुतेक सगळ्या पुरुष मंडळींशी आणि पुरुष सरपंचाशी गाठ पडली असती.
पण
इथे, रायगडा जिल्ह्यामधल्या सर्वाधिक संख्या असणाऱ्या कोंध जमातीमध्ये मात्र
(लोकसंख्याः ९,६७,९११, ज्यामध्ये ५,४१,९०५ अनुसूचित जमातीचे आहेत), महत्त्वाचे सगळे
निर्णय बाया घेतात. वारसा हक्क पुरुषाकडूनच पुढे जात असला तरी या जमातीत बाया आणि
गड्यांची आयुष्यं समान असावीत यावर भर देण्यात आला आहे. नियामगिरीच्या करंदीगुडा
गावातल्या ६५ वर्षीय लोकोनाथ नाउरी यांनी सांगितल्याप्रमाणे, “तिथे डोंगरात
राहणारा नियाम राजा (नियामगिरीचा देव) पुरुष तर इथली आमची गावदेवता [गावाच्या
वेशीपाशी उभं केलेलं लाकडी देवक] बाई आहे. या दोघांच्या अस्तित्वामुळेच आमची
भरभराट होतीये. या दोघांपैकी कुणालाही जरी इजा झाली तरी मानवी जीवनच संपून जाईल.”
कोंध
आदिवासींमध्ये या तत्त्वाला धरूनच कामाची विभागणी केलेली आहे. गावाचा कारभार
पाहणाऱ्या कुटुंब या संस्थेमध्ये बाया समान पातळीवर सहभाग घेतात आणि त्यांची मतं
मांडतात. पुरुष शिकारीला जातात, शेती करतात मात्र समुदायाचं बाकी सगळं जग मात्र या
बायाच चालवतात.
कांधुगुडामध्येही बायांनी अगदी हेच केलं. गावकऱ्यांनी (१९८० च्या दशकातली सामाजिक वनीकरण योजनेची कुख्यात देणगी असणाऱ्या) निलगिरीच्या लागवडीला विरोध केला कारण एक तर हे झाड स्थानिक परिसंस्थेचा भाग नाही आणि मानव किंवा प्राण्यांना या झाडांचा फारसा काही फायदाही नाही. गावकऱ्यांनी सातत्याने अशी लागवड बंद पाडल्यानंतर अधिकारी गावात आले. या समाजात स्त्रियांचा दर्जा काय आहे याची काहीच कल्पना नसणाऱ्या अधिकाऱ्यांनी उपदेशाचे डोस पाजायला आणि गावकऱ्यांनी असाच विरोध चालू ठेवला तर त्याचे परिणाम गंभीर होतील अशा धमक्या द्यायला सुरुवात केली.
दोन
ज्येष्ठ स्त्रिया, सिंगारी कुंगारुका आणि कोसा कुंगारुका यांनी त्यांना समजावून
सांगण्याचा प्रयत्न केला की त्या झाडं लावण्याच्या विरोधात नव्हत्या, त्यांचं
इतकंच म्हणणं होतं की माणसाच्या आणि पशुपक्ष्यांच्या फायद्याची झाडं लावली जावीत.
कोसा सांगतात की अधिकाऱ्यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि उलट त्यांना धमकावलं. हे फार
होतंय असं त्यांच्या लक्षात आलं आणि तेव्हाच त्या सांगतात, त्यांनी त्या
अधिकाऱ्याला फटकावून काढलं.
तो अधिकारी पळून गेला, त्याचं म्हणणं होतं, त्या धोकादायक आहेत. दुसऱ्या दिवशी गाडीभरून पोलिस गावात आले. कांधुगुडा आणि आसपासच्या गावातली पुरुष मंडळी बायांच्या साथीने उभी राहिली. हा सगळा विरोध पाहून पोलिसांनी माघार घेतली आणि परिणामी, गेलं वर्षभर इथे शांतता नांदत आहे.
शक्यतो, इथे एक गाव म्हणे २०-२५ घरांचा समुदाय किंवा कुटुंब. सगळे जण निर्णयप्रक्रियेत सहभाग घेतात किंवा त्यांचं काही मत असेल तर मांडतात. कोणीच एक नेता नसतो आणि मांडलेल्या मुद्द्यात काही तथ्य असेल किंवा बहुमत तेच असेल तर तो मान्य केला जातो.
आंदोलनं
असोत किंवा आयुष्यं, रायगडाच्या या बायाच केंद्रस्थानी असतात. आपला लग्नाचा
जोडीदार निवडायचं त्यांना स्वातंत्र्य असतं आणि जर का नवऱ्याने बायकोचा छळ केला
किंवा ती दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडली तर तिला कोणत्याही भीतीशिवाय किंवा
दूषणांशिवाय नवऱ्याला सोडून जाता येतं. घरी हिंसा झाली किंवा वादावादी झाली तर
कुटुंब हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतं मात्र नवऱ्यासोबत रहायचं का सोडून जायचं
याचा निर्णय मात्र सर्वस्वी त्या बाईचाच असतो.
