“काय गरज आहे ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची? बाजारात भटकण्यासाठी, पैसे खर्च करण्यासाठी निमित्तच हवं असतं यांना…”
मोनिका कुमारी ब्युटी पार्लरमध्ये जाते तेव्हा प्रत्येक वेळी तिचे सासू-सासरे तिला या शब्दांत टोकत असतात. जामुईपासून तीन किलोमीटरवर असलेल्या खैरमा गावात मोनिकाचं चार जणांचं कुटुंब राहातं. पण सासू-सासर्यांच्या या टोकण्याकडे दुर्लक्ष करून पंचविशीची मोनिका ‘आयब्रो’ करायला, ओठावरची लव काढायला नियमित ब्युटी पार्लरमध्ये जाते. तिला वाटतं तेव्हा ती फेशियलही करून घेते. पंचायत कचेरीत काम करणारा तिचा नवरा कधीकधी तिला ब्युटी पार्लरला सोडतो. त्याच्या आई-वडिलांसारखं, ब्युटी पार्लरला जाणं म्हणजे फक्त ‘भटकण्यासाठीचं निमित्त’ आहे असं त्याला वाटत नाही.
मोनिकाच नाही, जामुईच्या आसपासच्या गावांतल्या, छोट्या शहरांतल्या कित्येक तरुण मुली आणि स्त्रिया झटकन आपला ‘मेकओव्हर’ करून घ्यायला जवळच्या पार्लरमध्ये जातात.
“मी पार्लर सुरू केलं, तेव्हा जामुईमध्ये १० पार्लर्स होती. आता मात्र जिथे बघावं तिथे पार्लर आहे,” प्रमिला शर्मा म्हणते. गेली १५ वर्षं जामुईमध्ये ती पार्लर चालवते आहे.
जामुईच्या मुख्य रस्त्यावरच प्रमिलाचं ‘विवाह लेडीज ब्युटी पार्लर’ आहे. ८७ हजार ३५७ लोकसंख्या असलेल्या या छोट्या शहरात बरेच लोक शेती किंवा त्याच्याशी संबंधित क्षेत्रात काम करतात.
एक सायकलचं दुकान, एक सलून आणि एक शिंपी यांच्या मधोमध प्रमिलाचं पार्लर आहे. हेअरकट, थ्रेडिंग, मेंदी, वॅक्सिंग, फेशियल, मेकअप अशा सगळ्या र्सौदर्य सेवा इथे दिल्या जातात. अगदी तीस किलोमीटरवर असलेल्या लक्ष्मीपूर आणि इस्लामनगर या गावांपासून अनेक ठिकाणच्या महिला आणि मुली ‘विवाह’मध्ये येत असतात.
“इथे बोलल्या जाणार्या अंगिका, मैथिली, मगधी अशा स्थानिक भाषा मला येतात. माझ्याकडे येणार्या स्त्रिया त्यामुळे माझ्याशी मोकळेपणाने बोलू शकतात,” प्रमिला म्हणते.
बिहारच्या या कोपर्यात पार्लर चालवायचं तर पुरुषप्रधानतेशी सतत टक्कर घ्यावी लागते. “इथल्या मुली लग्नाआधी त्यांच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार जगतात आणि लग्नानंतर नवरा सांगेल तसं,” प्रमिला सांगते. त्यामुळे तिच्या पार्लरमध्ये पुरुषांना अजिबातच प्रवेश नाही. पार्लरबाहेर तिने तशी पाटीच लावलीय… ‘फक्त महिलांसाठी’. एकदा पार्लरच्या आत आलं की महिलांचंच राज्य! इथे येणार्या मुलींना, स्त्रियांना त्यामुळे सुरक्षितही वाटतं आणि मोकळंही. मुलं, रेसिपीज यांच्याबद्दल गप्पा होतात. गावात, शहरात होणार्या लग्नांविषयी चर्चा होतात. घरी कुणाचं नवर्याशी किंवा सासरच्यांशी पटत नसेल तर सहानुभूती व्यक्त करत तिची कहाणी ऐकली जाते. “बहुसंख्य स्त्रिया आपल्या भावना घरी व्यक्त करू शकत नाहीत. इथे मात्र त्या त्यांना जे जे वाटतं ते बोलू शकतात,” प्रमिला म्हणते.
