“मी जे काही शाळेत शिकते ना ते आणि माझ्या घरची परिस्थिती एकदम विरुद्ध आहे.”
प्रिया पर्वतराजींमधल्या उत्तराखंड राज्यातली, राजपूत समाजाची १६ वर्षांची मुलगी आहे. पाळी सुरू असताना तिला काय काय बंधनं पाळावी लागतात त्याबद्दल ती सांगते. “अगदी दोन वेगळ्या जगात राहत असल्यासारखं वाटतं. घरी पाळीच्या दिवसात मला सगळ्यांपासून वेगळं रहावं लागतं, सगळ्या प्रथा आणि बंधनं पाळावी लागतात. आणि शाळेत मात्र मला शिकवतात की स्त्री पुरुष समान आहेत,” ती म्हणते.
प्रिया आपल्या गावापासून सात किलोमीटरवर असणाऱ्या नानकमट्टा गावातल्या शाळेत अकराव्या इयत्तेत शिकते. ती रोज सायकलवरून येजा करते. अभ्यासू विद्यार्थिनी असणाऱ्या प्रियाने या विषयावर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. “मी पुस्तकं वाचायचे आणि मला वाटायचं की मी हे करेन, ते करेन. मी जग बदलेन, वगैरे, वगैरे. पण या प्रथांना कसलाच अर्थ नाही हे मी माझ्या घरच्यांनाच पटवून देऊ शकले नाही. मी दिवसरात्र त्यांच्यासोबत राहते तरीही मी काही त्यांना समजावून सांगू शकत नाही,” ती म्हणते.
या सगळ्या बंधनांबद्दलची चीड आणि अस्वस्थता कमी झाली नसली तरी ती आता घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागते.
प्रिया आणि तिचं कुटुंब तराई भागात राहतं. या राज्यातल्या हा सगळ्यात उंचावरचा सुपीक प्रदेश आहे (जनगणना, २०११). या राज्यात पिकांचे तीन हंगाम असतात – खरीप, रब्बी आणि झैद – इथले लोक प्रामुख्याने शेती आणि पशुपालन करतात. त्यातही जास्त करून गायी आणि म्हशी पाळतात.
प्रियाच्या घरापाशीच विधा राहते. तीही राजपूत कुटुंबातली आहे. ती देखील पाळीच्या काळात तिला काय काय करावं लागतं ते सांगते. “पुढचे सहा दिवस मला माझ्या खोलीत बसून रहावं लागणार. [माझी आई आणि आजी] मला बजावतात की मी कुठेही इकडे तिकडे जायचं नाहीये. जे काही लागेल ते आई मला हातात आणून देईल.”
खोलीत दोन पलंग आहेत, एक ड्रेसिंग टेबल आणि एक कपाट. १५ वर्षांची विधा तिच्या नेहमीच्या लाकडी पलंगावर झोपू शकणार नाही. तर फक्त एक चादर अंथरलेल्या खाटेवर. तिच्यावर झोपून पाठ दुखली तरी ती “घरच्यांच्या डोक्याला शांती” मिळावी म्हणून ती विरोध करत नाही.
पाळीची सगळी बंधनं पाळत असताना विधाला शाळेत जाण्याची परवानगी आहे. मात्र शाळेतून तिला थेट तिच्या घरी, तिच्या खोलीत परत यावं लागतं. नानकमट्टाच्या जवळचं नागला हे तिचं गाव. अकरावीत शिकणाऱ्या विधाला वेळ घालवण्यासाठी आईचा फोन आणि काही पुस्तकं तेवढी असतात.
घरच्या सगळ्यांपासून घरातली बाई बाजूला बसायला लागली आणि आपल्या वस्तू तिने कोपऱ्यात न्यायला सुरुवात केली की समजावं की तिची पाळी सुरू आहे. कुणाची पाळी सुरू आहे, कुणाची नाही हे अगदी सगळ्यांना माहित असतं याचा विधाला अगदी संताप येतो. ती म्हणते, “सगळ्यांना कळतं, आणि सगळे जण त्यावर चर्चा करतात. [पाळी सुरू असली की] घरच्या जनावरांना, फळझाडांना हात लावायचा नाही, स्वयंपाक करायचा नाही, वाढायचं नाही. सितारगंज तालुक्यातल्या मंदिरातला प्रसादसुद्धा घेऊ देत नाहीत.”
पाळीच्या काळात बाया ‘अशुद्ध’ आणि ‘अशुभ’ असतात या धारणेचं प्रतिबिंब उधम सिंग नगरच्या लिंग गुणोत्तरात पडतं. दर हजार पुरुषांमागे राज्यात ९६३ स्त्रिया असताना, इथे मात्र हा आकडा ९२० आहे. साक्षरतेचं प्रमाण पाहिलं तरी तेच दिसतं. पुरुषांमध्ये ८२ टक्के तर स्त्रियांमध्ये ६५ टक्के (जनगणना, २०११).
पाळीच्या काळात बाया ‘अशुद्ध’ आणि ‘अशुभ’ असतात या धारणेचं प्रतिबिंब उधम सिंग नगरच्या लिंग गुणोत्तरात पडतं. दर हजार पुरुषांमागे राज्यात ९६३ स्त्रिया असताना, इथे मात्र हा आकडा ९२० आहे
विधाच्या पलंगाखाली एक थाळी, वाटी, स्टीलची पोहरी आणि चमचा ठेवलेला असतो. पाळीच्या काळात यातच जेवावं लागतं. चौथ्या दिवशी ती लवकर उठते आणि ही भांडी घासून उन्हात वाळायला ठेवते. “त्यानंतर माझी आई त्या भांड्यावर गोमूत्र शिंपडते, ती भांडी परत घासून घेते आणि मग ती स्वयंपाकघरात ठेवते. त्यानंतर पुढचे दोन दिवस मला वेगळी भांडी दिली जातात,” ती म्हणते. पाळीच्या काळात तिला काय काय करावं लागतं ते विधा अगदी तपशिलात सांगते.
तिला घराबाहेर फिरायची परवानगी नाही तसंच “आईने दिलेले कपडे सोडून दुसरं काही घालता येत नाही,” ती म्हणते. दिवसात वापरलेले दोन ड्रेस धुऊन घराच्या मागे वाळत घालावे लागतात. इतर कपड्यांमध्ये ते मिसळायचे नाहीत.
विधाचे वडील सैन्यात आहेत. तिची आईच त्यांचं १३ जणांचं कुटुंब चालवते. इतक्या मोठ्या कुटुंबामध्ये असं बाजूला बसणं म्हणजे तिला अवघडल्यासारखं होतं. खास करून तिच्याहून लहान असलेल्या भावंडांना काय सांगायचं हा प्रश्नच असतो. “माझ्या घरच्यांनी त्यांना सांगितलंय की हा एक प्रकारचा आजार आहे आणि मुलींना या दिवसात सगळ्यांपासून लांब, बाजूला बसावं लागतं. कुणी मला चुकून स्पर्श केला तर त्यांनासुद्धा ‘अशुद्ध’ मानलं जाईल आणि त्यांच्यावर गोमूत्र शिंपडल्याशिवाय ते ‘शुद्ध’ होणार नाहीत.” त्या सहा दिवसांमध्ये विधानी कशालाही स्पर्श केला तरी त्यावर गोमूत्र शिंपडलं जातं. आता त्यांच्या घरातच चार गायी आहेत म्हणून गोमूत्र मिळण्याची काही अडचण नाहीये.
या समाजात आता काही बंधनं थोडी फार कमी झाली आहेत, पण अगदीच थोडी. २०२२ साली विधाला झोपण्यासाठी स्वतंत्र पलंग मिळतोय. पण याच गावातल्या सत्तरी पार केलेल्या बीनांना मात्र पाळीच्या काळात आपल्याला कसं गोठ्यात रहावं लागायचं, ते आजही आठवतं. “आम्ही पाइनच्या झाडाची पानं जमिनीवर अंथरायचो आणि त्यावर बसायचो,” त्या सांगतात.
गावातली आणखी एक आजी सांगते. असाही काळ होता “मला कोरड्या रोट्या आणि फिकी [बिनसाखरेची ]चाय मिळायची खायला. किंवा मग जनावराला देतात तसल्या भरड्याच्या रोट्या आम्हाला द्यायचे. कधी कधी तर आम्ही आहोत याचीही आठवण रहायची नाही आणि आम्ही उपाशीच.”
अनेक स्त्री-पुरुषांना वाटतं की या प्रथा परंपरा धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याबाबत शंका उपस्थित करू नये. काही बाया असंही म्हणाल्या की हे सगळं करायला त्यांना लाज वाटते पण त्या बाजूला बसल्या नाहीत तर देवाचा कोप होईल असंही त्यांना वाटतं.
गावातला एक तरुण, विनय म्हणतो की पाळी सुरू असताना घरातल्या मुली किंवा बायांची त्यांची समोरासमोर फार क्वचित भेट होते. मोठं होत असताना त्याला एक वाक्य कानावर पडलेलं आठवतंय, ‘मम्मी अछूत हो गई है.’
२९ वर्षांचा विनय आपल्या बायकोसोबत नानकमट्टा शहरात एक खोली करून राहतोय. तो मूळचा उत्तराखंडच्या चंपावत तालुक्यातला असून अंदाजे १० वर्षांपूर्वी तो एका खाजगी शाळेत शिक्षकाची नोकरी लागल्यावर नानकमट्टाला रहायला आला. “ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे हे कुणी आम्हाला कधी सांगितलंच नाही. लहानपणापासूनच ही बंधनं पाळायचं थांबवलं तर पाळी आलेल्या मुलीकडे किंवा बाईकडे कुणी हीनपणे पाहणार नाही,” तो म्हणतो.
सॅनिटरी पॅड विकत घेणं आणि नंतर त्याची विल्हेवाट लावणं हे दोन्ही अवघड आहे. गावात एकच दुकान आहे आणि कधी कधी त्यांच्याकडे पॅड्स नसतात. छवीसारखी तरुण मुलगी म्हणते की पॅड मागितल्यावर तिच्याकडे सगळे विचित्र नजरेने पाहतात. घरी गेल्यावरसुद्धा सगळ्यांच्या नजरांपासून पॅड लपवून ठेवावे लागतात. आणि पॅडची विल्हेवाट लावायची तर अर्धा किलोमीटर लांब चालत जाऊन कॅनॉलमध्ये टाकून यावं लागतं. तेही टाकत असताना कुणी पाहत नाही ना हे बघावं लागतंच.
बाळंतपणानंतरचा ‘विटाळ’
बाळंतपणानंतरही बायांना ‘विटाळ’ सहन करावा लागतो. लताची मुलं आता वयात येतायत पण तेव्हाचा काळ तिच्या अजून लक्षात आहे. “एरवी पाळी आल्यावर ४ ते ६ दिवसच बाजूला बसावं लागतं. पण बाळंतिणीला ११ दिवसांचा विटाळ असतो. कधी कधी १५ दिवसांचा, बारसं होईपर्यंत.” लताचा मुलगा १५ वर्षांचा आणि मुलगी १२ वर्षांची आहे. ती सांगते की बाळंतीण झोपते त्या खाटेच्या बाजूने शेणाने एक रेष आखतात. म्हणजे बाकी घरापासून ती वेगळी असल्याचं कळतं.
खाटिमा तालुक्याच्या झनकत गावी लता सासरी राहत असल्याने हे सगळे रिवाज पाळत होती. ती आणि तिचा नवरा काही काळ बाहेर रहायला गेले तेव्हा तिने हे सगळं पाळणं थांबवलं होतं. “गेल्या काही वर्षांत आम्ही परत हे सगळं पाळायला लागलोय,” लता सांगते. तिने राज्यशास्त्र या विषयात एमए केलं आहे. “पाळी सुरू असलेली कुणी बाई जर आजारी पडली तर लगेच सगळे म्हणतात की देवाचा कोप झाला म्हणून. [घरी किंवा गावात] काही जरी वाईट घडलं तरी त्याचं खापर विटाळ न पाळण्यावर फोडलं जातं,” आपण हे नियम का पाळतो त्याचं जणू कारण देत लता सांगते.
ज्या घरात बाळ जन्माला आलंय तिथल्या कुणाच्या हातून लोक पाणीदेखील पीत नाहीत. सगळ्या कुटुंबालाच विटाळ लागतो, बाळ मुलगा असो किंवा मुलगी. बाळ-बाळंतिणीला स्पर्श केला तर लगेच त्याच्यावर गोमूत्र शिंपडलं जातं. शक्यतो अकराव्या दिवशी बाळ-बाळंतिणीला न्हाऊ घातलं जातं आणि गोमूत्र शिंपडलं जातं. त्यानंतर बारसं होतं.
लताची वहिनी, ३१ वर्षांची सविता हिचं वयाच्या १७ व्या वर्षीच लग्न झालं आणि त्यानंतर तिला हे सगळे नियम पाळावे लागले होते. ती सांगते की लग्न झालं त्या पहिल्या वर्षी तिला पाळीच्या काळात केवळ एक साडी नेसून जेवण वगैरे करायला लागायचं. आतले कपडे घालायला परवानगी नसायची. “पहिलं मूल झालं आणि ही सगळी बंधनं थांबली,” ती म्हणते. पण पाळीच्या काळात जमिनीवर झोपायला लागायचं हे ती सांगते.
अशा प्रथा परंपरा पाळणाऱ्या कुटुंबामध्ये लहानाचे मोठे होणारे मुलगे या सगळ्याबाबत नक्की काय भूमिका घ्यायची याबाबत साशंक आहेत. बारकीडंडी गावातला निखिल दहावीत शिकतो. तो म्हणतो की गेल्या वर्षी त्याने मासिक पाळीबद्दल वाचलं पण त्याला त्यातलं फार काही समजलं नाही. “पण तरीही मला असं वाटतं की अशा प्रकारे मुली आणि बायांना बाजूला बसायला लावणं चुकीचं आहे.” पण, त्याने आपल्या घरी हा
दिव्यांशला देखील अशीच भीती वाटते. सुनखरी गावच्या शाळेत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या दिव्यांशने दर महिन्यात आपली आई पाच दिवस बाजूला बसते हे पाहिलं आहे. “माझ्यासाठी हे इतकं नेहमीचं झालंय की सगळ्याच मुली आणि बायांना असंच करावं लागत असेल असं मला वाटतं. पण आता मला वाटायला लागलंय की हे बरोबर नाही. मोठेपणी मी पण ही प्रथा पाळेन का ती बंद करेन?” त्याच्या मनात शंका आहे.
पण गावातल्या एका जुन्या जाणत्या व्यक्तीच्या मनात मात्र अशी कसलीच शंका नाही. “उत्तरांचल [उत्तराखंडचं आधीचं नाव] ही देवभूमी आहे. त्यामुळे या प्रथा-परंपरा इथे महत्त्वाच्या आहेत,” नरेंदर म्हणतात.
ते सांगतात की त्यांच्या समाजाच्या मुलींची लग्नं वयाच्या ९-१०व्या वर्षी होत असत, पाळी सुरू होण्याआधी. “पाळी सुरू झाली तर आम्ही कन्यादान कसं करणार?” लग्नात मुलीचे वडील भावी जावयाला आपल्या कन्येचं दान करतात त्या विधीविषयी ते म्हणतात. “आता सरकारने लग्नाचं वय २१ केलंय. तेव्हापासून सरकारचे आणि आमचे नियम वेगळे झालेत.”
हे वार्तांकन मुळात हिंदीमध्ये करण्यात आलं आहे. ओळख उघड होऊ नये यासाठी लोकांची नावं बदलण्यात आली आहेत.
या वार्तांकनासाठी मदत केल्याबद्दल पारी
एज्युकेशन टीम रोहन चोप्रा याची आभारी आहे.
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा
अनुवादः मेधा काळे