गाढ झोप शीला वाघमारेंसाठी गतस्मृती झाली आहे.
“मला रातभर झोपच लागत नाही... किती तरी वर्षं झाली,” ३३ वर्षांच्या शीला वाघमारे सांगतात. जमिनीवरच्या गोधडीवर बसलेल्या शीलाताईच्या दुःखाची किनार डोळ्याच्या लाल कडांमधून दिसून येतीये. रात्रभर कसा त्रास होतो हे सांगत असताना दाबून टाकलेल्या हुंदक्यांनी त्यांचं अंग हलत राहतं. “रातभर रडू येतं... असं वाटतं श्वास कोंडतोय.”
बीड जिल्ह्यात बीड शहरापासून सुमारे १० किलोमीटरवर असलेल्या राजुरी घोडका गावाच्या वेशीवर शीलाताईचं घर आहे. विटामातीच्या दोन खोल्यांमध्ये त्यांचा संसार आहे. रात्री त्यांना रडू यायला लागतं आणि कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी हुंदक्यांच्या आवाजाने तिचा नवरा माणिक आणि मुलं, कार्तिक, बाबू आणि ऋतुजा जागे होतात, त्या सांगतात. “माझ्या रडण्याने त्यांची झोप मोडते. म्हणून मग मी डोळे घट्ट बंद करून घेते आणि झोपायचा प्रयत्न करते.”
पण झोप काही येत नाही. डोळ्यातलं पाणी खळत नाही.
“मला सतत दुःखी वाटतं, मनाला चिंता लागून राहते,” शीलाताई म्हणते. जरा थांबून ती बोलू लागते तेव्हा जरा वैतागल्यासारखी वाटते. “पिशवी काढली आणि हा सगळा त्रास सुरू झाला. माझी सगळी जिंदगीच पार बदलून गेली.” २००८ साली वयाच्या फक्त २० व्या वर्षी तिची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांना अनेक त्रास जडले आहेत. आतून कोलमडून जावं इतकं दुःख, रात्रभर डोळ्याला डोळा नाही, मधूनच विनाकारण चिडचिड आणि खूप काळ टिकून राहणाऱ्या दुख्या.
“कधी कधी विनाकारण पोरांवर राग निघाया लागलाय. किती बी प्रेमानं काही मागू द्या, मी कावाया लागलीये,” शीलाताई हतबलपणे सांगते. “खूप ठरविते. तरी चिडचिडच व्हायलीये. असं का व्हाया लागलंय ते बी समजंना गेलंय.”
माणिक यांच्याशी लग्न झालं तेव्हा शीलाताई १२ वर्षाची होती. वयाची १८ वर्षं पूर्ण होण्याआधी ती तीन लेकरांची आई झाली होती.
मराठवाड्यातून दर वर्षी ऑक्टोबर ते मार्च महिन्यात किमान ८ लाख ऊस तोड कामगार गावं सोडून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊसतोडीला जातात. माणिक आणि शीलाताई त्यातलंच एक जोडपं. बाकी सहा महिने भूमीहीन असलेलं वाघमारे कुटुंब त्यांच्या गावात किंवा आजूबाजूच्या गावात शेतात मजुरीला जातं. वाघमारे नवबौद्ध आहेत.
महाराष्ट्राच्या या भागात गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेनंतर होणार हे त्रास काही नवे नाहीत. २०१९ साली बीडमध्ये ऊसतोड कामगार महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचं प्रमाण जास्त असल्याचं लक्षात आल्यानंतर शासनाने एक सत्यशोधन समिती स्थापन केली. त्यांच्या अभ्यासातून असं लक्षात आलं की मनोकायिक विकारांचं प्रमाण या महिलांमध्ये जास्त आढळून आलं.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे या समितीच्या अध्यक्ष होत्या. या समितीने जून-जुलै २०१९ दरम्यान जिल्ह्यातल्या किमान एकदा तरी ऊसतोडीसाठी स्थलांतर केलेल्या ८२,३०९ ऊसतोड कामगारांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये त्यांना आढळून आलं की १३,८६१ स्त्रियांची गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती आणि एकूण ६,३१४ म्हणजेच ४५ टक्क्यांहून अधिक जणींना शारीरिक किंवा मानसिक त्रास जाणवला आहे. झोप न लागणे, उदास वाटणे, रितं रितं वाटणे, सांधेदुखी आणि पाठदुखी, इत्यादी.
गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असून महिलेच्या आरोग्यावर तिचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम होत असतात असं डॉ. कोमल चव्हाण सांगतात. त्या मुंबईस्थित स्त्रीरोगतज्ज्ञ असून व्ही. एन. देसाई मनपा सर्वोपचार रुग्णालयात काम करतात. “वैद्यकीय भाषेत आम्ही याला शस्त्रकर्म करून आलेली रजोनिवृत्ती म्हणतो,” डॉ. चव्हाण सांगतात.
शस्त्रक्रिया होऊन गेल्यानंतर शीलाताईला अनेक प्रकारची दुखणी जडली. सांधेदुखी, डोकेदुखी, पाठदुखी आणि सततचा थकवा. “दर दोन-तीन दिवसाला, काही ना काही दुखतंच,” ती सांगते.
वेदनाशामक मलमं आणि गोळ्यांनी थोडं बरं वाटतं. “गुडघ्याला आणि पाठीला मी मलम लावते. महिन्याला दोन ट्युबा संपतात,” त्या सांगतात. १६६ रुपयाची डायक्लोफेनॅक जेलची एक ट्यूब त्या मला दाखवतात. डॉक्टरांनी त्यांना गोळ्या देखील लिहून दिल्या आहेत. महिन्यातून दोनदा थकवा जावा म्हणून सलाइनद्वारे ग्लुकोज चढवलं जातं.
घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दवाखान्यात उपचार आणि औषधांचा खर्च महिन्याला १,००० ते २,००० रुपये इतका येतो. बीडमधलं जिल्हा रुग्णालय तिच्या घरापासून १० किमी अंतरावर आहे. म्हणून मग ती जवळच्या दवाखान्यात चक्क चालत जाते. “तितक्या लांबवर गाडीघोडा करून कोण जावं?”
पण या औषधांनी मनात जी काही उलथापालथ होते त्यावर काहीच उपाय होत नाही. “असा सगळा त्रास असल्यावर का म्हणून जगावं वाटेल?”
गर्भाशय काढून टाकल्यानंतर संप्रेरकांचं संतुलन बिघडतं आणि त्यातून नैराश्य आणि चिंतेत वाढ होते. शारीरिक त्रास होतात ते वेगळेच, डॉ. अविनाश डिसूझा सांगतात. ते मुंबईमध्ये मनोविकारतज्ज्ञ आहेत. गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया किंवा बीजकोषांचं काम नीट होत नसेल तर त्यामुळे होणाऱ्या त्रासांचं प्रमाण कमी जास्त असू शकतं, ते पुढे सांगतात. “प्रत्येक बाईसाठी हा अनुभव वेगळा असू शकतो. काहींना कसलीही लक्षणं जाणवत नाहीत.”
शस्त्रक्रिया झाल्यानंतरदेखील शीलाताई माणिकभाऊबरोबर पश्चिम महाराष्ट्रात तोडीच्या कामावर जातीये. ती शक्यतो इथून ४५० किलोमीटर लांब असलेल्या कोल्हापुरातल्या एका कारखान्यावर तोडीला जाते.
“दिवसाचे १६ ते १८ तास काम करून आम्ही दररोज दोन टन ऊस तोडायचो,” शीलाताई शस्त्रक्रियेच्या आधीचं सांगते. एका ‘कोयत्याला’ एक टन ऊस तोडून मोळी बांधायचे २८० रुपये मिळायचे. कोयता म्हणजे खरं तर ऊस तोडायचं हत्यार पण तोडीच्या भाषेत ऊसतोडीला आलेल्या जोडप्याला कोयतं म्हणतात. मुकादम उचल देऊन अशा जोड्यांना कामावर आणतो.
“सहा महिन्यांच्या शेवटी आमची ५०,००० ते ७०,००० रुपयांची कमाई व्हायची,” शीलाताई सांगते. पण त्यांची शस्त्रक्रिया झाल्यापासून दिवसाला कसाबसा एक टन ऊस तोडून आणि मोळ्या बांधून होतोय. “मला जड वजन उचलता येईना गेलंय आणि पूर्वीसारखं सपासप तोडणं पण हुइना गेलंय.”
पण २०१९ साली शीला आणि माणिक यांनी घरदुरुस्तीसाठी वर्षाला ३० टक्के व्याजाने ५०,००० रुपयांची उचल घेतली होती. त्यामुळे ही रक्कम फेडेपर्यंत त्यांना काम करावंच लागणार. “संपंनाच गेलंय,” शीलाताई म्हणते.
