“गावात एक ट्रॅक्टर ट्रॉली फिरत होती आणि आंदोलनाच्या ठिकाणी पाठवण्यासाठी प्रत्येकाला जे काही देणं शक्य आहे ते द्यायला सांगत होते. मी ५०० रुपये, तीन लिटर दूध आणि वाटीभर साखर दिली,” हरयाणाच्या हिसार जिल्ह्यातल्या पेटवारची ३४ वर्षांची सोनिया पेटवार सांगते.
२०२० चा डिसेंबरचा मध्य होता, जेव्हा नरनौंद तहसिलातल्या या गावात पहिल्यांदा रेशन गोळा करण्यात आलं होतं. जमा झालेलं सामान इथून १०५ किलोमीटरवर असलेल्या दिल्ली हरयाणा सीमेवरच्या टिक्रीला पाठवण्यात आलं, जिथे २६ नोव्हेंबरपासून तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.
“माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. म्हणून मी फोडलेलं लाकूड दिलं,” सोनियाच्याच नात्यात असलेल्या ६० वर्षीय शांती देवी सांगतात. “तेव्हा थंडी होती. मी विचार केला आंदोलन करणाऱ्यांना शेकोट्या करण्यासाठी लाकडाचा उपयोग होईल.”
त्यानंतर पेटवारमध्ये दुसऱ्यांदा ट्रॉली फिरली ती जानेवारीच्या सुरुवातीला. “आंदोलनाच्या ठिकाणी कधीही कुणीही निघालं की गावातली प्रत्येक बाई सोबत काही ना काही द्यायची,” सोनिया सांगते. ज्यांच्याकडे दुभती जनावरं होती, त्या दूध द्यायच्या. त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिलेला हा पाठिंबाच होता – पडद्याआडचा.
शेतकरी आंदोलन सुरू होऊन तीन महिने झालेत आणि हजारो, लाखो शेतकरी – स्त्रिया आणि पुरुष – आजही दिल्लीच्या वेशीवर, खास करून टिक्री आणि सिंघु (दिल्ली-हरयाणा सीमेवर) आणि गाझीपूर (दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर) आंदोलन करतायत.
मी सर्वात पहिल्यांदा सोनियाला भेटले ती ३ फेब्रुवारीच्या दुपारी. त्या पेटवारच्या १५० स्त्रियांसोबत आल्या होत्या ज्या आंदोलनाला आल्या होत्या आणि आता परत जायच्या तयारीत होत्या. पेटवार हे सुमारे १०,००० लोकसंख्येचं गाव आहे (जनगणना, २०११). “असं आंदोलन पाहिलं की कसा जोश येतो,” ७ फेब्रुवारीला मी त्यांच्या घरी गेले तेव्हा त्या मला म्हणाल्या.










