रानातल्या पावसाची ही गाणी पुणे जिल्ह्याच्या लवार्डे गावातल्या अनुसुयाबाई पांदेकर आणि त्यांच्या सूनबाई मंदा पांदेकर यांनी आठवून आठवून गायली आहेत. जात्यावरच्या ओव्या प्रकल्पासाठी २०१७ च्या एप्रिलमध्ये या ओव्या ध्वनीमुद्रित करण्यात आल्या.

२० वर्षांपूर्वी त्यांनी किती तरी ओव्या गायल्या होत्या याची आम्ही जेव्हा अनुसुयाबाईंना आठवण करून दिली तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, “तेव्हाचे दिवस.... आता पार बदलून गेलंय सगळं.” पदराच्या काठाने त्यांनी डोळे टिपले. तेव्हा त्या तारुण्यात होत्या आणि आता सत्तरीला टेकलेल्या, विधवा. जात्यावरच्या ओव्या प्रकल्प सुरू करणारा चमू ६ जानेवारी १९९६ रोजी पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातल्या लवार्डे गावी गेला होता आणि त्यांनी अनुसुयाबाई आणि इतरही अनेक बायांनी गायलेल्या ओव्या गोळा केल्या होत्या.

ओव्यांच्या या संग्रहात १ लाख १० हजारांहून जास्त ओव्या आहेत. आता हा सगळा संग्रह पारीवर सादर करण्यात येतोय. आणि आता याच प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही या सगळ्या कलावंतांना परत एकदा भेटून त्यांची छायाचित्रं घेतोय, त्यांच्या आवाजात परत या ओव्या ध्वनीमुद्रित करतोय.

या संपूर्ण संग्रहात अनुसुयाबाई पांदेकरांनी गायलेल्या ४५ ओव्या आहेत. यातल्या फक्त सीतेच्या आयुष्यावरच्या नऊ ओव्याच १९९६ मध्ये जात्यावरच्या ओव्या चमूने रेकॉर्ड केल्या होत्या. त्यांनी गायलेल्या इतर ओव्या लिहून घेतलेल्या आहेत. आईला तिच्या मुलाविषयी वाटणारी काळजी, बायांची आयुष्यं, श्रम आणि समाजात तिची असलेली ओळख, श्रीकृष्ण आणि मारुती अशा अनेक विषयांवरच्या ओव्यांची ध्वनीमुद्रणं मात्र नाहीत. येत्या काळात या ओव्यादेखील ध्वनीमुद्रित करता येतील अशी आम्हाला आशा आहे.

आम्ही ३० एप्रिल २०१७ रोजी लवार्ड्याला गेलो आणि अनुसुयाबाईंची ही पावसाची गाणी ध्वनीमुद्रित केली. त्यांच्या सूनबाई, मंदा पाडेकर पण बसल्या आणि त्यांनी पुढाकार घेत ओव्या गायल्या. त्या गावात लग्न असेल तर लग्नात आणि हळदीच्या कार्यक्रमात गायला जातात.

‘रंग न्यारा न्यारा, रंग न्यारा न्यारा...’ अनुसुयाबाई (उजवीकडे) आणि मंदाबाई पाडेकर गातायत

या चित्रफितीत पावसावरच्या पाच ओव्या आहेत. मात्र शेवटच्या दोन ओव्यांनंतर चार ओळीचं फार अनोखं पालुपद गायलं गेलं आहे. ज्यात ‘वली, वली’ आणि ‘न्यारा, न्यारा’ अशा शब्दांच्या जोड्या येतात.

मंदा आणि अनुसुयाबाई एक लोकप्रिय ओवी गाऊन सुरुवात करतात. ओव्यांच्या संग्रहातल्या ९७ जणींनी ही ओवी गायली आहे, ज्यात बहीण आणि भावाला रोहिणी आणि मृग नक्षत्राची उपमा दिली आहे. (याच ओवीबद्दल अधिक वाचा, शेतकरी आणि पावसाचं गाणं)

दुसऱ्या ओवीमध्ये त्या गातायत, पाऊस पडू दे आणि जमिनी ओल्या होऊ देत, आणि रानात काम करणाऱ्या धन्यासाठी कामिनी भाकरीची पाटी घेऊन जाऊ देत.

तिसऱ्या ओवीत असं गायलंय की पावसाने वावरं भिजू देत. कुणबी पेरणीसाठी पाभराच्या मागे सज्ज आहेत. शेतकरी म्हणजे जणू काही लग्नाला उभा नवरदेव आणि पेरणी एखाद्या लग्नासारखी मंगल असा गर्भित अर्थ यात आहे.

चौथ्या ओवीमध्ये वळवाच्या पावसाची धार लागलीये आणि माझा बाळ पाभर गव्हाची शेती करतोय असं गायलंय तर पुढच्या ओवीत त्या म्हणतात, वळीव शिवारं झोडत आलाय आणि औत्याने जाईच्या झाडाखाली पाभर सोडून आसरा घेतलाय.

चौथ्या आणि पाचव्या ओवीनंतर चार ओळींचं एक पालुपद येतं. यामध्ये जून/जुलैमध्ये येणाऱ्या वारीचा उल्लेख केला आहे. पावसाने वाट ओली झालीये आणि आता पालखी आलीये. पालखीत ज्ञानेश्वर आणि तुकरामाच्या चांदीच्या पादुका ठेवल्यायत. वारकरी आणि भक्त या पादुकांचं दर्शन घेतात आणि वारी पंढरपुरास पोचते. वारीच्या वाटेवर वारी गावात आली की हळदी कुंकवाचा शिडकावा केला जातो.

दर वर्षी येणाऱ्या वारीमुळे सगळीकडे प्रसन्न आणि मंगल वातावरण तयार झालंय. या सगळ्या वातावरणाला जणू काही एक न्यारा रंग आलाय. इथे वारी पंढरपुराकडे प्रस्थान करते (लाखो वारकऱ्यांच्या सोबत) आणि तिथे पंढरीचा विठोबा जरीचा शालू लेऊन भक्तांच्या स्वागतासाठी सजला आहे असंही या पालुपदात गायलं आहे.

व्हिडिओ पहाः मंदाबाई आणि अनुसुयाबाई वळवाच्या पावसाच्या या ओव्या गातायत.

पडतो पाऊस मिरगाआधी रोहिणीचा
पाळणा लागतो भावाआधी बहिणीचा

पडतो पाऊस वल्या होऊ दे जमिनी
भाकरीची पाटी शेती जाऊ दे कामिनी

पडतो पाऊस ओली होऊ दे वावरं
पाभाराच्या मागं कुणबी झाल्यात नवरं

वळीव पाऊस फळी धरली कवाची
बाळा याची माझ्या शेती पाभार गव्हाची

वळीव पाउस आला शिवार झोडीत
जाईच्या जाडाखाली औत्या पाभार सोडीत

पालुपद

वाट वली वली, वाट वली वली
हळदी कुंकाची गर्दी झाली, पालखी आली
रंग न्यारा न्यारा, रंग न्यारा न्यारा
देव जरीचा शालू ल्याला, शोभतो त्याला


टीपः इथे देव म्हणजे पंढरीचा विठोबा आणि न्यारा रंग म्हणजे या पालुपदात ज्या सगळ्या गोष्टींबद्दल गायलंय त्या सगळ्यांचा मिळून तयार होणारा न्यारा वातावरणाला आलेला असा रंग.

PHOTO • Hema Rairkar ,  Samyukta Shastri

अनुसुयाबाई पांदेकर, २०१७ मध्ये आणि (उजवीकडे) वीस वर्षांपूर्वीच्या, १९९६

PHOTO • Samyukta Shastri

अनुसुयाबाईंच्या सूनबाई, मंदा पांदेकर लवार्ड्याच्या त्यांच्या घरी

कलावंतः अनुसुयाबाई पांदेकर, मंदा पांदेकर

गावः लवार्डे

तालुकाः मुळशी

जिल्हाः पुणे

जातः सुतार

दिनांकः अनुसुयाबाईंची माहिती सर्वप्रथम ६ जानेवारी १९९६ रोजी नोंदून घेण्यात आली होती. अनुसुया पांदेकर आणि मंदा पांदेकर यांची छायाचित्रं आणि चित्रफिती ३० एप्रिल २०१७ रोजी नोंदवण्यात आली आहेत.

फोटोः नमिता वाईकर आणि संयुक्ता शास्त्री

पोस्टरः श्रेया कात्यायनी

अनुवादः मेधा काळे

ਨਮਿਤਾ ਵਾਇਕਰ ਇੱਕ ਲੇਖਿਕਾ, ਤਰਜਮਾਕਾਰ ਅਤੇ ਪੀਪਲਸ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਵਿਖੇ ਪ੍ਰਬੰਧਕੀ ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਹ 2018 ਵਿੱਚ ਪ੍ਰਕਾਸ਼ਤ 'The Long March' ਨਾਵਲ ਦੀ ਰਚੇਤਾ ਹਨ।

Other stories by Namita Waikar
PARI GSP Team

ਪਾਰੀ ਗ੍ਰਿੰਡਮਿਲ ਸੌਂਗਸ ਪ੍ਰਾਜੈਕਟ ਟੀਮ: ਆਸ਼ਾ ਓਗਲੇ (ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ); ਬਰਨਾਰਡ ਬੇਲ (ਡਿਜੀਟੀਜੇਸ਼ਨ, ਡਾਟਾਬੇਸ ਡਿਜਾਇਨ, ਡਿਵਲਪਮੈਂਟ ਐਂਡ ਮੇਨਟੰਨੈਂਸ); ਜਤਿੰਦਰ ਮੇਡ (ਟ੍ਰਾਂਸਕ੍ਰਿਪਸ਼ਨ, ਤਰਜ਼ਮਾ ਸਹਿਯੋਗੀ); ਨਮਿਤਾ ਵਾਈਕਰ (ਪ੍ਰਾਜੈਕਟ ਲੀਡ ਅਤੇ ਨਿਰੀਖਕ); ਰਜਨੀ ਖਾਲਾਦਕਰ (ਡਾਟਾ ਐਂਟਰੀ)।

Other stories by PARI GSP Team
Photos and Video : Samyukta Shastri

Samyukta Shastri is an independent journalist, designer and entrepreneur. She is a trustee of the CounterMediaTrust that runs PARI, and was Content Coordinator at PARI till June 2019.

Other stories by Samyukta Shastri
Editor and Series Editor : Sharmila Joshi

ਸ਼ਰਮਿਲਾ ਜੋਸ਼ੀ ਪੀਪਲਸ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਦੀ ਸਾਬਕਾ ਸੰਪਾਦਕ ਹਨ ਅਤੇ ਕਦੇ ਕਦਾਈਂ ਲੇਖਣੀ ਅਤੇ ਪੜ੍ਹਾਉਣ ਦਾ ਕੰਮ ਵੀ ਕਰਦੀ ਹਨ।

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale