“तिचा अंत कशाने झाला कोण जाणे, पण तिच्याकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते काही दिलं गेलं नाही. एवढं मला माहितीये,” आपल्या बहिणीच्या मृत्यूबद्दल सुभाष कबाडे सांगतो.

त्याची बहीण लता सुरवसे बीडच्या सिविल हॉस्पिटलमध्ये मरण पावली. त्याच्या आदल्याच रात्री तिथल्या एका डॉक्टरांनी दोन इंजेक्शन ताबडतोब आणून द्यायला लावली होती. सुभाष बाहेरच्याच औषधाच्या दुकानात धावत गेला आणि क्षणात परत आला. पण तो येईपर्यंत डॉक्टर निघून गेले होते.

“किती तरी पेशंटवर ते एकाच वेळी उपचार करत होते. ते दुसऱ्या वॉर्डमध्ये गेले,” २५ वर्षीय सुभाष सांगतो. “मी नर्सला इंजेक्शनबद्दल सांगितल्यावर तिने लताची फाइल पाहिली. त्यात काहीच लिहिलं नव्हतं. काही मिनिटांपूर्वीच त्यांनी इंजेक्शन आणायला सांगितलीयेत, फाइलीत नसेल लिहिलेलं असं मी सांगून पाहिलं.”

पण नर्सने काहीच ऐकलं नाही. 'ही इंजेक्शनं द्या' म्हणून तो हातापाया पडायला लागला तेव्हा “त्या वॉर्डचा प्रमुख सिक्युरिटीला बोलवायची धमकी द्यायला लागला,” सुभाष सांगतो. सगळ्या गोष्टींची चौकशी करून, माहिती घेऊन पेशंटला अखेर इंजेक्शन मिळाली पण त्यात एक तासाचा वेळ गेला.

दुसऱ्या दिवशी, १४ मे रोजी सकाळी लताचा मृत्यू झाला. २३ एप्रिलला तिला कोविड-१९ झाल्याचं निदान झालं तेव्हापासून ती हॉस्पिटलमध्ये होती. “अधून मधून तिच्या तब्येतीत सुधारणा झाल्यासारखं वाटायचं,” बीडमध्ये वकिली करणारा सुभाष सांगतो. ती इंजेक्शनं वेळेत दिली असती तर ती वाचली असती का ते त्यालाही ठामपणे सांगता येणार नाही. पण एक गोष्ट त्याला नक्की माहितीये ते म्हणजे हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. “त्याचा परिणाम पेशंटवर व्हायलाय,” तो म्हणतो.

या वर्षी मार्च महिन्यापासून कोविड-१९ ची दुसरी लाट झपाट्याने पसरायला लागली आणि भारताच्या ग्रामीण भागातल्या खिळखिळ्या सार्वजनिक आरोग्यसेवेची  लक्तरं वेशीवर टांगली गेली. हॉस्पिटलमध्ये पुरेसे कर्मचारी नाहीत, आरोग्य कर्मचारी दमून गेलेले आहेत आणि रुग्णांना चांगले उपचार मिळत नाहीयेत. गावपाड्यावरच्या लाखो नागरिकांसाठी आरोग्यसेवेचं हेच चित्र दिसून येतंय.

Subash Kabade, whose sister died in the Beed Civil Hospital, says that the shortage of staff has affected the patients there
PHOTO • Parth M.N.

बीड सिविल हॉस्पिटलमध्ये सुभाष कबाडेची बहीण मरण पावली, तो सांगतो की पुरेसे कर्मचारी नसल्याने रुग्णांवर परिणाम व्हायला लागलाय

वातावरण बदल, पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि शेती संकटाचा मुकाबला करत असलेल्या मराठवाडा विभागातल्या बीड जिल्ह्याला कोविडच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला. २५ जून पर्यंत जिल्ह्यात ९२,४०० कोविड रुग्णांची नोंद झाली असून तब्बल २,५०० मृत्यू झाले आहेत. दुसऱ्या लाटेने कळस गाठला तेव्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती – १ एप्रिल रोजी २६,४०० वरून ३१ मे रोजी ८७,४००. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बीडची आरोग्यसेवा मात्र पुरती कोलमडून गेली.

