“आपली चार लेकरं घेऊन दिवस रात्र पायी जाणारी ती आई – माझ्यासाठी तीच मा दुर्गा आहे.”
हे आहेत रिंतू दास, ज्यांनी स्थलांतरित मजुराच्या रुपात दुर्गामातेचं अक्षरशः चित्र रेखाटलं. कोलकात्याच्या नैऋत्येकडे असलेल्या बेहालामध्ये बारिशा दुर्गा पूजा मंडळामधलं हे अनोखं शिल्प आहे. दुर्गामातेसोबत स्थलांतरित मजुरांच्या इतरही देवता आहेत – सरस्वती, लक्ष्मी, गणपती आणि इतरही. करोना विषाणूमुळे आलेल्या महामारीदरम्यान स्थलांतरित कामगारांना जो संघर्ष करावा लागला त्याला आदरांजली म्हणून हा देखावा उभारण्यात आला आहे.
४६ वर्षांचे रिंतू दास यांना टाळेबंदीच्या काळात “गेली सहा महिने मी माझ्याच घरी नजरकैदेत असल्यासारखं” वाटत होतं. आणि ते म्हणतात, “आणि टीव्ही सुरू केला की समोर मृत्यूचं तांडव सुरू. किती जणांना याच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. किती तरी जण रात्रंदिवस पायी चालतायत. कधी कधी तर अन्नाचा घास नाही ना पाण्याचा घोट. आया चालत होत्या, आणि त्यांच्या मुली. तेव्हाच मी ठरवलं की मी या वर्षी जर पूजा केली तर मी या लोकांसाठी प्रार्थना करेन. या आयांचा मी सन्मान करेन.” आणि म्हणूनच दुर्गामाता एका स्थलांतरित मजूर आईच्या रुपात साकार झाली.
“मूळ संकल्पना निराळी होती,” रिंतू दास यांच्या संकल्पनेप्रमाणे मूर्ती घडवणारे ४१ वर्षांचे पल्लब भौमिक सांगतात. पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातल्या आपल्या घरून ते पारीशी बोलत होते. २०१९ साली दुर्गापूजेचा सोहळा संपत नाही तोवर “बारिशा मंडळाच्या लोकांना यंदाच्या पूजेची तयारी सुरू केली होती. पण मग कोविड-१९ ची महामारी आली आणि अर्थातच २०२० आगळंच असणार याची सगळ्यांनाच कल्पना आली. त्यामुळे मग मंडळाचं आधीचं सगळं नियोजन गुंडाळून ठेवावं लागलं.” आणि मग नव्या कल्पना टाळेबंदी आणि श्रमिकांच्या अपेष्टांभोवती रचलेल्या होत्या.
“मी दुर्गा माता, तिची मुलं आणि महिषासुराच्या मूर्ती तयार केल्या,” भौमिक सांगतात, “इतर कारागिरांनी रिंतू दास यांच्या देखरेखीखाली देखाव्याच्या इतर भागांवर काम केलं. रिंतू बारिशा मंडळाच्या पूजा उत्सवाचे कला दिग्दर्शक आहेत.” देशभर सगळीकडेच आर्थिक घडी कोलमडायला लागली, त्याचा परिणाम सगळ्याच पूजा मंडळांवर झाला. “बारिशा मंडळांची आर्थिक तरतूद देखील निम्म्यावर आली. त्यामुळे मूळ संकल्पना साकारणं शक्यच नव्हतं. आणि मग रिंतूदांनी दुर्गामातेला स्थलांतरित कामगाराच्या रुपात साकारण्याची कल्पना मांडली. आम्ही त्यावर चर्चा केली आणि त्यानंतर मूर्तीवर काम सुरू केलं. हा देखावा दिसतोय तो सामूहिक प्रयत्नांचं साकार रुप आहे.”
भौमिक सांगतात, आजूबाजूच्या घडामोडींमुळे “मला उपाशी पोटी लेकरांसह अपेष्टा सहन करणारी दुर्गादेवीची मूर्ती साकारावीशी वाटली.” दास यांच्याप्रमाणे त्यांनीही आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेऊन आपापल्या गावांचा लांबलचक प्रवास पायी करणाऱ्या गरीब आयांची अनेकानेक दृश्यं पाहिली होती. ग्रामीण भागातले कलाकार असल्याने त्यांनी सभोवतालच्या अनेक आयांचा संघर्षही पाहिलेला होता. “नाडिया जिल्ह्यातल्या माझ्या कृष्णनगर या गावी हा देखावा पूर्ण करण्यासाठी मला तीन महिने लागले. तिथून तो बारिशाच्या मांडवात आला,” भौमिक सांगतात. कोलकात्याच्या शासकीय कला महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या कामावर विख्यात कलावंत बिकाश भट्टाचर्जी यांच्या कामाचा मोठा प्रभाव होता. त्यांनी घडवलेल्या दुर्गेची संकल्पना भट्टाचर्जींच्या दर्पमयी या चित्रापासून स्फुरलीये.
या मंडळाच्या देखाव्याला लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. “हा देखावा आमच्याबद्दल आहे,” मागच्या गल्लीबोळात पसार होण्याआधी एक कामगार म्हणतो. दुर्गेला स्थलांतरित कामगाराच्या रुपात दाखवल्याबद्दल इंटरनेटवर अर्थातच भरपूर टीका झालीये. पण “ही देवी सगळ्यांची आई आहे,” नियोजन समितीचे प्रवक्ते सांगतात.
आणि दुर्गेच्या या रुपावर टीका करणाऱ्यांना पल्लब भौमिक म्हणतातः “बंगालचे शिल्पकार, मूर्तीकार आणि कलाकारांनी कायमच आपल्या सभोवताली दिसणाऱ्या स्त्रियांच्या रुपात दुर्गेचा विचार केला आहे.”
या कहाणीसाठी स्मिता खातोर आणि सिंचिता माजी यांची मदत झाली, त्यांचे आभार.
अनुवादः मेधा काळे