“या सरकारला शेतकऱ्याची काहीही काळजी नाही. ते बड्या कंपन्यांच्या बाजूने आहेत. बाजारसमित्या देखील त्यांना देऊ करतायत. त्यांची मदत केली जाते, पण शेतकऱ्यांची का नाही?” उत्तर कर्नाटकातल्या बेळगावी जिल्ह्याच्या बेळगावी तालुक्यातनं आलेल्या शेतमजुरी करणाऱ्या शांता कांबळे विचारतात.
बंगळुरू शहराच्या मध्यवर्ती भागात मॅजेस्टिक परिसरात असलेल्या बंगळुरू सिटी रेल्वे स्थानकाजवळच्या दुभाजकावर बसलेल्या शांताबाई आजूबाजूला सुरू असलेल्या ‘केंद्र सरकारा धिक्कारा’च्या (केंद्र सरकारचा धिक्कार असो) घोषणा ऐकत होत्या.
पन्नाशीच्या शांता प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी २६ जानेवारी रोजी सकाळी बसने बंगलुरूला पोचल्या. त्या दिवशी सकाळी कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आणि शेतमजूर फ्रीडम पार्क येथे जाण्यासाठी बसने आणि रेल्वेने मॅजेस्टिकमध्ये येत होते. तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीमध्ये काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला समर्थन देण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत ते सहभागी होणार आहेत.
तिकडे, गावी शांताबाईंना दिवसाच्या मजुरीसाठी २८० रुपये रोज मिळतो. बटाटा, डाळी आणि भुईमुगाची लावण आणि खुरपणीची कामं त्या करतात. शेतात काम नसेल तर त्या मनरेगाच्या कामावर जातात. २८ आणि २५ वर्षे वयाची त्यांची दोघं मुलं मनरेगाअंतर्गत उपलब्ध असणारी बांधकामाची कामं करतात.
“टाळेबंदीच्या काळात आम्हाल धड खायला-प्यायला मिळालंच नाही,” त्या सांगतात. “सरकारला आमची काळजीच नाहीये.”
रेल्वे स्थानकाच्या वाहनतळापाशी असणारे काही शेतकरी ‘बाजारसमित्या रहायलाच पाहिजेत. नवे कायदे रद्द झालेच पाहिजेत’ अशा घोषणा देत होते.








