या वर्षी जानेवारीमध्ये ३६ वर्षांच्या शांती मांझी आजी झाल्या. त्यांचं पहिलं नातवंड जन्माला आलं. त्याच रात्री त्यांनी आणखी एक गड सर केला. गेल्या वीस वर्षांत घरीच, डॉक्टर किंवा नर्सशिवाय आपल्या सात मुलांना जन्म देणाऱ्या शांती पहिल्या प्रथम हॉस्पिटलची पायरी चढल्या.
“माझी मुलगी कित्येक तास अडली होती, बाळ बाहेरच येईना. मग आम्हाला टेम्पो बोलवायला लागला,” त्या सांगतात. त्यांच्या थोरल्या मुलीला, ममताला घरीच वेणा सुरू झाल्या होत्या. संध्याकाळी सूर्य कलण्याच्या सुमारास चार किलोमीटरवरच्या शिवहर गावातून इथे यायला त्याला एक तास लागला होता. ममताला शिवहरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि अनेक तासांनंतर तिने एका मुलाला जन्म दिला.
“त्याने ८०० रुपये घेतले,” टेम्पोच्या भाड्याबाबत शांती नाराजी व्यक्त करतात. “आमच्या टोल्यावरचं कुणीही हॉस्पिटलमध्ये जात नाही. त्यामुळे तिथे अँब्युलन्स असते ते आम्हाला माहितच नाहीये.”
त्या रात्री शांतींना घरी परतावंच लागलं. निजायच्या आधी आपली सगळ्यात धाकटी मुलगी चार वर्षांची काजल जेवलीये का नाही याची त्यांना काळजी होती. “मी आजी झालीये,” त्या सांगतात. “पण आईच्या जबाबदाऱ्या संपल्यात थोडीच.” शांतीला ममता आणि काजल सोडून इतर तीन मुली आणि दोन मुलं आहेत.
मांझी कुटुंब बिहारच्या शिवहर जिल्ह्यातल्या त्याच तालुक्यातल्या माधोपूर अनंत गावापासून एक किलोमीटर अंतरावरच्या मूसाहार टोल्यावर राहतात. कुडाच्या भिंती असलेल्या अंदाजे ४० घरांच्या टोल्यावर ३००-४०० लोकं राहत असावीत. हे सगळे मूसाहार आहेत.










