या लेखातल्या सरकारी अधिकारी वगळता सर्वांची नावं बदलण्यात आलेली आहेत जेणेकरून त्यांची ओळख उघड होणार नाही. त्यामुळेच गावांची नावंही देण्यात आलेली नाहीत. दोन लेखांच्या मालिकेतला हा दुसरा लेख आहे.
“कीडा जडीमुळे आमचं आयुष्यच बदलून गेलंय,” आमची टॅक्सी चालवता चालवता सुनील सिंग म्हणतो. हा २३ वर्षांचा तरूण गेल्या दोन वर्षांपासून ही गाडी चालवतोय, आसपासच्या गावातल्या लोकांना धारचुलाला पोचवतोय, शाळेत, कॉलेजला, बाजारात किंवा दवाखान्यात. उत्तराखंडच्या पिथोरागढ जिल्ह्यातला धारचुला हा तालुका भारत-नेपाळ सीमेपासून अगदी काही मीटरवर आहे.
कीडा जडी विकून जे ३.५ लाख रुपये साठवले होते त्यातून सुनीलने ही बोलेरो गाडी घेतली, जोडीला बँकेचं कर्ज काढलं. तो आठ वर्षांचा असल्यापासून त्याच्या घरच्यांबरोबर ही बुरशी गोळा करायला जातोय आणि आता त्या कमाईतून कर्जाची परतफेड करतोय.
कॅटरपिलर किंवा अळी बुरशी ३,५०० ते ५,००० मीटर उंचीवरच्या तिबेटन पठारी प्रदेशातल्या पर्वतीय कुरणांमध्ये वाढते. ‘हिमालन व्हायग्रा’ नावाने ओळखली जाणारी ही बुरशी कामोत्तेजक मानली जाते. चीनमध्ये तिला यारसागुम्बा म्हणतात आणि पारंपरिक चिनी औषधांमधला तो मोलाचा घटक आहे. सीमेपार चालणाऱ्या बेकायदेशीर धंद्यामध्ये उत्तम प्रतीच्या एक किलो कीडा जडीला अगदी १२ लाखांपर्यंत किंमत मिळू शकते. उत्तराखंडमध्ये गोळा करण्यात येणारी बहुतेक सगळी बुरशी नेपाळ आणि चीनच्या दलालांमार्फत तस्करीतून विकली जाते.
उत्तराखंडच्या पिथोरागढ आणि चमोली या दोन उंचावरच्या जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीला कीडा जडीचा हंगाम सुरू होतो आणि जूनच्या मध्यावर किंवा जून संपता संपता, मोसमी पाऊस येईपर्यंत चालतो. अख्खी कुटुंबंच्या कुटुंबं कुरणांमध्ये तंबू थाटतात आणि ही बुरशी गोळा करण्याचं कष्टाचं आणि वेळखाऊ काम करतात. (पहा, कीडा जडीने केला पिथोरागढच्या कुटुंबांचा कायापालट)
घराचा बराचसा खर्च भागेल इतकी कीडा जडी गोळा करून ते परततात. “तुम्ही कीडा जडीचे किती नग गोळा करता यावर सगळं अवलंबून आहे. या कमाईतून काहींचा पुढच्या काही महिन्यांचा खर्च निघतो, तर काहींचं अख्खं वर्ष यावर चालतं,” सुनीलच्याच गावच्या पार्वती देवी सांगतात. “हा धंदा धोक्याचा आहे आणि खडतरही. पणं कसंय, अगदी कॉलेजमधनं डिग्र्या घेतलेल्यांनाही इथे नोकऱ्या नाहीत. त्यामुळे सगळेच हे काम करतात.”
ही कीडा जडी घेऊन जाणारे मध्यस्थ किंवा दलाल शक्यतो सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात गावात येतात आणि मग पर्वतरांगांमधल्या अगदी दुर्गम वाटांनी हा माल घेऊन सीमा पार करतात. “ही सगळी बुरशी गोळा करून आणल्यानंतर आम्ही ती साफ करतो, वाळवतो, साठवून ठेवतो आणि हे दलाल येईपर्यंत त्याची जिवापाड काळजी घेतो. या कीडा जडीतून मिळणाऱ्या पैशावरच आमचं अख्खं वर्ष निघतं. इथे ना शेती आहे ना नोकऱ्या, त्यामुळे आमच्यासाठी ही कीडा जडी सोन्यापेक्षा मौल्यवान आहे.”
या किफायतशीर बुरशीबद्दल जेव्हा काही माहित नव्हतं तेव्हा लोक शेती, रोजंदारी किंवा मेंढ्या पाळून आपलं घर चालवत होते. पण या खडकाळ प्रदेशात शेती फारशी पिकतच नाही. “इथली जमीन सुपीक नाही, आम्ही जास्त करून राजमा आणि बटाट्याचं पीक घेतो. जर चांगलं पिकलं, अर्थात असं फार क्वचित होतं, तर आम्ही काही माल विकतो. पण जास्त करून जे पिकतं ते घरी खायलाच वापरलं जातं,” भानू सिंग सांगतात. “दुसरा पर्याय म्हणजे मनरेगा अंतर्गत रोजगार, पण त्यात कीडा जडीइतका पैसा नाहीये.”
अनेक जण कामाच्या शोधात स्थलांतर करतात. मात्र या कॅटरपिलर बुरशीमुळे आधी पोटापाण्यासाठी शहरात गेलेले अनेक जण आता हिमालयातल्या उंचावरच्या कुरणांची वाट धरू लागले आहेत.
सुनीलसारख्या काही तरुणांनी बाकी वर्षभर कमाईचं साधन म्हणून प्रवासी वाहनं विकत घेतली आहेत. “मी या हंगामात केवळ १६ दिवस जंगलात होतो आणि मला ३०० नग सापडले,” तो सांगतो. त्याच्या या मालाचे त्याला किमान ४५,००० रुपये मिळतील. त्याचा मित्र मन्नू सिंगदेखील आमच्याबरोबर प्रवास करतोय. त्याला ५०० नग मिळाले. “मला ७५,००० तरी मिळायलाच पाहिजेत,” मन्नू हसतो.
सुनीलच्या गावात बुरशीच्या या धंद्यातून आलेल्या सुबत्तेच्या खुणा सगळीकडेच पहायला मिळतात. डोंगरांच्या बाजूला नवी घरं आणि दुकानं दिसू लागलीयेत. अनेक गावकऱ्यांकडे महागडे स्मार्टफोन दिसतात – सिम कार्ड अर्थात नेपाळचं, कारण भारतातली मोबाइल नेटवर्क इथे चालतच नाहीत. “कीडा जडीने आमचं उत्पन्न अनेक पटीने वाढलंय आणि आमची आर्थिक स्थिती सुधारलीये. आता आम्ही चांगलंचुंगलं खाऊ शकतो. शिक्षण किंवा उपचारासाठी आम्ही डेहराडून किंवा दिल्लीला जाऊ शकतो,” १४ वर्षांचा मनोज थापा सांगतो. २०१७ च्या हंगामात त्याने एकट्याने कीडा जडीचे ४५० नग गोळा केले होते.
मला असं समजलं की गावातले काही तरूण डेहराडूनमध्ये प्रशासकीय सेवांचा अभ्यास करतायत आणि त्यांच्या कोचिंगचा खर्च कीडा जडीच्या कमाईतून निघतोय. इथली अनेक कुटुंबं अनुसूचित जमातीतली आहेत आणि प्रशासकीय सेवांमध्ये जाणं हे त्यांच्यासाठी एक स्वप्न आहे. त्यांच्यासाठी असलेल्या आरक्षणामुळे ते थोडं सुकर झालंय. मात्र कीडा जडीचा धंदा सुरू झाला नसता तर मात्र त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं त्यांच्यासाठी मुश्किल होतं.
जून २०१३ मध्ये हिमनदीला आलेल्या पुरामुळे गावातली शेतजमीन पुरती पाण्याखाली गेली तेव्हा या कीडा जडीच्या कमाईतूनच गावकऱ्यांनी घराची घडी परत बसवली. “हे फक्त कीडा जडीमुळेच शक्य झालं,” भानू सिंग सांगतात. २०१६ मध्ये त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न त्यांनी थाटामाटात लावून दिलं ते या पैशातूनच. त्यांनी तीन खोल्यांचं एक टुमदार घर बांधलंय तेही या कीडा जडीच्या कमाईतूनच.
‘जेव्हा अनेक कुटुंबं एकाच भागात कीडा जडी गोळा करायला लागतात तेव्हा प्रत्येक कुटुंबाचा वाटा अर्थात कमी होतो. मात्र यातनं होणारी भांडणं आम्ही पोलिसांपर्यंत नेत नाही, नाही तर आम्हीच तुरुंगात जायचो.’
पण उत्साहाच्या या उधाणाचीही काळी बाजू आहेच. गेल्या काही वर्षात सातपेरच्या कुरणांवर कुणी जायचं यावरून गावागावांमध्ये तंटे सुरू झाले आहेत. “या सर्वांच्या मालकीच्या कुरणांमध्ये अगदी हलद्वानी आणि लालकुआँचे लोक येऊन कीडा जडी गोळा करायला लागलेत. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा वाटा कमी व्हायला लागलाय. परिणामी, कुरणांवर कुणाला येऊ द्यायचं यावरून भांडणं सुरू झाली आहेत,” लाल सिंग सांगतात.
“जेव्हा अनेक कुटुंबं एकाच भागात कीडा जडी गोळा करायला लागतात तेव्हा प्रत्येक कुटुंबाचा वाटा अर्थातच कमी होतो. मात्र यातनं होणारी भांडणं आम्ही पोलिसांपर्यंत नेत नाही, नाही तर आम्हीच तुरुंगात जायचो,” भानू सिंग पुष्टी देतात. त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी मिळून गेल्या वर्षी कीडा जडीचे १४०० नग गोळा केले आणि जुन्या काचेच्या बरण्यांमध्ये हा माल भरून घरी आणला – किमान २ लाख रुपयांना हा माल विकला जायला पाहिजे.
असं म्हटलं जातं की १९९३ मध्ये यारसागुम्बाची मागणी अचानक वाढली जेव्हा तीन चिनी खेळाडूंनी बीजिंग राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाच विश्व विक्रम तोडले. ते या बुरशीपासून तयार करण्यात येणारं एक टॉनिक नियमित वापरत होते. १९९९ मध्ये चीनने या बुरशीची नोंद धोक्यात असणाऱ्या प्रजातींमध्ये केली. त्यानंतर थोड्याच काळात बुरशी गोळा करणाऱ्यांचे पाय भारताकडे वळले. “२००० च्या सुरुवातीला आम्ही तिबेटी खाम्पांना भारताच्या भागातल्या कुरणांमध्ये ही बुरशी शोधताना पहायचो. ते म्हणायचे की तिबेटमध्ये आता ही सापडणं दुर्मिळ झालं आहे. भारताच्या नव्या प्रदेशामध्ये याचा शोध घेण्यासाठी त्यांनी आमची मदत मागितली,” ४१ वर्षीय कृष्णा सिंग सांगतात. तेव्हा बाजारात कीडा जडीला बरा भाव मिळायचा. मात्र २००७ उजाडलं तोपर्यंत हा धंदा तेजीत आला होता आणि अनेक जण ही बुरशी गोळा करण्याकडे वळले होते.
मात्र पिथोरागढ आणि चमोलीतल्या ३०० दरिद्री गावांमधल्या बुरशीच्या या सोन्याच्या खाणी आता ओस पडायला लागल्या आहेत. काही अभ्यासांनुसार वातावरणातील बदल आणि अति प्रमाणात बुरशी गोळा करण्यामुळे या पर्वतीय कुरणांमध्ये माणसाचा वावर वाढला त्याचा परिणाम म्हणजे तिबेटन पठारांमधलं या बुरशीचं उत्पादन गेल्या ३० वर्षात १० ते ३० टक्क्यांनी घटलं आहे.
खाम्पांना जशी नवी कुरणं शोधावी लागली तसंच उत्तराखंडच्या बुरशी गोळा करणाऱ्यांनाही नवे प्रदेश शोधावे लागणार आहेत. गावकऱ्यांच्या मते पूर्वी जशी कमी उंचीवरही सहज बुरशी मिळत असे तसं आता नाही, आता फक्त वरती उंचावरच बुरशी सापडते. “१० वर्षांपूर्वी ज्या प्रमाणात आम्हाला कीडा जडी मिळायची, तशी आम्हाला आता मिळत नाही,” लाल सिंग सांगतात. “काय माहित, काही वर्षांनी आम्ही आता जिथे जातो त्या भागातही आमच्या हाती काहीच लागणार नाही. त्यामुळे आम्हाला अधिकाधिक उंचावर शोधत रहावं लागणार.”
उत्तराखंड सरकारही अतिरिक्त प्रमाणात बुरशी काढली जाऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तराखंडचे मुख्य वन संवर्धक, रंजन मिश्रा सांगतात, “आम्ही केंद्राकडे नवा प्रस्ताव पाठवला आहे. ही बुरशी गोळा करणं आणि तिची विक्री काही आम्ही थांबवू शकत नाही. आम्ही काय करू शकतो तर चांगल्या धोरणांद्वारे शासनाचा आणि लोकांचा कसा फायदा होईल त्या पद्धतीने काही नियंत्रण आणू शकतो.”
नव्या धोरणानुसार, मिश्रा सांगतात, बुरशी गोळा करणाऱ्या प्रत्येकाने वन पंचायतीकडे किंवा फॉरेस्ट रेंज कार्यालयात आधार कार्ड किंवा मतदान कार्डाच्या आधारे नोंदणी करावी असा प्रस्ताव आहे. ही व्यक्ती कोणत्या काळात वनक्षेत्राच्या कोणत्या भागात किती दिवस कीडा जडी गोळा करणार आहे ते त्यांना नमूद करावं लागेल. संबंधित व्यक्तीने किती प्रमाणात कीडा जडी गोळा केली तेही तिला सांगावं लागेल. “प्रत्येक १०० ग्रॅम कीडा जडीसाठी वन विभाग १००० रुपये स्वामित्व शुल्क आकारेल. त्यानंतर ती व्यक्ती वन पंचायत किंवा इतर कुणालाही कीडा जडी विकू शकते. मग हा व्यवहार कायदेशीर मानला जाईल,” मिश्रा सांगतात. “पर्वतीय कुरणं परिस्थितिकीयदृष्ट्या पार नाजूक आहेत. त्यामुळे असं धोरण अस्तित्वात आलं तर आम्हाला राज्यामध्ये किती कीडा जडी गोळा होतीये आणि या भागात नक्की काय घडतंय त्याचा अंदाज येईल.”
दरम्यान, गेल्या एका दशकात वाढती मागणी आणि कीडा जडी मिळणं मुश्किल बनत असल्याने तिची किंमत अनेक पटींनी वाढली आहे. आणि त्यामुळे बुरशी गोळा करणाऱ्यांसाठी हा धंदा अधिकच आकर्षक बनू लागला आहे.
अनुवादः मेधा काळे