हा लेख पारी निर्मित वातावरण बदलाच्या मागावरः रोजच्या जगण्यातल्या विलक्षण कहा ण्यांपैकी असून या लेखमालेस २०१९ सालासाठीच्या पर्यावरणविषयक लेखन विभागाअंतर्गत रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला आहे.

“कुनाला सांगितलं तर लोक मला येडा म्हणतील,” आपल्या दगड मातीच्या घरात सारवलेल्या जमिनीवर बसलेले ५३ वर्षांचे ज्ञानू खरात सांगतात. “३०-४० वर्षांपूर्वी पावसाळ्यात पाणी इतकं व्हायचं की [जवळच्या ओढ्यातून] आमच्या रानानी निस्ते माशे यायचे. माझ्या हातानं माशे धरलेत मी.”

जून महिन्याचा दुसरा आठवडा आहे. आम्ही पोचलो त्याच्या थोडंच आधी खरात वस्तीत खरातांच्या घरी ५,००० लिटरचा टँकर आलाय. ज्ञानूभाऊ, त्यांच्या पत्नी फुलाबाई आणि १२ जणांच्या एकत्र कुटुंबातले बरेच जण घरातल्या सगळ्या टाक्या, भांडी, हंडे भरतायत.

“काय सांगू, ५०-६० वर्षांखाली असा पाऊस व्हायचा, अशी झड लागायची, डोळा उघडू द्यायचा नाही,” गौडवाडीच्या ७५ वर्षांच्या गंगुबाई गुळीग सांगतात. सांगोल्यातल्या ६०९ उंबरा असलेल्या गौडवाडीच्या मळ्यातल्या आपल्या घरात जिवापाड जपलेल्या चार लिंबांच्या सावलीत गंगुबाई विसाव्याला बसल्या आहेत. “तुमी येताना त्या बाभळी लागल्या का, ती सगळी रानं मटक्यांची आहेत. एक नंबर मटक्या व्हायच्या. मुरमाड जमीन, जमिनीतून पाझर फुटून पाणी वाहायला लागायचं, असला पाऊसकाळ होता. निसते एकरात चार तास काढले तर पाच पोती बाजरी होत होती. असल्या जमिनी होत्या,” गंगुबाई सांगतात.

आणि ऐंशी वय पार केलेल्या हौसाबाई अलदरांना अलदर वस्तीवरच्या त्यांच्या सासऱ्याच्या रानातल्या जोड विहिरी आठवतात. “पूर्वीचा पाऊसकाळ काय सांगायचा? दोन्ही विहिरींवर दोन-दोन मोटा. चारी मोटा एका वेळी चालायच्या एवढं पाणी होतं विहिरींना. कोणत्याही वेळी माणूस येऊ द्या, त्याला सासरा मोट चालवून पाणी द्यायचा. आता कुणाला हंडाभर पाणी मागायची देखील मुश्किल झाली आहे. पान फिरलं, उपारतं झालं.”

PHOTO • Sanket Jain

आपल्या एकत्र कुटुंबाबरोबर ज्ञानू खरात (सर्वात डावीकडे) आणि फुलाबाई (डावीकडून तिसऱ्या): पूर्वी रानात येणारे मासे आजही त्यांना आठवतात

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात या अशा कहाण्या कानावर येतच असतात. खरं तर हा तालुका पर्जन्यछायेच्या प्रदेशात, माणदेशात मोडतो. सोलापूर जिल्ह्यातले सांगोला आणि माळशिरस, सांगली जिल्ह्यातले जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ आणि सातारा जिल्ह्यातले माण आणि खटाव या तालुक्यांचा मिळून बनतो तो माणदेश.

