१० वर्षांच्या नूतन ब्राह्मणेला उत्सुकता लागून राहिली होती, आपली आजी मुंबईला मोर्चाला जाते म्हणजे काय. मग जिजाबाई ब्राह्मणेंनी तिलाही सोबत आणायचं ठरवलं. “मी तिला आणली, म्हणजे तिलाही समजेल की आदिवास्यांचे प्रश्न काय आहेत ते,” २६ जानेवारी रोजी तापत्या उन्हात मुंबईच्या आझाद मैदानात बसलेल्या जिजाबाई सांगत होत्या.
“आम्ही इथे दिल्लीत [तीन कृषी कायद्यांविरोधात] आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला आलोय. पण आमच्या गावातले प्रश्न देखील आम्ही इथे घेऊन आलोय,” ६५ वर्षीय जिजाबाई सांगतात. त्या नूतनला घेऊन २५-२६ जानेवारीला आझाद मैदानात मुक्कामी होत्या.
नाशिक जिल्ह्याच्या आंबेवणी गावातून इतर शेतकऱ्यांसोबत त्या २३ जानेवारी रोजी निघाल्या.
गेली कित्येक दशकं महादेव कोळी आदिवासी असणाऱ्या जिजाबाई आणि त्यांचे पती सत्तरीचे श्रावण दिंडोरी तालुक्यातली त्यांची पाच एकर वनजमीन कसतायत. २००६ साली वन हक्क कायदा पारित झाल्यानंतर त्यांना त्यांच्या कसत्या जमिनीचा मालकी हक्क मिळायला पाहिजे होता. “आमच्या नावावर एक एकराहून कमी जमीन मिळालीये. त्यातच आम्ही भात, गहू, उडीद आणि तूर घेतो,” त्या सांगतात. “बाकी फॉरेस्टच्या ताब्यात आहे. आणि आम्ही त्या जमिनीकडे गेलो तरी तिथले ऑफिसर आम्हाला त्रास देतात.”
मुंबईतल्या प्रजासत्ताक दिनाच्या आंदोलनात नूतनला जाऊ द्यायला तिचे वडील, जिजाबाईंचा मुलगा संजय लगेच तयार झाला. “तिला २०१८ साली किसान लाँग मार्चलाच यायचं होतं. तेव्हा आम्ही नाशिकहून मुंबईला एक आठवडाभर चालून आलो होतो. पण तेव्हा ती खूप लहान होती. तिला जमेल का, मला खात्री नव्हती. आता ती मोठी झालीये, आणि यंदा फार चालायचं नव्हतं,” जिजाबाई सांगतात.






