पुणे जिल्ह्यातल्या ७२ वर्षांच्या शेतकरी असणाऱ्या कुसुम सोनावणे बाईच्या अनंत आणि बिनमोल श्रमांबद्दल गातात – तितकंच नाही, जन्मापासून मोठं होईपर्यंत तिच्या आयुष्याच्या इतरही अनेक पैलूंबाबत.
आगीच्या गं नेट ओल्या जळती साययरी
अशी ना किती गं कष्ट करु धस ना त्या माहेयरी
अशी बाई आगिनीच्या नेट वला जळतो गोईला
बाई किती कष्ट करा धस नाही त्या बाईला
सुमारे वीस वर्षांपूर्वी कुसुम
सोनावणेंनी गायलेल्या या ओव्या आपल्याला जाणीव करून देतात की शेती असो, घरकाम असो
किंवा घरच्यांची काळजी – बाईच्या श्रमाची दखलच घेतली जात नाही.
“गडी माणसं शेतात काम करतात. पण शेतकरी बाया किती तरी जास्त काम करत असतात,” ७२ वर्षांच्य कुसुमताई सांगतात. आयुष्यभर त्यांनी शेती केली आहे. “शेतजमिनी अजून पण टिकून आहेत कारण बाया आहेत. पण आता काही पुरुष माणसं हात मिळवणी करून हे सगळं उद्ध्वस्त करायला निघाली आहेत.”
या वयातही कुसुमताई नांदगावातल्या आपल्या २.५ एकरात शेती करतायत. “तूर तयार आहे. कापणीला शेतात आलीये मी,” मुळशी तालुक्यातल्या आपल्या गावातून कुसुमताई माझ्याशी फोनवर बोलतायत. मार्च महिन्यातली दुपार तापलीये. कुसुमताई त्यांच्या शेतात भात आणि हरभराही घेतात.
त्या स्वतः शेतात काम करत असल्या तरी त्या बाया आणि गडी मजूर लावून कामं करून घेतात. “मला एकटीला सगळं होत नाही,” त्या म्हणतात. काही वर्षांपूर्वी त्यांचे पती, मुकुंदा सोनवणे यांचं निधन झालं. त्यांच्या चार मुलांपैकी एकच जण शेती करतो. त्यांची मुलगी उषा ओवाळ, वय ५० मुळशीच्या जामगावात राहते. दुसरा मुलगा आणि मुलगी शेतीत नाहीत.
१९८० सालापासून कुसुमताई गरीब डोंगरी संघटनेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत आणि मुळशी तालुक्यातल्या डोंगराळ पट्ट्यामध्ये गरिबांच्या हक्कांसाठी ही संघटना संघर्ष करत आहे. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सध्या सुरु असलेल्या आंदोलनाविषयी त्यांना विचारल्यावर त्या म्हणतात की शेतीतल्या परंपरा आणि उपजीविका नष्ट करण्याचं काम सुरू आहे. “असं झालं तर शेतकऱ्याच्या पोरांनी काय करायचं? दिल्लीत आणि देशात इतरत्र देखील आंदोलन सुरू आहे ना ती फार चांगली गोष्ट आहे.”
जात्यावरच्या ओव्यांच्या या मालिकेत सादर केलेल्या या १२ ओव्या कुसुमताईंनी १९९९ साली गायलेल्या आहेत. त्यांचं ध्वनीमुद्रण हेमा राईरकर आणि गी प्वातवाँ या अभ्यासक कार्यकर्ता द्वयींसोबत काम करणाऱ्या मूळ चमूने केलं होतं.
जात्यावरच्या ओव्यांबद्दल बोलायला एका पायावर तयार असणाऱ्या कुसुमताई पहिल्या दोन ओव्यांचा अर्थ सांगतात, ज्यात बायांच्या पदरी कशी निराशा येते ते गायलं गेलंय. “एखादी बाई दिवसभर शेतात राबते, पण तिच्या माहेरात सुद्धा तिची कुणाला किंमत नाही,” त्या सांगतात. “ओलं लाकूड किंवा ओली पानं सुद्धा आगीत टाकल्यावर अखेर पेट घेतात तसंच बाईच्या कामाकडे, त्याचं किती मोल आहे त्याकडे सतत दुर्लक्ष केलं तर शेवटी ती देखील रागाने आणि निराशेने पेटून उठते.”
पुढच्या १० ओव्यांमध्ये जन्मापासून मोठं होईपर्यंत एखाद्या स्त्रीला आयुष्याचे, नातेसंबंधांचे कोणकोणते अनुभव येतात त्याबद्दल कुसुमताई गातात.
ओवीत म्हटलंय की मुलगी जन्मली म्हणजे जणू काही आई-वडलांवर संकटच कोसळलंय. कारण त्यांना मुलगा होण्याची अपेक्षा असते. मोठं होत असताना बाईला तिच्या जवळच्या मैत्रिणींपाशी मन मोकळं करावंसं वाटू शकतं पण तिच्या शेजारणींना तिचं काही ऐकायचंच नसतं. एखादी बाई सगळ्यात खूश कधी असते तर जेव्हा तिला तिच्या आईशी मनभरून मोकळं बोलता येतं. रात्रभर त्या गप्पा मारू शकतात. अगदी पहाट झालेली पण त्यांना कळत नाही.
भावासोबतच्या नात्याबद्दलच्या ओव्यांमध्ये दिसून येतं की त्याची माया एखाद्या बाईसाठी सगळ्यात मोलाची असते. त्याच्याकडून तिला भेटवस्तू किंवा पैसे नको असतात. “त्याला फक्त घरी यायला सांगा,” त्या म्हणतात. आणखी एका ओवीमध्ये असं म्हटलंय की भाऊ हा अगदी आरशासारखा असतो, प्रामाणिक आणि विश्वासार्ह.
त्या म्हणतात की बाईला स्वतःवर विश्वास असायला पाहिजे, तिने कुणावर अवलंबून राहू नये कारण, ओवीत पुढे गायलंय की सख्खा दीर सुद्धा तिचा फायदा घेऊ शखतो. या ओवीत बाईच्या आयुष्याची तुलना, खासकरून विवाहित बाईच्या आयुष्याची तुलना सापासारख्या दोरीने बांधलेल्या होडीशी केली आहे.
पुढे ओवी गाणारी म्हणते की आपलं आयुष्य किती चांगलं याचा गर्व बाईने करू नये. खवळलेल्या पाण्यातल्या होडीचा दाखला देऊन त्या म्हणतात की नाव कधीही पाण्यात जाऊ शकते. म्हणजेच आजूबाजूचं कुणीही तिचा घात करू शकतं. आपल्या पुरुषप्रधान समाजात बाईच्या आयुष्यात किती अनिश्चितता आहे याकडेच या ओव्या लक्ष वेधून घेतात.
पुढच्या ओवीत समाज जिची उपहासाने “नाचारीण” म्हणून हेटाळणी करतो त्या सासूविषयी थोडी सहानुभूती दिसून येते. ओवीत म्हटलंय हीच सासू आपल्या मोती-पवळ्यासारख्या मुलीलाही मोठं करत असते.
शेवटाकडच्या ओवीमध्ये काळी चंद्रकळा मिळाल्यावर एखादी स्त्री आपल्या भाच्याकडून कशी आनंदून जाते त्याचं वर्णन केलं आहे. संक्रांतीच्या दिवशी काळी चंद्रकळा नेसण्याचा रिवाज महाराष्ट्रात होता. मग ही बाई तिच्या बहिणीला सांगते की साडीचा पदर “मुंबईच्या” आधुनिक विणीचा आहे.
आणि अगदी शेवटच्या ओवीत गाणारी आपल्या मैत्रिणीला म्हणते, “आपली मैत्री घट्ट व्हायला किती तरी काळ गेलाय.” पण आपल्या दोघीत कुणी वाईट भाव मनात घेऊन घुसलं तर या मैत्रीचा नाजूक धागा तुटायलाही वेळ लागणार नाही.
“या ओव्यांमधून बायांचं खरं आयुष्य आपल्याला पहायला मिळतं,” कुसुमताई सांगतात. “आम्हाला मोकळ्याने कुणाला काही बोलता-विचारता यायचं नाही, आमचं सुख-दुःख वाटून घ्यायला मग आम्ही या जात्याशी बोलायचो.” जात्याशी बाईची अगदी जिवाभावाची मैत्री होती, त्या पुढे सांगतात.
फोनवर निरोप घेण्याआधी त्या म्हणतात, “जात्यावरच्या ओव्यांविषयी काही विचारायचं असेल ना कुठल्याही दिवशी, कुठल्याही वेळी मला फोन करा.”
आगीच्या
गं नेट ओल्या जळती साययरी
अशी ना
किती गं कष्ट करु धस ना त्या माहेयरी
अशी
बाई आगिनीच्या नेट वला जळतो गोईला
बाई
किती कष्ट करा धस नाही त्या बाईला
आगिनीच्या
नेट वली जळती लाकडं
अशी
जलमा आली लेक आई बापाला साकडं
बाई
गुजामधी गं गूज येवढ्या ना गुजाच्या गुजराणी
अशी
उठू उठू गं गेल्या या तर मावच्या शेजारिणी
बाई
गुजामधी गं गूज माय लेकी गुज गोड
बाई
मावळाया गेली ही तर चांदणी सोप्याआड
बाई
नको मला घेवू नको माझं तू रे चालवू
सांगते
रे माझ्या बंधू मला शब्दानी बोलावू
नको
नारी म्हणू दिरा भायाचा आसरा
पाण्यामधी
नाव तिला तागाचा कासरा
नको
नारी गं म्हणू माझं असंच चालणं
बाई
पाण्यातील नाव जरा येगं ढकलणं
अशी
भावजय गं बाई कुंकू लावावं दारात
बाई
आता माझा गं बंधू उभा आरसा दारात
लेकाच्या
माईला नका म्हणू नाचारीण
माझी
शकुंतला मोती पवळ्याची आचारीण
बाई
काळी चंद्रकळा हिचा पदर मुंबई
सांगते
गं तारुबाई तुझ्या बाळाची कमाई
तुझा
माझा भावपणा लई दि बाई लागलं जोडाया
कुणी
कालविल विष खिन न लागं मोडाया
कलाकारः कुसुम सोनावणे
गावः
नांदगाव
तालुकाः
मुळशी
जिल्हाः
पुणे
जातः
नव बौद्ध
वयः
७२
अपत्यं:
दोन मुलं, दोन मुली
व्यवसायः
शेती
या ओव्या ५ ऑक्टोबर १९९९ रोजी
ध्वनिमुद्रित केल्या आहेत.
पोस्टरः सिंचिता माजी
हेमा राईरकर आणि गी प्वातवाँ यांनी
सुरू केलेल्या मूळच्या जात्यावरच्या ओव्या प्रकल्पाबद्दल
अधिक वाचा
.
अनुवादः मेधा काळे