नेमकं याचमुळे स्त्रिया पार्लरशी एकनिष्ठ राहातात. “आम्ही जेव्हा जेव्हा जामुईला पार्लरमध्ये येतो, तेव्हा नेहमी त्याच पार्लरमध्ये येतो,” प्रिया कुमारी सांगते. ती जागा त्यांना ओळखीची झालेली असते. ब्युटीशियन कधी थोडं ओरडली, काही बोलली तरी त्यांना काही वाटत नाही, उलट आपल्या कुटुंबात असल्यासारखं वाटतं. “तिला आमचं अख्खं आयुष्य माहिती आहे. ती जोक्स करत असते आमच्याबरोबर,” जामुई तालुक्यातल्या खैरमा गावात राहाणारी बावीस वर्षांची प्रिया सांगते.
जामुईमधल्या महाराजगंज मुख्य रस्त्यावर एका व्यावसायिक संकुलात तळमजल्यावर प्रमिलाचं पार्लर आहे. एकही खिडकी नसलेल्या या छोट्याशा खोलीचं ३५०० रुपये भाडं ती देते. एखादा पट्टा असावा तसे तीन भिंतींवर मोठे आरसे लावले आहेत. आरशांच्या वर काचेची कपाटं आहेत. त्यात पिगी बँक्स, फुगवलेली टेडी बेअर्स, सॅनिटरी नॅपकीनची पाकीटं आणि इतर अनेक सौंदर्य प्रसाधनं ठासून भरलेली आहेत. सीलिंगवरून प्लास्टिकची रंगीत फुलं सोडली आहेत, प्रमिलाने केलेल्या सौंदर्यप्रसाधनाच्या वेगवेगळ्या कोर्सेसची प्रमाणपत्रं केशरी आणि करड्या रंगाच्या भिंतींवर दर्शनी भागातच लावली आहेत.
समोरच्या दरवाजावर लावलेला पिवळा पडदा बाजूला करून एक ग्राहक स्त्री आत येते. ती डिनरला चालली आहे. त्यासाठी तिला आपल्या ओठांवरची लव काढायची आहे, भुवयाही कोरायच्या आहेत. खरं तर आता पार्लर बंद होण्याची वेळ झाली आहे. पण पार्लरच्या या व्यवसायात असं घड्याळाच्या काट्यावर काम करून चालत नाही, नाहीतर ग्राहक दुसरीकडे निघून जातात. ती ग्राहक बसते. प्रमिला तिला कुठे जायचं आहे ते विचारते आणि अगदी सहज तिच्याशी मैत्रिणीसारख्या गप्पा मारायला सुरुवात करते. “हम थोडा हसी मजाक करेंगे की स्किन में अंदर से निखार आये।” ती नंतर आम्हाला सांगते.
“कधीकधी दिवसभरात २५ हून अधिक बायका नुसत्या भुवया कोरायला येतात. कधीकधी मात्र पाच जणीही नाही येत,” या व्यवसायातल्या अनिश्चिततेबद्दल प्रमिला सांगते. तिला नवरीला सजवण्याची ऑर्डर असते तेव्हा तिची दिवसाची कमाई ५००० रुपयांच्याही वर जाते. “आधी आम्हाला नवरीच्या मेकअपची खूप कामं मिळायची. आता मात्र बर्याच जणी फोनवर व्हिडीओ बघून स्वतःचा स्वतःच मेकअप करतात,” ती म्हणते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रमिला काही स्पेशल ऑफर्स देते : भुवया कोरा आणि ओठांवरची लव काढा, फक्त ३० रुपयांत!