*****
पाळीच्या काळात ऊसतोडीचं काम करणं सगळ्यात कठीण असतं. फडाजवळ कुठेच मोरी किंवा संडासाची सोय नसते आणि रहायला देखील साधी पालं टाकलेली असतात. तोडीला आलेले कामगार फडाजवळ किंवा कारखान्याजवळ राहुट्या टाकतात. त्यांची लेकरंही तिथेच त्यांच्याजवळ राहतात. “पाळीच्या काळात काम करणं लईच त्रासाचं व्हायचं,” शीला सांगतात.
एका दिवसाची सुटी म्हणजे दिवसाच्या मजुरीत कपात.
शीलाताई सांगते की काही महिला कामगार परकराच्या कपड्याच्या घड्या घेऊन पाळीच्या काळात कामं करतात. सलग १६ तास कपडा न बदलता काम करायला लागतात. “दिवसभराचं काम संपल्यावरच मी कपडा बदलायची,” ती म्हणते. “रक्ताने पूर्ण भिजून रक्त टपकायचं कपड्यातून.”
वापरलेला कपडा धुण्यासाठी पाण्याची पुरेशी सोय नसल्याने किंवा उन्हात सुकवायला जागा नसल्याचा परिणाम म्हणजे कधी कधी तसाच आंबुस ओला कपडा शीलाताईला वापरायला लागायचा. “वास यायला लागायचा. पण मोकळ्यावर उन्हात कसा वाळू घालावा? आजूबाजूला गडी माणसं असायची.” सॅनिटरी पॅडबद्दल तिला काहीच माहित नव्हतं. “माझ्या पोरीची पाळी आली तेव्हा कुठे मला समजलं,” ती सांगते.
शीलाताई १५ वर्षांच्या ऋतुजासाठी सॅनिटरी पॅड विकत आणते. “तिच्या तब्येतीच्या बाबतीत मला कसलीच हयगय करायची नाहीये.”
२०२० साली महिला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या मकाम (महिला किसान अधिकार मंच) या नेटवर्कने महाराष्ट्राच्या आठ जिल्ह्यांमधल्या १,०४१ ऊसतोड कामगार महिलांच्या मुलाखती घेऊन तयार केलेला एक अहवाल सादर केला. त्यामध्ये असं दिसून आलं की ८३ टक्के महिला कामगार पाळीच्या काळात कपडा वापरतात. वापरलेला कपडा धुण्यासाठी पुरेशा पाण्याची सोय असल्याचं फक्त ५९ टक्के स्त्रियांनी तर आपण ओला कपडा पुन्हा वापरत असल्याचं तब्बल २४ टक्के स्त्रियांनी सांगितलं.
पाळीच्या काळात अशी अस्वच्छता असल्यास अंगावरून जास्त प्रमाणात रक्तस्राव आणि पाळीच्या काळात वेदना असे त्रास होऊ शकतात. “माझ्या ओटीपोटात सारखं दुखत असायचं आणि अंगावरून पांढरं जायचं,” शीलाताई सांगते.
पाळीच्या काळात स्वच्छता बाळगली नाही तर जंतुलागण होत असते आणि साध्या उपचाराने ती बरीही होऊ शकते, डॉ. चव्हाण सांगतात. “कर्करोग असेल, अंग बाहेर येत असेल किंवा गर्भाशयात गाठी झाल्या असतील तरी गर्भाशय काढणे हा काही पहिला पर्याय नसतो. काहीच उपाय चालत नसले तर हा निर्णय घेतला जातो.”
पाळीच्या काळात फडात ऊसतोड करणं हे स्त्रियांसाठी जास्तच कष्टप्रद असतं. फडात कुठेच मोरी किंवा संडासाची सोय नसते आणि पालं टाकून राहत असल्याने तिथेही फारशा सोयी नसतात
शीलाताई फक्त मराठीत सही करू शकते. त्यापलिकडे वाचू लिहू शकत नाही. आपल्याला झालेली जंतुलागण बरी होऊ शकते याची तिला तसूभरही कल्पना नव्हती. इतर ऊसतोड कामगारांप्रमाणे ती देखील बीड शहरातल्या एका खाजगी दवाखान्यात गेली. वेदना कमी होण्यासाठी काही औषधं मिळाली तर पाळीच्या काळात देखील काम करता येऊ शकेल आणि पगार कापला जाणार नाही असा तिचा विचार होता.
रुग्णालयातल्या डॉक्टरांनी तिला कॅन्सर होऊ शकेल असा इशारा दिला. “रक्त तपासलं नाही, सोनोग्राफी केली नाही. त्याने सांगितलं की माझ्या पिशवीला भोकं पडलीयेत. आणि पुढच्या पाच-सहा महिन्यात कॅन्सर होऊन मी मरून जाईन,” शीलाताई सांगते. भीतीपोटी ती गर्भाशय काढून टाकायला तयार झाली. “त्याच दिवशी, काही तासांनी डॉक्टरनी माझ्या नवऱ्याला काढलेली पिशवी दाखवली नी म्हटला बघा कशी भोकं पडलीयेत,” ती सांगते.
सात दिवस शीलाताई दवाखान्यात होती. माणिक यांनी जी काही बचत होती ती आणि नातेवाईक व मित्रमंडळींकडून उसनवारी करून ४०,००० रुपयांची भरती केली.
“यातली सगळ्यात जास्त ऑपरेशन खाजगी दवाखान्यात झाली आहेत,” अशोक तांगडे सांगतात. ऊसतोड कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी यासाठी ते अनेक वर्षांपासून काम करत आहेत. “कुठलंही वैद्यकीय कारण नसताना डॉक्टर गर्भाशय काढण्यासारखी गंभीर शस्त्रक्रिया करतायत हे फार अमानुष आहे.”
शासनाने नेमलेल्या समितीच्या पाहणीतूनही हेच दिसून येतं की सर्वेक्षणातल्या ९० टक्के स्त्रिया खाजगी दवाखान्यातच शस्त्रक्रिया करून आल्या आहेत.
नंतर काय त्रास होऊ शकतो याबाबत शीलाताईला कसलाही सल्ला-मार्गदर्शन करण्यात आलं नाही. “पाळीची कटकट गेली पण आता जे होतंय त्याइतकं बेकार काय असणार?”
पगार कापला जाण्याची भीती, मुकादमाने लावलेले मनमानी नियम आणि नफेखोरी करणारे खाजगी डॉक्टर या सगळ्या दुष्टचक्रात अडकलेल्या बीडच्या ऊसतोड कामगारांच्या व्यथा ऐकल्या की काही गोष्टी पुन्हा पुन्हा कानावर येतात.
*****
शीलाताईच्या घरापासून सहा किलोमीटरवर, काथोडा गावात लता वाघमारेची कहाणी फार काही वेगळी नाही.
“जगावंच वाटंना गेलंय,” ३२ वर्षांची लताताई सांगते. विशीतच त्यांचं गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाली आहे.
“आमच्यात आता प्रेमबिम काही राहिलं नाहीये,” आपले पती रमेश यांच्यासोबतच्या नात्याबद्दल लता सांगते. ऑपरेशन होऊन एक वर्ष झालं आणि गोष्टी बदलायला लागल्या. चिडचिड वाढली, जवळीक नको वाटाया लागली.
“ते जवळ आले तर मी त्यांना लांब करायला लागले,” लता सांगते. “मग भांडणं व्हायची, आरडाओरड व्हायची.” संबंध ठेवायला सतत नकार द्यायला लागल्यामुळे आपल्या नवऱ्याला आता इच्छाच होत नाही, ती म्हणते. “आता तर ते माझ्याशी धड बोलतसुद्धा नाहीत.”
शेतात मजुरीला जाण्याआधी त्या घरातली सगळी कामं उरकून जातात. त्यांच्या किंवा शेजारच्या गावांमध्ये त्या १५० रुपये रोजाने मजुरीला जातात. त्यांना गुडघे आणि पाठदुखीचा त्रास होतो. बऱ्याच वेळा डोकं दुखतं. बरं वाटावं म्हणून त्या कुठल्या तरी गोळ्या खात असतात. घरगुती उपाय करतात. “असलं सगळं होत असतं, त्यांच्या जवळ जाण्याची इच्छा तरी कशी व्हावी?”
तेराव्या वर्षी लग्न झालं आणि एका वर्षाच्या आत त्यांचा मुलगा आकाश जन्मला. आकाश १२ वी पर्यंत शिकला आहे पण तोही आई-वडलांसोबत तोडीला जातो.
लताताईला दुसरी मुलगी झाली. पण पाच महिन्यांची असताना उसाच्या फडात ट्रॅक्टरखाली चिरडून ती मरण पावली. लेकरांसाठी, तान्ह्या बाळांसाठी कसल्याच सोयी नसल्याने अनेकदा तोडीवर जाताना लेकरांना सोबत न्यावं लागतं. तिथेच मोकळ्या जागेत मुलं खेळत असतात.
तो दुःखद प्रसंग सांगणं त्यांना जड जातं.
“काही करुशीच वाटत नाही. काही न करता नुसतं बसून रहावंसं वाटतं,” ती सांगते. कामात रस नसल्याने मग चुका होतात. “कधी कधी गॅसवर भाजी किंवा दूध ठेवलेलं असतं. ऊतू गेलं किंवा करपलं तरी ध्यान जात नाही.”
पोटची पोरगी गेल्यानंतरही तोडीला जायचं काही थांबलं नाही. परवडलं नसतं.
त्यानंतर लताताईला तिघी मुली झाल्या, अंजली, निकिता आणि रोहिणी. त्यांना घेऊन ती तोडीला जायची. “काम केलं नाही, तर लेकरं उपाशी मरावी आन् कामावर घेऊन जावं तर काही तर इजा होऊन जावी,” उद्विग्नपणे लताताई म्हणते. “काय फरक हाये का?”
कोविड-१९ च्या महासाथीत शाळा बंद झाल्या आणि घरी स्मार्टफोन नसल्याने ऑनलाइन शिक्षण शक्यच नव्हतं. त्यामुळे तिन्ही मुलींचं शिक्षण अर्ध्यातच थांबलं. २०२० साली अंजलीचं लग्न झालं. निकिता आणि रोहिणीसाठी पाहुणे शोधायचं काम सुरू आहे.
“माझं सातवीपर्यंत शिक्षण झालंय,” निकिता सांगते. मार्च २०२० नंतर ती शेतात मजुरीला जायला लागली आणि नंतर आई-वडलांबरोबर तोडीला. “मला शिकण्याची इच्छा आहे. पण आता जमायचं नाही. घरी लग्नाचं बघायलेत,” ती म्हणते.
नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखालच्या समितीने शिफारशी दिल्या त्यालाही आता तीन वर्षं उलटून गेली आहेत आणि अंमलबजावणी कासवगतीने सुरू आहे. स्वच्छ पाणी, संडास आणि तोडीच्या ठिकाणी राहण्यासाठी तात्पुरता निवारा या सगळ्या बाबी केवळ कागदावर राहिल्या असल्याचं शीलाताई आणि लताताई सांगतात.
“संडास आणि घरांचं काय घेऊन बसलात,” कामाच्या ठिकाणची परिस्थिती सुधारेल हा विचारसुद्धा शीलाताई उडवून लावते. “काही बदलत नसतंय.”
आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या गटाने ऊसतोड करणाऱ्या महिलांच्या आरोग्याच्या तक्रारींवर तोडगा काढावा अशी शिफारसही करण्यात आली होती.
मजुरी कापली जाण्याची भीती, मुकादमाने लावलेले मनमानी नियम आणि नफ्याला चटावलेले डॉक्टर या सगळ्या दुष्टचक्रात अडकलेल्या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांच्या व्यथा सारख्याच आहेत
आशा कार्यकर्ती येऊन भेटते का या प्रश्नावर लताताई म्हणते, “कुणी बी येत नाही, कवाच. दिवाळी होऊन गेली की आम्ही तोडीवर असतोय. घराला कुलुप लागलेलं असतं.” काथोडा गावाच्या वेशीवरच्या २० घरांच्या दलित वस्तीत राहणाऱ्या या नवबौद्ध कुटुंबाला गावातल्या लोकांकडून कायमच भेदभावाची वागणूक मिळत आली आहे. “कुणी बी येऊन आम्हाला काय विचारत नाई.”
तांगडे म्हणतात की बालविवाह आणि गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची कमतरता या दोन्ही समस्यांवर तातडीने उपाय शोधणं गरजेचं आहे. “भरीस भर म्हणजे दुष्काळ आहे, रोजगाराच्या कसल्याच संधी उपलब्ध नाहीत,” ते म्हणतात. “ऊसतोड कामगारांचे प्रश्न काही केवळ स्थलांतराशी संबंधित नाहीत.”
तिथे शीलाताई आणि लताताईसारख्या अनेक स्त्रिया यंदाच्या तोडीसाठी आपली गावं सोडून शेकडो किलोमीटर लांब पालं टाकून राहतायत. पाळीच्या तक्रारी सहन करत, स्वच्छतेच्या कसल्याही सोयी नसताना काम करतायत.
“अजून बरीच वर्षं आयुष्य काढायचंय,” शीलाताई म्हणते. “पण जगायचं कसं तेच मला माहित नाहीये.”
अनुवादः मेधा काळे
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा