आम्ही पाहत होतो, पण आम्हाला खरंच वाटत नव्हतं. आम्ही गाडी त्यांच्याजवळ वळवली, आणि खाली उतरून त्याच्याकडे पाहतच राहिलो. तरी आमचा विश्वास बसेना. रतन बिस्वासकडे पाच बांबू होते, एक-एक बांबू ४०-४५ फूट लांबीचा, आणि ते एकत्र बांधून सायकलीचा तोल सांभाळत ते चालले होते. ही कसरत करत, त्यांच्या घरापासून १७ किलोमीटर दूर असलेल्या त्रिपुराच्या राजधानीत, अगरतलाच्या बाजारात, ते निघाले होते. बांबूची टोकं चुकून जरी रस्त्यावरच्या एखाद्या दगडाला, उंचवट्याला किंवा खड्ड्यात अडकली तर सायकल, सगळे बांबू आणि रतन असे एकत्र खाली कोसळले असते. आणि जबर लागलं असतं. बांबूचं वैशिष्ठ्य असं की ते जितके वजनदार असतात त्यापेक्षा दिसायला बरेच हलके वाटतात. निरखून बघण्याआधी घट्ट बांधलेले पाच बांबू चारच असल्यासारखे वाटत होते. त्यांचं एकत्रित वजन साधारण २०० किलो तरी असावं. बिस्वास यांना अर्थात हे माहित होतं. आमच्याशी ते आनंदाने बोलले. इतकंच नाही त्यांनी स्वतःच्या या पराक्रमाचा फोटोसुद्धा काढू दिला. पण आम्हाला त्यांनी त्यांची सायकल मात्र ढकलू दिली नाही. त्यांना त्यातले कष्टे चांगलेच माहित होते.
आम्ही त्यांना विचारलं, “केवळ पाच फुट लांबीच्या सायकलीवर तुम्ही बांबूचं हे एवढं वजन तोलता तरी कसं?” त्यावर ते हसले आणि त्यांनी आम्हाला सायकलला लावलेल्या काही बांबूच्या फळ्या दाखवल्या. समोरच्या बाजूला दोन उभ्या फळ्या होत्या ज्या सायकलच्या तिरक्या बारला बांधल्या होत्या, आणि त्या सायकलच्या आडव्या बारच्या दोन्ही बाजूने आणून एकत्र बांधल्या होत्या. तसंच दोन फळ्या आडव्या ठेऊन कॅरियरला बांधल्या होत्या.