चांगला पाऊस आणि पाठोपाठ येणारा दुष्काळ हे इथलं चक्र आहे त्यामुळे भरपूर पाऊसपाण्याइतक्याच अभावाच्या, टंचाईच्या आठवणीही लोकांच्या मनावर कोरलेल्या आहेत. आता मात्र या भागातून सगळं काही “उपारतं झाल्याचं” ऐकायला येतंय. चांगला आणि नेमाने येणारा पाऊस, पीकपाणी याचं चक्र आता बदलत चाललंय, किती तरी गौडवाडीचे निवृत्ती शेंडगे म्हणतात तसं, “सपनात बी आता पाऊस येईना गेलाय.”

“ही छावणी बसलीये ना हे इथलं रान बाजरीचं आहे. एक नंबर बाजऱ्या व्हायच्या. मी स्वतः कसलंय की...” चारा छावणीतल्या आपल्या खाटेपाशी ८३ वर्षांचे विठोबा सोमा गुळीग उर्फ तात्या पान लावता लावता सांगतात. मे महिन्यातली दुपारची वेळ आहे. “सगळंच बदलत चाललंय आता,” ते काळजीने म्हणतात. “आमच्या गावातून पाऊस गायबच झालाय.”

तात्या दलित होलार समाजाचे आहेत त्यांची अख्खी हयात आणि खरं तर त्यांच्या मागच्या ५-६ पिढ्या गौडवाडीतच राहिल्या आहेत. तात्यांचं आयुष्य खडतर होतं. साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी आणि त्यांच्या पत्नी गंगुबाईंनी सांगली, कोल्हापूरला जाऊन ऊस तोडलाय, लोकांच्या रानात कामं केलीयेत, शासनाच्या रोजगार हमीच्या कामावर कष्ट केलेत. “आमची ४-५ एकर जमीन गेल्या १०-१२ वर्षांपूर्वी घेतलीये. तोपर्यंत निसते कष्टच होते की,” ते म्हणतात.

PHOTO • Sanket Jain

मे महिन्यात गौडवाडीच्या चारा छावणीत विठोबा गुळीग उर्फ तात्या म्हणतात, ‘आमच्या गावातनं पाऊस गायबच व्हायलाय’

तात्यांना माणदेशात सध्या पडलेल्या दुष्काळाचा घोर लागून राहिला असला तरी ते म्हणतात की १९७२ पासून पावसाचा मेळच बसला नाही. “कमी कमीच होत चाललाय. वळीव नाही, परतीचा पाऊस नाही.”

गौडवाडीच्या अनेक जुन्या-जाणत्या लोकांचं म्हणणं हेच की ४०-५० वर्षांपासून पावसाचं सगळं चक्रच बिनसलंय. सुरुवात झाली ती १९७२ च्या दुष्काळापासून. त्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात केवळ ३२१ मिमि पाऊस झाल्याचं दिसून येतं. इंडिया वॉटर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या भारतीय वेधशाळेच्या आकडेवारीवरून असं दिसतं की १९०१-२००२ या काळातला हा सर्वात कमी पाऊस आहे.

गंगूबाईंसाठी ७२ च्या दुष्काळाच्या आठवणी – नेहमीपेक्षाही अधिक - श्रमांच्या आणि उपासमारीच्या आठवणी आहेत. “सडकंची, विहिरींची, तळ्याची दगडं फोडायची कामं असायची. अंगात रग होती आन् पोटात भूक. १२ आणे मजुरीवर १ पोतं खपल्या दळायची कामं केलीयेत मी. तेव्हापासून बिघडतच गेलं सगळं,” त्या म्हणतात.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Medha Kale

२०१८ साली सांगोल्यात गेल्या वीस वर्षांतला सगळ्यात कमी पाऊस झाला आणि तालुक्यातल्या सगळ्या गावात भूजलाची पातळी १ मीटरहून जास्त खाली गेली

“७२ सारखा दुष्काळ कुणीच पाहिलेला नाही, मी हितनं एकला १२ जनावरं घेऊन १० दिवस चालत कोल्हापूरला गेलो होतो,” छावणीतल्या चहाच्या टपरीवर येऊन बसलेले गौडवाडीचे दादा गडदे सांगतात. "दुष्काळ तर असला, मिरजेच्या रस्त्याला लिंबाच्या झाडांना पाला राहिला नव्हता. लोकांनी ओरबाडून जनावरांना खायला घातलेला. लई बेकार दिवस. तेव्हापासनं घडी बसलीच नाही परत.”

