रोज संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कामावरून परतल्यावर डॉ. शबनम यास्मिन थेट आपल्या घराच्या गच्चीवर जातात. हलक्या विटकरी रंगाच्या घराच्या गच्चीवरती न्हाणीत त्या आंघोळ करतात, कामावर नेलेली एक न् एक वस्तू, अगदी पेन, डायरी वगैरे सगळं त्या निर्जंतुक करतात. कपडे धुऊन टाकतात आणि त्यानंतरच आपल्या घरच्यांना भेटायला खाली येतात. गेलं एक वर्ष त्या अगदी काटेकोरपणे हे सगळं असंच करतायत.
“महामारी असताना [टाळेबंदीमध्ये] मी पूर्ण वेळ काम केलं. सगळं बंद होतं, अगदी खाजगी दवाखाने देखील बंद होते. मला काही करोनाची लागण झाली नाही. माझ्या काही सहकाऱ्यांना झाली. आम्ही तर करोनाची लागण झालेल्या दोन बायांची बाळंतपणं हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पाडली,” ४५ वर्षीय यास्मिन सांगतात. बिहारच्या ईशान्येकडच्या किशनगंज शहरात त्यांचं घर आहे आणि घरापासून १ किलोमीटरवर असलेल्या सदर हॉस्पिटलमध्ये त्या स्त्री रोग तज्ज्ञ आणि शल्यचिकित्सक आहेत.
शबनम यांच्यासाठी हे सगळं सोपं नाही. करोनाची लागण होणं त्यांना परवडण्यासारखं नाही. त्यांच्या घरी त्यांची आई आणि १८ आणि १२ वर्षं वयाची दोघं मुलं आहेत. शिवाय त्यांचे पती ५३ वर्षीय इरतझा हसन सध्या मूत्रपिंडाच्या आजारातून बरे होत आहेत. त्यामुळे त्यांना तर जास्तच काळजी घ्यावी लागते. “मी काम करू शकले ते केवळ माझ्या आईमुळे. आझरा सुलताना. तिने सगळ्या गोष्टी हातात घेतल्या. नाही तर एरवी मीच सगळ्या भूमिका वठवत असते – डॉक्टर, गृहिणी, शिक्षिका...” शबनम सांगतात.
२००७ साली त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं तेव्हापासून हे असंच सुरू आहे. “मी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असताना गरोदर होते. माझं लग्न झालं तेव्हा पहिली सहा वर्षं तर मी माझ्या कुटुंबासोबत राहू पण शकले नाही. माझे शौहर वकिली करायचे आणि ते पटण्यात काम करत होते. मला जिथे पाठवलं तिथे काम करावं लागायचं,” शबनम सांगतात.
सदर हॉस्पिटलमध्ये बदली होण्याआधी २०११ साली डॉ. शबनम यांची बदली ठाकूरगंजमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती. हा दवाखाना त्यांच्या घरापासून ४५ किलोमीटरवर होता. २००३ साली त्यांनी रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून एमबीबीएसची पदवी मिळवली आणि त्यानंतर २००७ साली पटणा मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एमडी केलं. नंतरची काही वर्षं खाजगी प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना सरकारी नोकरी मिळाली. ठाकूरगंजच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी त्यांना बसने प्रवास करावा लागायचा. आपल्या दुसऱ्या बाळाला अगदी तान्हा असताना आईपाशी सोडून त्या जायच्या. फार खडतर व्हायला लागल्यावर त्या आई आणि आपल्या बाळांना घेऊन ठाकूरगंजला रहायला गेल्या. त्यांचे पती इरतझा पटण्यातच राहिले आणि अधून मधून त्यांना भेटायला जायचे.