सार्वजनिक दवाखान्यांमध्ये आरोग्यसेवा मोफत असल्याने बहुतेकांचा ओढा तिथेच असतो. वर्षानुवर्षांच्या कृषी संकटाचा सामना करणाऱ्या, कर्जाच्या विळख्यात अडकल्याने आलेल्या गरिबी आणि उद्विग्नतेचा हा परिणाम असावा. या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २६ लाखाहून जास्त आहे.

साधी लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी जिल्ह्यामध्ये एकूण ८१ कोविड काळजी केंद्रं आहेत आणि यातली तीन वगळता सगळी सरकारी आहेत. तिथे संसर्ग बरा झाला नाही तर अशा रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर – डीसीएचसीला पाठवलं जातं. बीडमध्ये असे ४८ डीसीएचसी दवाखाने आहेत मात्र यातले केवळ १० सरकारी आहेत. ४८ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणजेच डीसीएचपैकी केवळ १० जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत येतात.

पण, सरकारी दवाखान्यांमध्ये पुरेसे कर्मचारीच नाहीत.

कोविडची दुसरी लाट कळस गाठत होती तेव्हाही बीडमधल्या सरकारी कोविड केंद्रांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरीच होती. जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात पदभरती करण्याची परवानगी दिली असली तर अनेक पदं रिक्तच होती.

जिल्हा आरोग्य अधिकारी, रामकृष्ण पवार सांगतात की डॉक्टरांच्या ३३ मान्य पदांपैकी केवळ नऊ भरण्यात आली. भूलतज्ज्ञांच्या सर्वच्या सर्व २१ जागा रिकाम्या आहेत. स्टाफ नर्सेसच्या १,४२२ आणि ‘वॉर्ड बॉय’ च्या १,००४ पदांपैकी अनुक्रमे ४४८ आणि ३०१ जागा अद्यापही भरलेल्या नाहीत.

एकूण १६ प्रकारच्या ३,१४९ मंजूर पदांपैकी ३४ टक्के म्हणजेच १०८५ पदं रिक्त आहेत. याचा थेट परिणाम सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होऊन त्यांच्यावरचा ताण प्रचंड वाढलेला आहे.

Jyoti Kadam's husband, Balasaheb, died the day after he was admitted to the hospital
PHOTO • Parth M.N.

ज्योती कदम यांचे पती बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मरण पावले

दुसऱ्या लाटेने कळस गाठला तेव्हा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली – १ एप्रिल रोजी २६,४०० वरून ३१ मे रोजी ८७,४००. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बीडची आरोग्यसेवा मात्र पुरती कोलमडून गेली

३८ वर्षीय बाळासाहेब कदम यांना बीडच्या सिविल हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर असलेला बेड मिळाला पण ऑक्सिजनची टाकी मात्र नातेवाइकांना स्वतः स्टोरेज रुमपासून वॉर्डापर्यंत घेऊन जावी लागत होती. “आजूबाजूला कुणीच कर्मचारी नव्हते आणि त्यांची ऑक्सिजनची पातळी खालावत चालली होती,” त्यांच्या पत्नी, ३३ वर्षीय ज्योती सांगतात. “माझ्या दिराने खांद्यावर सिलिंडर नेला आणि वॉर्डबॉयला लावायला सांगितला.”

पण बाळासाहेब काही वाचले नाहीत. इथून ३० किलोमीटरवरच्या येळंबघाट गावचे उपसरपंच असलेले बाळासाहेब “सदा न कदा बाहेरच असायचे,” ज्योती सांगतात. “लोक आपल्या अडचणी घेऊन त्यांच्याकडे येत असायचे.”

गावात शिक्षिका असलेल्या ज्योती सांगतात की बाळासाहेब येळंबघाटमध्ये लसीकरणाबद्दल जागृती निर्माण करत होते. “लोकांच्या मनात लसीबद्दल शंका राहू नये म्हणून त्यांची धडपड सुरू होती. घरोघरी जात होते.” तेव्हाच कधी तरी त्यांना लागण झाली असावी असं ज्योतींना वाटतं. चौदा आणि नऊ वर्षांच्या आपल्या दोघी मुलींना त्यांना आता एकटीलाच मोठं करायचं आहे.