या
भागात दुभाष्याचं काम करणाऱ्या जगनाथ मांझींना एक प्रसंग आठवतो. अगदी तरूण असताना
ते एकदा रानातली खोप शाकारण्यासाठी जंगलात पानं गोळा करायला गेले होते. वन
खात्याच्या रक्षकांनी त्यांना पकडलं आणि पोलिस स्टेशनला नेऊन दावा केला की ते
बेकायदेशीर काम करत होते. मांझींची आई संतापली आणि त्यांनी सगळा गाव गोळा करून
पोलिस ठाण्यासमोर धरणं धरलं. मुलाला सोडत नाही तोपर्यंत त्यांनी पोलिसांशी वाद
घालणं थांबवलं नाही.
गाव शाश्वत बनवण्यामध्येही या बायांची भूमिका फार मोलाची आहे आणि यातूनच त्यांना समाजात काय पत आहे हे लक्षात येतं. घराघरात संवाद असावा आणि समूह म्हणून एकत्र आयुष्य जगता यावं या पद्धतीने गावाची रचना करण्यात येते. काही वर्षांपूर्वी शासनाने इंदिरा आवास योजनेअंतर्गत पक्क्या घरकुलांची योजना गावात आणली. शासनाच्या योजनेप्रमाणे ही घरं स्वतंत्र होती आणि एकमेकांसमोर नव्हती. पण बायांनी याला आक्षेप घेतला कारण अशा रचनेमुळे गावाची पारंपरिक रचनाच विस्कळित होणार होती. त्यांच्या परंपरागत रचनेप्रमाणे घरं बांधून द्यायला शासन राजी झालं तेव्हा कुठे घरांचं बांधकाम सुरू करण्यात आलं.
कोंध
घरांमध्ये सगळ्यात मौल्यवान कोणती वस्तू असेल तर ती म्हणजे बी. आणि हा केवळ आणि
केवळ स्त्रियांचा प्रांत. बियाणं निवडणं, पुढच्या वर्षासाठीची साठवण, देवाला बी
चढवायचं आणि पुढच्या पेरण्यांच्या वेळी पुरुषांना कोणकोणतं बी द्यायचं हे सगळं
स्त्रियाच ठरवतात. समाजामध्ये स्त्रियांचं स्थान किती मोलाचं आहे हे त्यांचं बी-बियाण्याशी
किती जवळचं नातं आहे यावरूनच सिद्ध होतं.
मुनिगुडा
तालुक्यातल्या दुलारी गावातल्या ५५ वर्षीय श्रीमती दुदुका सांगतात, “बी म्हणजे तरी
दुसरं काय – धरणीमातेन आपल्याला देऊ केलेलं तिचं फळ. आम्ही शेजारच्या गावातलं बी
पूजत नाही – बी आमच्याच जमिनीतलं असायला पाहिजे. धरणीमाता स्वतःला अशा प्रकारे
शुद्ध करते आणि पुढे भविष्यात आपल्याला जास्त भरभरून देते. त्यामुळे तिचा अवमान
आम्ही कसा करावा?”
बी आणि अन्नाच्या माध्यमातूनच स्त्रिया आपल्या संस्कृती आणि परिस्थितीच्या संरक्षक बनतात. उदा. कोणत्याही कोंध आहारात नाचणीसारखी तृणधान्यं असायलाच पाहिजेत. या भागातल्या स्थानिक आहाराचं जतन करणाऱ्या लिव्हिंग फार्म्स संस्थेचे देबजीत सरंगी म्हणतात, “अनेक नष्ट व्हायच्या मार्गावर असणाऱ्या वाणांचं जतन स्त्रिया करत असतात. हे वाण वापरून, आहारात त्याचा समावेश करून, पोरा-बाळांना खाऊ घालून आणि त्या धान्याचं महत्त्व त्यांना समजावून सांगून त्या हे वाण जतन करत असतात, त्याच बरोबर पुढच्या पेरण्यांसाठी बी योग्य पद्धतीने साठवून ते नष्ट होण्यापासूनही त्याचा बचाव स्त्रिया करतात. या सगळ्यातून काय होतं तर स्थानिक परिस्थितीकीत टिकून राहणारं विशिष्ट वाण जतन होतं आणि त्यातूनच त्या स्वावलंबी देखील होतात.”
कुटुंबाचे
तीन मुख्य कारभारी असतात – जानी, देसरी आणि बेजुनी – आणि बेजुनी ही कायम बाईच
असते. जानी सण-उत्सवांमध्ये सगळे धार्मिक विधी पार पाडतात, स्थानिक जडी-बूटी, औषधं
आणि हवामानाच्या ज्ञानाचा साठा असतो तो देसरीकडे. बेजुनी असते गावाची भगत (शीर्षक
चित्रात डावीकडे). वेळोवेळी तिच्या अंगात येतं, ती वेगवेगळ्या देवी-देवतांचे संदेश
समुदायातल्या सगळ्यांपर्यंत पोचवते, येऊ घातलेली संकटं आणि रोगाच्या साथींबद्दल
सगळ्यांना सावधान करते आणि पुरुष माणसं शिकारीवर जाण्याआधी त्यांना दिशा सांगते.
एकीकडे,
जिथे पितृसत्ताक समाजांमध्ये स्त्रियांना धार्मिक कार्यक्रमांपासून कायम लांब
ठेवलं जातं तिथे कोंध समुदायात मात्र स्त्रिया देवदूताचंही काम करतात यात आश्चर्य
वाटायला नको.
अनुवादः मेधा काळे