“याला इथे हलबी आणि गोंडीमध्ये घोडोंडी म्हणतात. म्हणजे घोडेस्वारी. या काठ्या चालवताना किंवा त्यांच्यावरून धावताना तुम्हाला घोडा चालवत असल्यासारखी मजा घेता येते,” किबईबलेंगा गावचे (जनगणनेत किवईबलेगा अशी नोंद) एक तरुण शिक्षक आणि रहिवासी असणारे गौतम सेथिया सांगतात.
छत्तीसगडच्या बस्तरमधल्या कोंडागाव जिल्ह्यातल्या कोंडागाव तालुक्यात हे गाव येतं. या गावाच्या झगदहीनपारा या पाड्यावर किशोरवयीन मुलं – इथे मुलींना मी घोडोंडी खेळताना पाहिलं नाही – हरेली अमावास्येच्या (जुलै-ऑगस्ट दरम्यान) दिवशी या काठ्या चालवतात. हा खेळ नयाखानी (छत्तीसगडच्या इतर भागात नवाखानी म्हणतात), म्हणजे ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये गणेश चतुर्थीनंतर – पर्यंत चालतो.