२५ एप्रिल रोजी बाळासाहेबांना जरा धाप लागल्यासारखं व्हायला लागलं. आजाराची लागण झाल्याचंच ते लक्षण होतं. “त्याच्या आदल्या दिवशीच तो शेतात कामाला आला होता. इतर कसलाच आजार नव्हता. पण हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या दुसऱ्याच दिवशी [२६ एप्रिल] तो वारला,” त्यांचे वडील, ६५ वर्षीय भागवत कदम सांगतात. “त्यानं धसकी घेतली होती. अशा वेळी धीर द्यायला पेशंटपाशी डॉक्टर पाहिजे हो. पण सध्या त्यांना वेळ कुठे?”

आजाराची लागण होण्याचा धोका असला तरी कोविड पेशंटचे नातेवाईक वॉर्डात थांबून त्यांची काळजी स्वतः घेण्याचा हट्ट करतात. पुरेसे कर्मचारी नाहीत ते त्यांना दिसत असतं. बीडच्या सिविल हॉस्पिटलमध्ये नातेवाइकांना येऊ न देण्याचा प्रशातनाचा प्रयत्न असतो. त्यातून नातेवाईक, हॉस्पिटलचे कर्मचारी आणि पोलिसांत कायम खटके उडत असतात.

Bhagwat Kadam, Balasaheb's father, says his son was scared but the doctors didn't have time to assuage his fears
PHOTO • Parth M.N.

बाळासाहेबांचे वडील भागवत कदम सांगतात की त्यांच्या मुलाने आजाराची धसकी घेतली होती पण त्याला धीर देण्याइतका वेळच डॉक्टरांकडे नव्हता

हॉस्पिटलने जायला सांगितलं तरी घरची मंडळी तिथे रेंगाळत राहतात आणि संधी मिळताच आपल्या पेशंटला भेटून येतात. “आमच्या माणसाची आत नीट काळजी घेतायत का नाही ते कसं कळावं?” हॉस्पिटलच्या बाहेर मोटरसायकलवर बसलेला ३२ वर्षीय नीतीन साठे म्हणतो. “माझे आई-वडील दोघं साठीच्या पुढे आहेत आणि दोघं जण ॲडमिट आहेत. त्यांना साधं खायला-प्यायला काही हवंय का तेही कुणी विचारत नसेल.”

पेशंट आधीच हादरलेला असतो. त्याची मानसिक स्थिती सांभाळणं फार महत्त्वाचं असतं, नीतीन सांगतो. तो शहरातल्या एका बँकेत कारकून आहे. “मी जवळपास असलो तर त्यांची काळजी घेऊ शकतो, त्यांना धीर देऊ शकतो. त्यातून त्यांच्या मनाला उभारी मिळेल. तुम्ही एकटंच असाल तर सगळे वाईट साईट विचार तुमच्या मनात येत राहतात. त्यातून तब्येतीवर परिणाम होतो.”

परिस्थिती कशी विचित्र आहे त्याचं चपखल वर्णन तो करतोः “एकीकडे आम्हाला हॉस्पिटलमध्ये आत येऊ देत नाहीत. दुसरीकडे पेशंटची काळजी घ्यायला त्यांच्याकडे कामाला तेवढी माणसंच नाहीत.”

मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोविड-१९ मुळे झालेले मृत्यू आणि त्यांची अधिकृत आकडेवारी यातली तफावत एका स्थानिक पत्रकाराने बाहेर काढली आणि पुरेसे कर्मचारी नसल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आली.

दैनिक लोकमत या वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या सोमनाथ खटाळ या २९ वर्षीय वार्ताहराने विविध स्मशानभूमींमध्ये दहन करण्यात आलेल्या लोकांची आकडेवारी गोळा केली आणि मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीशी ताडून पाहिली. १०५ मृत्यूंची तफावत दिसत होती. “ही बातमी आल्याच्या एका आठवड्याच्या आत जिल्हा प्रशासनाला अधिकृत आकडेवारीत २०० मृत्यूंचा समावेश करावा लागला होता. त्यातले काही तर २०२० मध्ये झाले होते.”

जिल्हा आरोग्य अधिकारी पवार ही चूक मान्य करतात. पण पुरेसे कर्मचारी नसल्याने ती झाल्याचं सांगतात. आकडे लपवण्याचा हेतू नसल्याचं ते स्पष्ट करतात. “आमच्याकडे सगळी यंत्रणा आहे. एखाद्याला कोविड-१९ची लागण झाली तर आम्हाला कोविड पोर्टलच्या बॅकएन्डला तशी सूचना मिळते. जिथे पेशंट दाखल झाला तिथे त्याची नोंद होणं, त्याच्या उपचाराची आणि त्यातून काय निष्पन्न झालं ते सगळं नोंदवलं जाणं अपेक्षित आहे,” पवार सांगतात.

Nitin Sathe sitting on a motorbike outside the hospital while waiting to check on his parents in the hospital's Covid ward
PHOTO • Parth M.N.

हॉस्पिटलच्या बाहेर मोटरसायकलवर बसलेला नीतीन साठे, कोविड वॉर्डमध्ये त्याचे आई-वडील दाखल आहेत त्यांची विचारपूस करण्यासाठी तो थांबला आहे

पण एप्रिल महिन्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसाला २५-३० वरून अचानक १,५०० पर्यंत गेली. तेव्हा, “कामाचा ताणच असा होता की काय माहिती भरली जातीये त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही,” पवार सांगतात. “कोविड-१९ चे पेशंट म्हणून त्यांच्यावर सगळे उपचार झाले पण त्यातल्या काही मृत्यूंची आकडेवारी पोर्टलवर टाकली गेली नाही. ती बातमी आल्यानंतर आम्ही आमची चूक मान्य केली आणि जिल्ह्यातल्या मृत्यूंची आकडेवारी अपडेट केलीये.”

एकीकडे जिल्हा प्रशासनाने आपली चूक तर मान्य केली पण सुभाषच्या विरोधात मात्र कोविडचे नियम मोडल्याबद्दल आणि लताच्या “मृतदेहाची विटंबना” केल्याबद्दल कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

“हॉस्पिटलच्या स्टाफने [मृतदेहाची] अँटिजेन टेस्ट केली होती आणि ती निगेटिव्ह आली,” सुभाष सांगतो. “त्यामुळे त्यांनी बॉडी घरी न्यायला परवानगी दिली.”

इथून ३५ किलोमीटरवर असलेल्या, गेवराई तालुक्यातल्या कुंभारवाडी या आपल्या बहिणीच्या गावी तिचा मृतदेह नेण्याची परवानगी सुभाषने हॉस्पिटलला मागितली होती. नवरा, रुस्तुम आणि मुलगा सात वर्षांचा श्रेयस असं लताचं कुटुंब होतं. “कुटुंबाची तशी इच्छा होती. तिला अखेरचा निरोप तरी नीट द्यावा असं आमच्या मनात होतं.”

पण कुंभारवाडीच्या दिशेने जात असता, अर्ध्या वाटेवरच हॉस्पिटलमधून सुभाषला फोन आला आणि मृतदेह घेऊन परत यायला सांगण्यात आलं. “मीच आमच्या नातेवाइकांची समजूत घातली की सध्याचा काळ कठीण आहे आणि आपण प्रशासनाला सहकार्य करायला पाहिजे. आम्ही तिथनंच माघारी फिरलो आणि मृतदेह घेऊन परत आलो.”

असं असूनही सिविल हॉस्पिटलने मात्र सुभाषच्या विरोधात साथरोग कायदा, १८९७ खाली पोलिसात तक्रार दाखल केली. “एखादा कोविडचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये मरण पावला तर त्यासंबंधी काही नियम आहेत. आणि या केसमध्ये नातेवाइकांनी नियमांचा भंग केला आहे,” बीडचे जिल्हा दंडाधिकारी रवींद्र जगताप सांगतात. मृत्यूनंतरच्या अँटिजेन टेस्टला काही अर्थ नाही असंही ते म्हणतात.

