पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या या तिघ जणी एका नवतीच्या नारीच्या वागण्याबद्दल आणि त्या वागण्याचा त्यांचे पती आणि मुलावर काय परिणाम व्हायला लागलाय त्याबद्दल काही खास ओव्या गातायत. आपल्या सुखाला या नारीच्या वागण्याने ग्रहण लागणार असंच या ओव्या सांगतात

पुरुषसत्ताक समाज व्यवस्था बायांवर अन्याय तर करतेच पण सोबतच ही व्यवस्था बायांना एकमेकींच्या शत्रू असल्यासमान वागवते. खेड्यापाड्यांमध्ये आयुष्याचे सगळे घटक पुरुषसत्ताक व्यवस्थेप्रमाणे चालतात आणि अशा खेड्यापाड्यात राहणाऱ्या बायांच्या ओव्यांमधून त्यांच्या जगण्याचे अनेक कंगोरे आपल्याला समजतात. या ओव्या गाणाऱ्या बाया समाजाच्या जाचक रुढींविरोधात आवाज उठवतात, मुलगी जन्मली म्हणजे आभाळ कोसळलं असं मानणाऱ्या समाजाला प्रश्न विचारतात. बहीण आणि भाऊ एका झाडाची फळं असतानाही हा भेद का, त्यांना अशी वेगळी वागणूक का असा रोकडा सवाल त्या करतात. आणि बाईच्या कामाचं काहीच मोल का नाही हाही. असं असलं तरी अखेर लग्न हेच बाईच्या आयुष्याचं सार्थक आहे आणि सुखाचा मार्ग लग्नाच्या मांडवातून जातो अशा किती तरी ओव्या आपल्याला ऐकायला मिळतात.

या ओव्या आपल्याला काय काय सांगतात? ही एक अशी सांस्कृतिक प्रथा आहे जी बायांना एकमेकींशी जोडते आणि तोडतेही, प्रस्थापित समाजरचनेचा स्वीकारही करते आणि त्याविषयी प्रश्नही उपस्थित करते. ओव्या गाणाऱ्यांना समाजाच्या चालीरितींची शिकवणही देते आणि त्यापासून मुक्त होण्याचे धडेही. आणि या ओव्या गात गात बायांमध्ये एक मैत्र उभं राहतं, भगिनीभाव तयार होतो आणि हे अनेकानेक ओव्यांमधून आपल्याला दिसून येतं.

पण दर वेळी हा भगिनीभावच दिसेल असं काही नाही. बायांमधल्या चढाओढीच्या, स्पर्धेच्या आणि अटीतटीच्या ओव्याही आपल्याला सापडतात. आणि बऱ्याच वेळा हे भांडण, दुजाभाव का सापडतो? अनेकदा आयुष्याच्या केंद्रस्थानी असलेल्या पुरुषाच्या संदर्भात ही चढाओढ, मत्सर आणि कुरघोडी करण्याचे संदर्भ आपल्याला जगण्यात आणि ओव्यांमध्येही सापडतात. बाईचं अस्तित्व, तिची ओळख, तिला मिळणारा मान सन्मान कायम घरच्या पुरुषांच्या संदर्भात असतो – मग तो भाऊ असो, बाप असो किंवा या ओव्यांमध्ये येतो तसा नवरा किंवा मुलाचा संदर्भ असो. समाजातलं तिचं हे दुय्यम स्थान आणि पुरुषावरचं अवलंबन आपल्याला समजून येतं.

या ओव्यांमध्ये एक जुनी जाणती विवाहित आणि म्हणूनच ‘मानाची’ बाई एका तरुण स्त्रीबद्दल बोलतीये. ती देखणी आणि मोकळ्या स्वभावाची असल्याने तिच्याविषयी संशय घेतला जातोय. पहिल्या तीन ओव्या एका तरुण ‘अभांड’ बाईच्या वागण्याविषयी आहेत. तिचं वागणं इतकं अवचित आहे की जणू तिने “वळचणीचं पाणी आढ्याला नेलं.” आणि ती इतक्या काही खुरापती काढत असते, ‘कधी भरली घागर रिती होते’, तर कधी ‘भरल्या बारवात ती कासव सोडते.’ दुसरीच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी ती काय काय करते असं सगळं वर्णन या ओव्यांमधून येतं.

PHOTO • Antara Raman

“पाण्याला जाती नार, हिच्या घागरीमधी पेरु, अशी तिला ना हसायला, बाळ माझं थट्टाखोरु”

पुढच्या १४ ओव्या एका नवतीच्या नारीचं, भर तारुण्यात असलेल्या एकीच्या वागण्याबद्दल आहेत. या नारीच्या सौंदर्याला आपला पती भुलेल अशी भीती वाटतीये. त्यामुळे मग ही गरती बाई तिच्या देखणेपणाला “तुझ्या नवतीचं मोल, माझ्या लुगड्याला दिलं” किंवा “तुझ्या नवतीचं मोल, माझ्या पायाची जोडवी” असं भलंबुरं बोलते. आपला मुलगा या नवतीच्या नारीबरोबर थट्टा मस्करी करतंय त्याबद्दलही ओवीत गातायत. ओव्यांमध्ये बाया आपल्या मुलाला किंवा धाकट्या भावाला कायम लाडाने राघु असं म्हणतात.

शेवटची दोन कडवी आधीच्या १७ ओव्यांहून थोडी वेगळी आहेत. आपल्या लेकाचं सैरभैर झालेलं मन परत थाऱ्यावर यावं यासाठी काय उपाय करता येईल त्याबद्दल या बाया गातायत. आपला लेक वाघासारखा आहे, त्याला साखळीने बांधून टाकणं शक्य नाही त्यामुळे त्याचं लग्न करून द्यावं असं आईला वाटतं. आपली सून घरी यावी अशी इच्छा ती व्यक्त करते. सासू झाल्यावर या नव्या नारीवर आपला काबू राहील अशी सुप्त इच्छाही तिच्या मनात असावी. आणि कदाचित असंही असेल की आपल्या लेकाने लग्नाबाहेर, चालीरिती सोडून, पुरुषसत्ताक व्यवस्था सोडून एखादं नातं जोडू नये म्हणूनही लग्नाची इच्छा व्यक्त होत असेल. आणि एकदा लग्न झालं की बाहेर कुठे लक्ष जाणार नाही असा भाबडा विश्वास असेल मनात.

यातल्या अनेक ओव्यांच्या शेवटी “ना बाई” असे शब्द येतात. एकमेकींशी गप्पा मारत असल्यासारख्या या ओव्या गायल्या जातात.

या एकोणीस ओव्या पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या नांदगावच्या शाहू कांबळे आणि कुसुम सोनवणे आणि खडकवाडीच्या तारा उभे या तिघींनी गायल्या आहेत. ५ ऑक्टोबर १९९९ रोजी जात्यावरच्या ओव्या प्रकल्प सुरू करणाऱ्या हेमा राईरकर आणि जी प्वॉतवाँ यांच्या पुण्यातल्या घरी या ओव्या ध्वनीमुद्रित केल्या गेल्या.

तारा उभे, कुसुम सोनवणे आणि शाहू कांबळे यांच्या आवाजात या ओव्या ऐका

अभांड नारीनी, हिनी कुभांड जोडिलं
वळचणीचं पाणी हिनं आढ्याला काढियलं, ना बाई

अशी अभांड नारीनी हिची कुभांड झाली किती
ही गं भरली घागयीर ही गं कशानी झाली रिती, ना बाई

असं अभांड नारीनी, हिनी कुभांड जोडिलं
असं भरलं बारवत, हिनी कासव सोडिलं, ना बाई

नवनातीच्या नारी, माझ्या वाड्याला घाली खेपा
असं पोटीचा माझा राघु, माझा फुलला सोनचाफा, ना बाई

अशी नवतीची नारी उभी राहूनी मशी बोल
तुझ्या नवतीचं मोल, माझ्या लुगड्याला दिलं, ना बाई

नवतीची नारी, झाली मजला आडयेवी
तुझ्या नवतीचं मोल, माझ्या पायाची जोडयवी, ना बाई

नवनातीची नारी, नवती करिती झणुझणा
नवती जाईल निघुनी, माशा करतील भणाभणा, ना बाई

बाई नवनातीची नारी, खाली बसुनी बोलाईना
अशी बांडाचं लुगईडं, तुझ्या जरीला तोलाईना, ना बाई

नवतीची नारी नवती कुणाला दावियती
कशी कुकवानाच्या खाली, काळं कशाला लावियती, ना बाई

नवतीची नारी तुझी नवती जालीम
तुझ्या ना वाटंवरी, माझ्या बाळाची तालीम, ना बाई

नवनातीच्या नारी नवती घ्यावीस आवरुनी
अशी पोटीचं माझं बाळ, बन्सी गेलेत बावरुनी, ना बाई

पाण्याला जाती नार, हिच्या घागरीमधी पेरु
अशी तिला ना हसायला, बाळ माझं थट्टाखोरु, ना बाई

नवतीची नार, माझ्या वाड्याला येती जाती
बाई माझ्या ना बाळाची, टोपी वलणीला पहाती, ना बाई

अशी नार जाती पाण्या, येर टाकूनी टाक्याईला
अशी पोटीचं माझं बाळ, उभा शिपाई नाक्याला, ना बाई

अशी नार जाती पाण्या, येर टाकूनी बारवंला
अशी नवतीचा माझा बाळ, उभा शिपाई पहाऱ्याला

नवतीची नार, माझ्या वाड्याला येती जाती
बाई आता ना माझा बाळ, घरी नाही ना सांगू किती, ना बाई

अशी माझ्या ना अंगणात, तान्ह्या बाळाची बाळुती
अशी वलांडूनी गेली, जळू तिची नवती, ना बाई

नवतीच्या नारी गं, नको हिंडूस मोकळी गं
आणा घोडं, करा साडं, जाऊ द्या वरात
बाळा माझ्याची नवरी गं येऊ द्या घरात (२)

बाळाला माझ्या गं, नाही वाघ्याला साखळी गं
अगं रखु, काय गं सांगू, काही बघतं
दाऱ्यावर चंद्र जनी गं, लगीन लागतं
आणा घोडं, करा साडं, जाऊ द्या वरात
बाळा माझ्याची नवरी गं येऊ द्या घरात (२)


PHOTO • Patrick Faucher

गायिकाः ताराबाई उभे

गावः कोळावडे

वाडीः खडकवाडी

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः मराठा

वयः ७० वर्षे

अपत्यं: तीन मुली

व्यवसायः शेतकरी. त्यांच्या कुटुंबाची एक एकर जमीन असून त्यात तांदूळ, गहू, नाचणी आणि वरई अशी पिकं घेतात.


PHOTO • Namita Waikar

गायिकाः कुसुम सोनवणे

गावः नांदगाव

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः नवबौद्ध

वयः ७३

अपत्यं: दोन मुलगे, दोन मुली

व्यवसायः शेती


PHOTO • Samyukta Shastri

गायिकाः शाहू कांबळे

गावः नांदगाव

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः नव बौद्ध

वयः ७० (ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं)

अपत्यं: दोन मुलं, दोन मुली

व्यवसायः शेती

पोस्टर - ऊर्जा

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा.

ਨਮਿਤਾ ਵਾਇਕਰ ਇੱਕ ਲੇਖਿਕਾ, ਤਰਜਮਾਕਾਰ ਅਤੇ ਪੀਪਲਸ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਵਿਖੇ ਪ੍ਰਬੰਧਕੀ ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਹ 2018 ਵਿੱਚ ਪ੍ਰਕਾਸ਼ਤ 'The Long March' ਨਾਵਲ ਦੀ ਰਚੇਤਾ ਹਨ।

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

ਪਾਰੀ ਗ੍ਰਿੰਡਮਿਲ ਸੌਂਗਸ ਪ੍ਰਾਜੈਕਟ ਟੀਮ: ਆਸ਼ਾ ਓਗਲੇ (ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ); ਬਰਨਾਰਡ ਬੇਲ (ਡਿਜੀਟੀਜੇਸ਼ਨ, ਡਾਟਾਬੇਸ ਡਿਜਾਇਨ, ਡਿਵਲਪਮੈਂਟ ਐਂਡ ਮੇਨਟੰਨੈਂਸ); ਜਤਿੰਦਰ ਮੇਡ (ਟ੍ਰਾਂਸਕ੍ਰਿਪਸ਼ਨ, ਤਰਜ਼ਮਾ ਸਹਿਯੋਗੀ); ਨਮਿਤਾ ਵਾਈਕਰ (ਪ੍ਰਾਜੈਕਟ ਲੀਡ ਅਤੇ ਨਿਰੀਖਕ); ਰਜਨੀ ਖਾਲਾਦਕਰ (ਡਾਟਾ ਐਂਟਰੀ)।

Other stories by PARI GSP Team
Illustration : Antara Raman

ਅੰਤਰਾ ਰਮਨ ਚਿਤਰਕ ਹਨ ਅਤੇ ਉਹ ਸਮਾਜਿਕ ਪ੍ਰਕਿਰਿਆਵਾਂ ਦੇ ਹਿੱਤਾਂ ਅਤੇ ਮਿਥਿਆਸ ਦੀ ਕਲਪਨਾ ਨਾਲ਼ ਜੁੜੀ ਹੋਈ ਵੈੱਬਸਾਈਟ ਡਿਜਾਈਨਰ ਹਨ। ਉਹ ਸ਼੍ਰਿਸ਼ਟੀ ਇੰਸਟੀਚਿਊਟ ਆਫ਼ ਆਰਟ, ਡਿਜਾਇਨ ਐਂਡ ਟਕਨਾਲੋਜੀ, ਬੰਗਲੁਰੂ ਤੋਂ ਗ੍ਰੈਜੁਏਟ ਹਨ, ਉਹ ਮੰਨਦੀ ਹਨ ਕਿ ਕਹਾਣੀ-ਕਹਿਣ ਅਤੇ ਚਿਤਰਣ ਦੇ ਇਹ ਸੰਸਾਰ ਪ੍ਰਤੀਕਾਤਮਕ ਹਨ।

Other stories by Antara Raman
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale