"१०० दिवस कधीच नाही, या वर्षीचं म्हणाल तर आतापर्यंत फक्त ५० दिवस मिळालंय, बास्स," आर. वनजा सांगते. अंदाजे १८ महिला आणि २-३ पुरुषांसोबत ती बंगालामेडू पाड्यातील वेलीकातान मारम् म्हणजेच बाभळीच्या झाडाच्या विरळ छायेत जमिनीवर बसली होती. तमिळनाडूत नूर नाल वेलई (शंभर दिवस काम) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मनरेगाच्या कामांबद्दल ते चर्चा करत होते, आपल्याला मिळणाऱ्या मजुरीचा हिशोब लावत होते. २०१९ च्या डिसेंबरमधली सकाळ होती. वनजा २० वर्षांची असेल, आणि या पाड्यावरच्या ३५ इरुला कुटुंबांमधल्या बहुतांश वयस्क व्यक्तींप्रमाणे ती रोजंदारी करते.
तमिळनाडूच्या तिरुवल्लुर जिल्ह्यातील तिरुत्तानी तालुक्यातील चेरुक्कानुर पंचायतीचा भाग असलेल्या या पाड्यातील पुरुष सहसा नरेगा सोडून इतर कामं शोधतात. ते शेतजमीनींलगत मोठ्या चारी खणतात, आमरायांना पाणी देतात, बांधकामावर मजुरी करतात, परात उभारण्यासाठी, कागदाचा लगदा, सरपण आणि इतर वापरासाठी लागणारी सुरूची झाडं छाटतात. दिवसभराच्या कामाचे त्यांना सहसा रू. ३०० मिळतात.
पण ही सगळी कामं हंगामी आणि अनिश्चित स्वरूपाची आहेत. पावसाळ्यात त्यांना काम मिळत नाही त्या दिवशी हे इरुला लोक कसल्याही कमाईशिवाय भागवतात. अन्नासाठी आसपासच्या जंगलांमध्ये लहान प्राण्यांची शिकार करतात, किंवा खाण्यासाठी म्हणून फळं आणि कंद शोधतात. तमिळनाडूमध्ये त्यांची 'विशेष दुर्बल आदिवासी गट' म्हणून नोंद केली आहे (पाहा: बंगालामेडूतला जमिनीखालचा खजिना आणि On a different route with rats in Bangalamedu)
आणि महिलांना ही अशी पडेल ती कामं मिळणं म्हणजे अलभ्य लाभ. जानेवारी-फेब्रुवारी ते मे-जून दरम्यान कधी कधी त्या आपल्या नवऱ्यासोबत जवळच्या वीटभट्ट्यांवर कामाला जातात. पण, हे कामही अधून मधून मिळतं, आणि अख्ख्या हंगामात एका जोडप्याची फार तर रू. ६,००० इतकी कमाई होते.














