विक्रम त्या रात्री घरी परतला नाही, तरी त्याची आई प्रिया निश्चिंत होती. तो कामाठीपुऱ्यातल्या आणखी एका गल्लीत एका घरवालीकडे काम करायचा आणि सहसा रात्री २:०० पर्यंत घरी यायचा किंवा कधी कधी त्याच्या कामाच्या ठिकाणी झोपी गेला तर दुसऱ्या दिवशी सकाळी.
तिने त्याला फोन लावून पाहिला, पण काहीच उत्तर नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी, ८ ऑगस्ट रोजीही तो आला नाही, तेव्हा मात्र तिला काळजी वाटू लागली. तिने मध्य मुंबईच्या नागपाडा पोलीस चौकीत व्यक्ती हरवल्याची तक्रार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. "तो मुंबई सेंट्रलमध्ये एका मॉलशेजारी पैदलपुलाजवळ दिसला होता."
तिची घालमेल वाढू लागली. "कोणी पळवलं तर नसेल ना? त्याला नवी बिमारी [कोविड] तरी झाली नसेल ना?" ती विचार करु लागली. "या भागात कोणाला काय झालं याची कोणी फिकिरही करत नाही," ती म्हणते.
विक्रम मात्र एकटाच प्रवासावर निघाला होता, ज्याची तयारी त्याने अगोदरच करून ठेवली होती. त्याची तिशीतली आई टाळेबंदी दरम्यान धंदा करू शकली नव्हती, आणि तिची आर्थिक परिस्थिती खालावत चाललीये आणि कर्जाचा बोजा वाढतोय हे पाहत होता. त्याची नऊ वर्षांची बहीण रिद्धी शेजारच्या मदनपुऱ्यातल्या वसतिगृहातून घरी परत आली होती, आणि घर सामाजिक संस्थांनी वाटलेल्या राशनच्या पाकिटांवर चालत होतं. (या कहाणीतील सगळी नावं बदलली आहेत.)
आणि मार्चमध्ये टाळेबंदी झाल्यानंतर विक्रम जायचा ती भायखळ्यातील नगरपालिकेची शाळा देखील बंद झाली होती. म्हणून १५ वर्षांचा विक्रम बारीकसारीक कामं करू लागला.
घरी स्वयंपाकाला रोज रू. ६०-८० रुपयांचं घासलेट लागायचं. कामाठीपुऱ्यातील त्यांच्या लहानशा खोलीचं भाडं देणं त्यांना अवघड होत चाललं होतं. औषधपाण्याला पैसा हवा होता, आणि आधीचं कर्ज फेडायलाही. प्रिया तिच्या गिऱ्हाईकांकडून किंवा आसपासच्या लोकांकडून आणखी कर्ज घेत राहिली. गेल्या काही वर्षांत एका सावकाराकडून घेतलेलं कर्ज व्याज धरून रू. ६२,००० वर गेलं होतं. आणि गेले सहा महिने तिला घरवालीला (कुंटणखान्याची मालकीण) महिन्याच्या रू. ६,००० भाड्याचे, कसं तरी करून निम्मेच पैसे देता आले होते, शिवाय तिने तिच्याकडून अंदाजे रू. ७,००० उधार घेतले होते.