चाळीशीच्या पुढच्या स्त्रियांना पार्लरमध्ये आणणं हे अधिक मोठं आव्हान आहे. प्रिया तर सांगतेच की, तिच्या आईच्या पिढीची एकही महिला तिने कधीही पार्लरमध्ये बघितलेली नाही. “माझ्या आईने कधीही भुवया कोरल्या नाहीत की कधी केस कापले नाहीत. आम्ही अंडरआर्म्स का करतो ते तिला कळूच शकत नाही. ती म्हणते, ‘मी अशीच आहे, असंच मला देवाने बनवलं आहे. मी का बदलू ते?’ “
संध्याकाळचे पाच वाजत आलेले असतात. एक आई आपल्या दोन कुमारवयीन मुलींना घेऊन आत येते. तबस्सिम मलिक प्रमिलाच्या शेजारी बसते. तिच्या मुली हिजाब काढतात आणि केस कापण्यासाठी काळ्या विनाइलच्या खुर्चीवर बसतात. केशरी रंगाच्या टेबलवर सगळी साधनं ठेवलेली असतात… कात्री, कंगवे, वॅक्स हिटर, व्हिजिटिंग कार्डचे दोन गठ्ठे, भुवया कोरण्यासाठी वापरल्या जाणार्या दोर्याची बंडलं, पावडरींचे आणि वेगवेगळ्या लोशनचे डबे… सगळं शिस्तीत त्या टेबलावर बसलेलं असतं.
“तुम्हाला तीन मुली आहेत ना? लग्न झालं का एकीचं?” प्रमिला विचारते. आपल्या ग्राहकाची संपूर्ण माहिती असते तिला.
“ती शिकतेय अजून. शिक्षण संपलं की मग विचार करू…” तबस्सिम म्हणते.
सोफ्यावर बसलेली प्रमिला मान हलवत तिला प्रतिसाद देते. तबस्सिमशी बोलता बोलता ती आपल्याकडे प्रशिक्षण घ्यायला आलेल्या मुलींकडेही लक्ष देत असते. टुनी आणि रानी या दोघी तबस्सिमच्या मुलींचे केस कापण्याची सगळी तयारी करतात. बारा वर्षांच्या जस्मीनला ८० रुपयांत होणारा ‘यू’ कट हवा असतो. “यू आकार पूर्ण झाल्याशिवाय केसातून कातर उचलूच नकोस,” प्रमिला सांगते आणि टुनी मान हलवते.
दोन मुलींपैकी एकीचा हेअरकट या शिकणार्या मुली करतात, दुसरा मात्र प्रमिला स्वतः करते. ती आपल्या तरुण सहाय्यकांकडून धातूची जड कात्री घेते आणि त्यांच्या समोरच तबस्सिमच्या दुसर्या मुलीचे केस ट्रिम करायला, कापायला सुरुवात करते.
पंधरा मिनिटांत दोन्ही मुलींचे केस कापून होतात आणि रानी खाली पडलेल्या केसांच्या लांब लडी गोळा करायला वाकते. काळजीपूर्वक त्या एकत्र करते आणि रबरबँडने बांधून ठेवते. हे केस नंतर वजनावर केसांचा टोप बनवणार्या कोलकात्याच्या एका व्यापार्याला विकले जातात.
“आता या थेट पुढच्या वर्षी येतील,” तिघी मायलेकी पार्लरमधून गेल्यावर प्रमिला सांगते. “वर्षातून एकदा, ईदपूर्वी त्या केस कापायला येतात.” आपल्या ग्राहकांबद्दल बारीकसारीक माहिती असणं, त्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं हे प्रमिलाचं वैशिष्ट्य आहे.
अर्थात, फक्त मस्कारा आणि ब्लश हे प्रमिलाचं आयुष्य नाही. घरचं काम करण्यासाठी, प्रिया आणि प्रियांशु या दोन मुलांना तयार करून शाळेत पाठवण्यासाठी ती पहाटे चार वाजता उठते. पार्लरला निघताना ती किमान दहा लिटर पाणी आपल्यासोबत घेते. कारण तिचं पार्लर ज्या संकुलात आहे, तिथे नळाला पाणीच नाही. “वाहत्या पाण्याशिवाय तुम्ही पार्लर कसं चालवू शकणार?” ती विचारते.
विवाह लेडीज ब्युटी पार्लर सकाळी १० वाजता उघडतं आणि त्यानंतर अकरा तासांनी बंद होतं. प्रमिला आजारी असली किंवा घरी पाहुणे आले असतील तरच फक्त ते बंद असतं. रोज सकाळी दहापूर्वी ती तिचा नवरा राजेश याच्याबरोबर घर सोडते. प्रमिलाच्या पार्लरच्या जेमतेम एक किलोमीटर पुढे असलेल्या त्याच्या दुकानात जाण्याआधी तो तिला पार्लरला सोडतो. “माझा नवरा आर्टिस्ट आहे. तो साइनबोर्ड रंगवतो, ग्रॅनाइट कोरतो, विवाह समारंभांत पार्श्वभूमीला असलेले पडदे रंगवतो, डीजेंचे टेम्पो रंगवतो…” प्रमिला अभिमानाने सांगते.
प्रमिलाला उशीर होणार असेल तेव्हा राजेश मित्रमंडळींशी गप्पा मारत आपल्या दुकानाबाहेर थांबतो.
“या व्यवसायात रविवार नाहीच. अपॉइंटमेंट घेण्यासाठी आमचे शेजारी घरी आले, तर मी त्यांच्याकडूनही पैसे घेते!” प्रमिला सांगते. घासाघीस करणारे किंवा पैसे द्यायला सरळसरळ नकार देणारेही काही ग्राहक असतात. त्यांच्याशी प्रमिला खूप कडक वागते. “ग्राहक उद्धट असेल तर त्याला त्याची जागा दाखवावीच लागते.”
विवाह लेडीज ब्युटी पार्लरची मालकीण प्रमिला पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूरला वाढली. कोळशाच्या खाणीचं हे शहर. तिचे वडील तिथल्या ‘ईस्टर्न कोलफील्ड्स लि.’मध्ये फोरमन होते. आई गृहिणी. ती आठ जणांचं घर सांभाळायची. प्रमिलाला तीन भाऊ आणि दोन बहिणी. दर वर्षी ही भावंडं सुटीत आपल्या आजोळी जामुईला जायची.
२००० मध्ये बारावी झाल्यावर प्रमिलाचं लग्न राजेश कुमारशी झालं आणि ती पुन्हा जामुईला आली. दोन मुलं झाली. ती मोठी झाली, शाळेत जायला लागली, नवरा कामावर जायचा. घरात रहायची, त्यातूनही एकटं राहायची सवयच नव्हती. प्रमिला कंटाळली. तिने आता ब्युटी पार्लर उघडून पहायचं ठरवलं. नवर्यानेही प्रोत्साहन दिलं. “ग्राहक यायचे, मी त्यांच्यासोबत गप्पा मारायचे, हास्यविनोद करायचे. माझी एकटेपणाची भावना पळाली,” ती सांगते.
२००७ मध्ये प्रमिलाने या व्यवसायासाठी काही कोर्सेस करायचं ठरवलं, तेव्हा फार कोर्सेस उपलब्धच नव्हते. पण जामुईमध्ये तिला दोन कोर्सेस मिळाले. ‘आकर्षक पार्लर’मध्ये सहा महिन्यांचा, ज्याची फी होती ६,००० रुपये. आणि दुसरा होता ‘फ्रेश लुक’मध्ये, ज्याची फी होती २००० रुपये. दोन्ही कोर्सेसची फी प्रमिलाच्या कुटुंबाने भरली.
या व्यवसायात प्रमिलाला आता १५ वर्षं झाली आहेत. बिहारमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सौदर्यप्रसाधनांच्या वेगवेगळ्या ब्रँड्ची जी वर्कशॉप्स होतात, त्यातल्या बर्याच वर्कशॉप्समध्ये ती सहभागी होते. “मी पन्नासहून अधिक स्त्रियांना, मुलींना प्रशिक्षित केलंय. त्यापैकी बर्याच जणींनी स्वतःची पार्लर्स सुरू केली आहेत. काही तर अगदी शेजारच्या गावांमध्येच आहेत,” प्रमिला सांगते.
मुलाखत संपवतच होतो की प्रमिला शर्मा उठली. तिने आपली लाल लिपस्टिक टच अप केली. कोहलचा क्रेयॉन हातात घेऊन डोळे रेखले आणि केशरी कव्हर असलेल्या सोफ्यावर बसली.
“मी सुंदर नाही, पण तुम्ही माझा फोटो काढू शकता,” मला म्हणाली.