Left: Subash Kabade shows his letter to the district collector explaining his side in the hospital's complaint against him. Right: Somnath Khatal, the journalist who discovered the discrepancy in official number of Covid deaths reported in Beed
PHOTO • Parth M.N.
Left: Subash Kabade shows his letter to the district collector explaining his side in the hospital's complaint against him. Right: Somnath Khatal, the journalist who discovered the discrepancy in official number of Covid deaths reported in Beed
PHOTO • Parth M.N.

डावीकडेः आपल्याविरोधात हॉस्पिटलने दाखल केलेल्या तक्रारीबाबत स्पष्टीकरण देणारं पत्र सुभाषने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं आहे. उजवीकडेः बीडमध्ये कोविड-१९ च्या मृत्यूंमधल्या आकडेवारीतली तफावत शोधून काढणारे सोमनाथ खटाळ

कोविडसंबंधी नियमावलीमुसार कोविडच्या रुग्णाचा मृतदेह बॉडी बॅगमध्ये घालून हॉस्पिटलमधून थेट स्मशामभूतीत दहन करण्यासाठी नेणं अपेक्षित आहे.

सुभाष म्हणतो की हॉस्पिटलने परवानगी दिली म्हणूनच त्याने लताचा मृतदेह घरी न्यायचं ठरवलं. “मी स्वतः वकील आहे आणि मला सगळे नियम समजतात. मी हॉस्पिटलचे नियम मोडून माझ्या स्वतःच्या कुटुंबाचा जीव कशासाठी धोक्यात घालेन?”

त्याला दुःख या गोष्टीचं झालंय की गेल्या काही काळात त्याने रुग्णांना आणि स्टाफला जी काही मदत केली त्याचा काहीही विचार हॉस्पिटलने केला नाही. “मी किमान १५० रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला मदत केली असेल. कित्येकांना तर लिहिता वाचता येत नाही. मी त्यांचे फॉर्म भरून द्यायचो, हॉस्पिटलमध्ये कुठे, कसं जायचं, त्याला मदत करायचो. हॉस्पिटलच्या स्टाफने जे काम करायला पाहिजे ना, ते मी स्वतः करत होतो,” सुभाष म्हणतो.

लता आजारी पडायच्या आधीपासून सुभाष सिविल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भरती होण्यासाठी मदत करत होता. तो सांगतो की जवळपास दीड महिना तो पूर्ण दिवस हॉस्पिटलमध्येच मदतीचं काम करत होता. त्याची बहीण जो काही काळ तिथे ॲडमिट होती, तेव्हाही.

त्याची बहीण हॉस्पिटलमध्ये असताना एकदा तर एक कोविड रुग्ण जमिनीवर पडली होती, तिला उचलून त्याने वर बेडवर सुद्धा ठेवलं होतं. “म्हातारी बाई होती. ती बेडवरून खाली पडली, पण कुणी तिच्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही. इथे दवाखान्यात पेशंटची अशी हालत आहे.”

संतप्त, दुःखी आणि उद्विग्न झालेला सुभाष मला बीडच्या एका हॉटेलच्या लॉबीत भेटायला आला. “माझी बहीण गेली त्या धक्क्यातून अजून आई-वडील सावरलेले नाहीत,” सुभाष सांगतो. “ते काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीत. माझंही चित्त थाऱ्यावर नाहीये. माझा भाचा सारखा फोन करून विचारत राहतो, ‘आई घरी कधी येणार?’ त्याला काय उत्तर द्यावं तेच समजेना गेलंय.”

Parth M.N.

ਪਾਰਥ ਐੱਮ.ਐੱਨ. 2017 ਤੋਂ ਪਾਰੀ ਦੇ ਫੈਲੋ ਹਨ ਅਤੇ ਵੱਖੋ-ਵੱਖ ਨਿਊਜ਼ ਵੈੱਬਸਾਈਟਾਂ ਨੂੰ ਰਿਪੋਰਟਿੰਗ ਕਰਨ ਵਾਲੇ ਸੁਤੰਤਰ ਪੱਤਰਕਾਰ ਹਨ। ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕ੍ਰਿਕੇਟ ਅਤੇ ਘੁੰਮਣਾ-ਫਿਰਨਾ ਚੰਗਾ ਲੱਗਦਾ ਹੈ।

Other stories by Parth M.N.
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale