महाराजांच्या बालेकिल्ल्यातल्या शयनयानात धक्का पोचेपर्यंत बरीच पडझड झाली होती. तटबंदी मजबूत करायला उसीर झाला आणि आपल्या सत्राप आणि हुजऱ्यांना सुद्धा निरोज द्यायला वेळ मिळाला नाही.
खंदकांसारख्या नव्या भेगा राज्यभर चमचमत होत्या. नुकत्याच कापलेल्या गव्हाच्या पेंढ्यासारखा त्यांचा वास हवेत भरून राहिला होता. भुकेल्या प्रजेबद्दल राजाच्या मनात असलेल्या घृणेहून अधिक खोल भेगा. महाकाय छातीहून अधिक रुंद अशा या भेगा रस्त्यातून महालाकडे जायला लागल्या. बाजारातून, त्याच्या लाडक्या पवित्र गोशाळांच्या भिंतीही त्यांनी सोडल्या नाहीत. खरंच फारच उशीर झाला होता.
हे धक्के त्रासदायक असून फार काही लक्ष देण्याइतके मोठे नाहीत हे कोकलून सांगणारे पाळीव कावळे पिंजऱ्यातून सोडण्याइतकाही वेळ मिळाला नाही. मोर्चेकऱ्यांची दमदार पावलं त्यांना आवडू नयेत यासाठी काही करताच आलं नाही. उशीर झालाच. आपल्या चिरलेल्या, उन्हानी रापलेल्या याच पावलांनी त्याचं सिंहासनच डळमळत केलं हो! पुढचे एक हजार वर्षं तरी महाराजांचं हे दैवी साम्राज्य असंच टिकून राहणार असल्याची शिकवण द्यायचीच राहून गेली. शेणा-मातीतून मक्याची कणसं फुलवणारे हे हिरवे हात आता थेट आकाशालाच जाऊन पोचले की.
पण या असुरी मुठी आहेत तरी कुणाच्या? निम्म्या तर दिसतायत स्त्रिया आणि तिघांतल्या एकाजवळ आहेत गुलामीच्या खुणा. चारातला एक आहे पुरातन, इतरांपेक्षा फार फार जुना. काही होते सप्तरंगी, काही किरमिजी, काहींची माथी पिवळ्या रंगात झाकलेली तर काहींच्या अंगावर केवळ फाटकी-तुटकी कापडं. पण ही कापडं महाराजांच्या करोडो रुपयांच्या उंची वस्त्रांपेक्षाही मौल्यवान. मोर्चे काढत, गात, नाचत, हसत खिदळत निघालेल्या मृत्यूंजयांचा सोहळा होता तो. हातात नांगर घेतलेल्या या रांगड्या लोकांना तोफांचे गोळेही भेदत नाहीत किंवा बंदुकीच्या गोळ्याही.
राजाच्या शरीरात हृदयाच्या जागी एक पोकळी आहे. तिथे हे धक्के पोचले तेव्हा मात्र खरंच खूप उशीर होऊन गेला होता.



