फाट!
टुपकीतून पेंग फळाचा बार काढला की हा अगदी असा आवाज येतो. छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये साजऱ्या होणाऱ्या गोन्चा जत्रेत देवाला अशी मानवंदना देतात.
टुपकी बांबूपासून बनवलेली एक बंदूक आहे आणि पेंग नावाचं त्यातलं फळ म्हणजे छर्रा. जगन्नाथाची रथयात्रेच्या वेळी भरणाऱ्या जत्रेत देवाला मानवंदना देण्यासाठी या बंदुकीच्या फैरी झाडल्या जातात. जुलै महिन्यात भरणाऱ्या या जत्रेसाठी राज्याच्या बस्तर भागातले हजारो लोक इथे येतात.
“आसपासच्या गावातले लोक गोन्चासाठी इथे येतात आणि हो, टुपकीसुद्धा विकत घेतात तेव्हा,” जगदलपूरचे रहिवासी वनमाळी पाणिग्रही सांगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, जगन्नाथाच्या रथयात्रेत टुपकीच्या फैरी झडल्या नाहीत असं आजवर तरी कधी झालं नाही.
पेंग हे एक हिरवट पिवळं बोरासारखं फळ आहे. आसपासच्या जंगलात मलकनगिनी नावाच्या वेलाला (Celastrus paniculatus willd) या फळाचे घोस लागतात.
गोन्चा हा सण पुरीमध्येही साजरा करतात. पण टुपकी आणि पेंगांचा रिवाज फक्त बस्तरमध्येच आढळून येतो. कधी काळी या बांबूच्या बंदुकींचा वापर वन्यप्राण्यांना पळवून लावण्यासाठी केला जात असे.
चाळिशी पार केलेले सोनसाय बघेल जमावडा गावाचे रहिवासी असून शेती करतात आणि बुरुडकाम. ते धुरवा आदिवासी आहेत. जुलै महिन्यात होणाऱ्या या सणाची तयारी म्हणून ते आणि त्यांची बायको जून महिन्यातच टुपकी बनवायला सुरुवात करतात. “दर वर्षी सणाच्या आधी आम्ही टुपकी बनवायला लागतो. जंगलातून बांबू आणून वाळवायला लागतो,” ते सांगतात.
टुपकी बनवण्यासाठी कुऱ्हाड आणि विळ्यासारखी हत्यारं वापरून बांबू आतून पोकळ केला जातो. त्यानंतर रंगीबेरंगी पानं आणि कागदांनी ही टुपकी सजवली जाते.
“जंगलात पेंगं पिकली की घेऊन यायची. मार्च महिन्यानंतर तुम्हाला पेंगं मिळतात. अंदाजे शेकडा फळांचा घोस १० रुपयाला मिळतो,” सोनसाय सांगतात. “हे औषधी फळ आहे. त्याचं तेल संधिवात आणि सांधेदुखीवरचं औषध आहे.” आणि हो याचे छर्रेही एकदम मस्त होतात.
टुपकी बनवणं आणि विकणं हा या भागातल्या अनेकांचा व्यवसाय आहे. सणाच्या आधी आसपासच्या गावांमध्ये टुपकी बनवणारे कित्येक जण तुम्हाला पहायला मिळतील. एक टुपकी ३५-४० रुपयांना मिळते. बघेल आपल्या घरापासून १२ किलोमीटरवर असलेल्या जगदलपूर शहरात जाऊन तिथे टुपक्या विकतात. ते सांगतात की ३० वर्षांपूर्वी याच टुपकीची किंमत फक्त दोन रुपये होती.
बस्तर जिल्ह्याच्या जगदलपूर तालुक्यात आपल्या गावी बघेल चार एकर रानात भातशेती करतात. जमावडा हे ७८० उंबऱ्याचं गाव असून इथले ८७ टक्के लोक धुरवा आणि माडिया आदिवासी आहेत (जनगणना, २०११).
जगन्नाथासंबंधी ज्या कथा सांगितल्या जातात त्यामध्ये आपल्याला गोन्चा जत्रेचं मूळ सापडतं. चालुक्य राजवटीतला बस्तरचा राजा पुरुषोत्तम देव जगन्नाथाला चांदी आणि सोनं वाहण्यासाठी पुरीला गेला. त्यावर खूश होऊन पुरीच्या राजाने जगन्नाथ मंदिरातल्या पुजाऱ्यांना सांगून पुरुषोत्तम राजाला १६ चाकांचा रथ भेट म्हणून दिला.
साल आणि सागाच्या लाकडाने बनवलेला सोळा चाकाचा हा रथ मोडून त्याची चार चाकं बस्तरच्या जगन्नाथाला वाहण्यात आली. आणि तेव्हापासून बस्तरची गोन्चा जत्रा म्हणजेच रथयात्रा सुरू झाली. (उरलेला १२ चाकांचा रथ माता दंतेश्वरीला वाहण्यात आला.)
पुरुषोत्तम देव राजाने तेव्हा टुपकी पाहिली आणि गोन्चा जत्रेत तिच्या फैरी झाडायला परवानगी दिली. जत्रेत जगन्नाथाला प्रसाद म्हणून फणसाचे गरे चढवले जातात. हलबी भाषेत त्यांना ‘पणोसो कुआ’ म्हणतात. जगदलपूरच्या गोन्चा जत्रेत फणसाच्या गऱ्यांची रेलचैल हेही मोठं आकर्षण असतं बरं.