कायमच्याच दुष्काळाच्या फेऱ्यामुळे २००५ च्या सुमारास सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातले दुष्काळी तालुके एकत्र करून माणदेश हा स्वतंत्र जिल्हा करावा अशी मागणीही जोर धरू लागली होती. (पुढे या आंदोलनातल्या काही नेत्यांनी सिंचनाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याने ही मागणी मागे पडली).

गौडवाडीतल्या अनेकांच्या मनावरचं १९७२ च्या दुष्काळाचं सावट तसंच असलं तरी सोलापूर जिल्ह्याच्या संकेतस्थळावरची आकडेवारी पाहिली तर २००३ आणि २०१५ साली तर अनुक्रमे २७८.७ मिमि आणि २५१ मिमि इतक्या कमी पावसाची नोंद झाली आहे.

२०१८ साली सांगोल्यात पावसाळ्यात फक्त २४ दिवस आणि केवळ २४१ मिमि पाऊस पडल्याचं राज्याच्या कृषी विभागाच्या Rainfall Recording and Analysis या वेबसाइटवरील माहितीवरून दिसून येतं. गेल्या २० वर्षातला हा सगळ्यात कमी पाऊस  आहे. या खात्याच्या आकडेवारीनुसार सांगोल्याचा ‘नॉर्मल’ पाऊस ५३७ मिमि इतका आहे.

भरपूर पाणी असण्याचे दिवस कमी किंवा खरं तर गायबच व्हायला लागलेत आणि उष्ण, कोरड्या दिवसांची, पाण्याची टंचाई असणाऱ्या महिन्यांची संख्या वाढत चालली आहे.

PHOTO • Medha Kale

पिकांचं आच्छादन नाही आणि उष्णतेत वाढ, जमिनीची शुष्कता वाढत चालली आहे

या वर्षी मे महिन्यात, गौडवाडीच्या छावणीमध्ये तापमानाचा पारा ४६ अंशापर्यंत पोचलाय. उष्णतेमुळे हवा आणि माती, दोन्हीतली शुष्कता वाढत चालली आहे. न्यू यॉर्क टाइम्सच्या वातावरण आणि जागतिक तापमान वाढीबद्दलच्या एका संवादी पोर्टलच्या आधारे असं दिसतंय की १९६० साली, जेव्हा तात्या २४ वर्षांचे होते तेव्हा सांगोल्यामध्ये वर्षाकाठी ३२ अंशाहून जास्त तापमान असणारे १४४ दिवस होते. आज तो आकडा १७७ वर पोचला आहे आणि २०३६ साली, तात्या जेव्हा शंभरी पार करतील तेव्हा असे १९३ उष्ण दिवस असतील.

चारा छावणीत आपल्या खोपीपाशी बसलेले तात्या सांगतात, “पूर्वी सगळं टायमाला होत होतं. ७ जूनला मिरीग निघनार म्हंजी निघनार. मिरगाला पाऊस सुरू झाला की (भिवघाटाच्या ओढ्याला) पुसापर्यंत धार रहायची. कसं असतंय, रोहिण्यांच्या, मिरगाच्या पाण्यावर पेरण्या झाल्या की पिकाला आकाशाचं संरक्षण लाभतं. बिनघोर पिकं वाढतात. त्याची टवटवी कशी असते? तसलं अन्न खाऊन माणूस आजारी होत नाही. पण आता सगळंच बदलत चाललंय.”

छावणीतले बाकी शेतकरी माना डोलावतात. पावसाच्या लहरीपणामुळे सगळेच चक्रावलेत. “पंचांगात निघालंय ‘घावील तो पावील’. एकांद्याची पेरणी साधली तर साधली. ज्याची न्हाई त्याची न्हाई. बरं पाऊसही कसा - शेताआड शेतात. सब सारखा नाही,” तात्या पंचांगातलं पावसाचं भाकीत समजावून सांगतात.

रस्त्याच्या पलिकडच्या भागात खोपीत बसलेल्या कोळंच्या खरात वस्तीच्या फुलाबाई खरात आपले दोन रेडे आणि एक म्हैस घेऊन छावणीत आल्या आहेत. धनगर समाजाच्या फुलाबाईंना आजही “सगळ्या नक्षत्रात” येणार पाऊस आठवतो. “पूर्वी कसं धोंड्याच्या महिन्यात [दर तीन महिन्यांनी येणारा अधिक महिना] तेवढा पाऊस गप व्हायचा. नंतरची दोन वर्षं मात्र नेमानं यायचा. आजकाल मधल्या वर्षातही पाऊस गायबच व्हायला लागलाय.”

या सगळ्या बदलांना सामोरं जाता जाता सांगोल्याच्या शेतकऱ्यांना पीक पद्धतीत बदल करावे लागले आहेत. इथली बहुतेक पद्धत म्हणजे खरिपात हुलगे, मटकी, बाजरी आणि तूर तर रबीला गहू, हरभरा आणि ज्वारी. उन्हाळी मका आणि ज्वारीच्या काही जाती, खास करून जनावरांना चाऱ्यासाठी घ्यायच्या.

“गेल्या २० वर्षांत मटक्या पेरल्याचं मला आठवत नाही. पाच महिन्यांची बाजरी नाही, ना पाच महिन्यांची तूर. खपली गहू मोजके जणच पेरतायत. हुलगे पण कमी झाले, तीळही नाहीत,” अलदर वस्तीच्या हौसाबाई सांगतात.

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

डावीकडेः फुलाबाई खरात म्हणतात, ‘गेल्या कित्येक वर्षांपासून पाऊस गप्पच व्हायला लागलाय...’. उजवीकडेः गंगुबाई गुळीग म्हणतात, ‘१९७२ नंतर सगळंच बिनसत गेलं’

पाऊस यायलाच जून अखेर किंवा जुलै उजाडतोय आणि सप्टेंबरमध्ये फारसा येतच नाही. त्यामुळे लोक कमी दिवसाचं वाण वापरू लागले आहेत. पेरल्यापासून अडीच महिन्यात पीक हाती यावं. “बाजरी, तूर, मटकी आणि ज्वारीच्या देशी पाच महिन्यांची वाणं आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ती घेताच येत नाहीत कारण जमिनीत तेवढी ओलच नाहीये,” नवनाथ माळी सांगतात. हवमानाचा अचूक अंदाज यावा म्हणून त्यांच्यासह गौडवाडीचे २० शेतकरी कोल्हापूरच्या अमिकस ॲग्रो गटाचे सदस्य झाले आहेत. काही फी भरून त्यांना एसएमएसद्वारे हवामानाचे अंदाज कळवले जातात.

भरड धान्याला पर्याय म्हणून २० वर्षांपासून लोकांनी डाळिंबाचा बाग लावायला सुरुवात केली. सरकारचं अनुदानही मिळालं. देशी, गणेश, आरक्ता आणि आता भगवा डाळिंबांसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. “सुरुवातीला आम्हाला एकरी २-३ लाखांचं उत्पन्न मिळालं. पण गेल्या आठ-दहा वर्षांपासून डाळिंबावर तेल्याचं प्रमाण वाढलंय. बदलत्या हवेचाच हा परिणाम असावा असं वाटतंय. गेल्या वर्षी २५-३० रुपये किलोने डाळिंब विकावं लागलं. निसर्गाच्या लहरीपुढे कुणाचं काय चालणार?” माळी म्हणतात.

वळीव आणि परतीच्या पावसामध्येही बदल झालेत ज्याचा पिकांवर परिणाम होतोय. सांगोल्यात परतीच्या पावसाचं प्रमाण लक्षणीय रित्या कमी झालं आहे. २०१८ साली तालुक्यात केवळ ३७.५ मिमि परतीच्या पावसाची नोंद झाली आहे. कृषी खात्याच्या आकडेवारीप्रमाणे १९९८ ते २०१८ सालच्या नोंदींप्रमाणे परतीच्या पावसाची सरासरी ९३.११ मिमि इतकी आहे.

“माणदेशासाठी सगळ्यात चिंतेची बाब काय असेल तर ती म्हणजे वळीव आणि परतीचा पाऊसच गायब होत चाललाय,” माणदेशी फौंडेशनच्या संस्थापक चेतना सिन्हा सांगतात. (या वर्षी १ जानेवारी रोजी राज्यातली पहिली चारा छावणी माणदेशी फौंडेशनने सुरू केली, ज्यात सुमारे ८००० जनावरांनी आश्रय घेतला). “आमच्या भागासाठी परतीचा पाऊस महत्त्वाचा आहे कारण रब्बीच्या पिकावरच आम्हाला धान्य आणि जनावरांसाठी चारा मिळतो. गेल्या १० वर्षांपासून परतीचा पाऊसच गायब झाल्यामुळे माणदेशातल्या पशुपालक आणि इतर समाजांवर त्याचा मोठा परिणाम व्हायला लागला आहे.”

PHOTO • Sanket Jain
PHOTO • Sanket Jain

चाऱ्याच्या टंचाईमुळे सांगोल्यात उन्हाळ्यामध्ये चारा छावण्या उभाराव्या लागल्या आहेत

मात्र पिकांमधला सगळ्यात मोठा बदल म्हणजे जिल्ह्यात उसाखालच्या क्षेत्रात झालेली वाढ. २०१६-१७ साली सोलापूर जिल्ह्यात एकूण १,००,५०५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होऊन सुमारे ६,३३,००० टन उसाचं उत्पादन झालं असं महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचलनालयाच्या अहवालातून समोर येतं. जानेवारी २०१९ मध्ये वर्तमानपत्रात आलेल्या काही बातम्यांवरून दिसतं की ऑक्टोबर मध्ये गाळप हंगाम सुरू झाला त्यात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातल्या ३३ कारखान्यांनी मिळून एक कोटी टनांहून अधिक उसाचं गाळप केलं आहे.

सोलापूर स्थित वरिष्ठ पत्रकार आणि जल संवर्धन क्षेत्रातले कार्यकर्ते, रजनीश जोशी यांनी म्हटलंय की एक टन ऊस गाळप करण्यासाठी १,५०० लिटर पाणी लागतं. म्हणजे ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ या हंगामात एकट्या सोलापूर जिल्ह्यात उसाच्या गाळपासाठी १५ अब्ज लिटर पाणी पाणी वापरलं गेलं.

आधीच अवर्षण आणि सिंचनांच्या अतिशय तुंटपुंज्या सोयी आणि त्यात आहे ते पाणी एका नगदी पिकासाठी वापरलं जातंय असं चित्र आहे. गौडवाडीच्या एकूण १३६१ हेक्टर क्षेत्रफळापैकी (जनगणना, २०११) केवळ ३०० हेक्टर बागायत आणि बाकी ६००-७०० हेक्टर जिरायत क्षेत्र आहे. एकूण जिल्ह्याची स्थिती पाहिली तर सोलापूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पीय क्षमता ७,७४,३१५ हेक्टर आहे मात्र २०१५ साली त्यातलं ४० टक्क्यांहून कमी क्षेत्र ओलिताखाली आलं आहे.

पिकांचं आच्छादन कमी झालंय (पाऊस कमी त्यामुळे कमी दिवसात येणारी पिकं घेतली जातायत) आणि वाढती उष्णता यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या मते जमिनी अजून शुष्क पडत चालल्या आहेत. हौसाबाई म्हणतात तसं, “जमिनीत वीतभर बी ओल राहत नाही.”

PHOTO • Medha Kale

नवनाथ माळी यांच्या अंदाजानुसार गौडवाडीत किमान १५० खाजगी बोअर वेल आहेत आणि त्यातल्या किमान १३० कोरड्या पडल्या आहेत

भूजलाची पातळी देखील खालावत चालली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने प्रसिद्ध केलेल्या संभाव्य पाणी टंचाई अहवालानुसार २०१८ साली सांगोला तालुक्यात सर्वच्या सर्व १०२ गावांमध्ये भूजलाची पातळी १ मीटरहून जास्त खालावली आहे. “आम्ही बोअर घेतली, ७५० फुटांवर पण पाणी लागंना गेलंय. रानं शुष्क पडलीयेत,” गौडवाडीत चार एकर जमीन असणारे, केशकर्तनाचं काम करणारे जोतीराम खंडागळे सांगतात. “गेल्या काही वर्षांपासून खरिपाची  आणि रब्बीची पिकं हातची गेलीयेत,” ते म्हणतात. माळी यांच्या अंदाजनुसार गावात १५० खाजगी बोअर वेल आहेत, ज्यातल्या १३० तरी कोरड्या पडल्या आहेत – आणि आता लोक १,००० फूट खाली पोचलेत, तरी पाणी लागत नाहीये.

उसाकडे ओढा वाढलेला असल्याने भरड धान्यांचा पेरा कमी व्हायला लागलाय. २०१८-१९ साली सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचा पेरा  ४१% आणि मक्याची पेरणी ४६% क्षेत्रावर झाली आहे असं कृषी खात्याची आकडेवारी सांगते. संपूर्ण राज्यात ज्वारीखालचं क्षेत्र ५७ टक्क्यांनी आणि मक्याखालचं ६५ टक्क्यांनी कमी झाल्याचं २०१८-१९ चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. या दोन्ही पिकांचं उत्पादनही तब्बल ७० टक्क्यांनी कमी झाल्याची यात नोंद आहे.

ही दोन्ही पिकं माणसांना धान्य आणि जनावरांना चारा पुरवणारी महत्त्वाची पिकं आहेत. चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे सरकारला या उन्हाळ्यात सर्वत्र चारा छावण्या सुरू करणं भाग पडलं होतं – एकट्या सांगोला तालुक्यात १०५ छावण्या सुरू झाल्या असून त्यात सुमारे ५०,००० जनावरं आश्रयाला गेली आहेत असं पोपट गडदे सांगतात. ते एका सहकारी दूध संकलन संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि गौडवाडीची छावणी त्यांनीच सुरू केली आहे. विचार करण्याची गोष्ट म्हणजे या चारा छावण्यांमध्ये जनावरं खातायत तरी काय? ऊस. हेक्टरी किमान २ कोटी ९७ लाख लिटर पाणी ओरपणारा ऊस.

तर, सांगोल्यात बऱ्याच गोष्टी बदलतायत. काही निसर्गाच्या लहरीमुळे पण बऱ्याचशा मानवाच्या हस्तक्षेपातून. कमी होत चाललेला पाऊस, पावसांच्या दिवसांची घटती संख्या, वाढणारं तापमान, अति उष्मा असणाऱ्या दिवसांची वाढती संख्या, वळीव आणि परतीच्या पावसाचं गायब होणं आणि जमिनीतली ओलच नाहिशी होणं असे किती तरी घटक दिसतायत. पीक पद्धतीही बदलत चाललीये – कमी दिवसांची वाणं येतायत, देशी वाणांपेक्षा संकरित बियाणं वापरली जातायत, ज्वारी, मक्याचं प्रमाण कमी होतंय आणि नगदी पिकांकडे ओढा वाढतोय. सिंचन अपुरं आहे, भूजलाच्या पातळीत घट झालीये – आणखीही किती तरी घटक आहेत.

तात्यांना मात्र जेव्हा विचारलं की हे बदल नक्की का घडतायत तेव्हा ते हसतात आणि म्हणतात, “मेघराजाच्या मनात काय चाललंय ते जर कळलं असतं तर काय हवं होतं! मला सांगा, माणूस लबाड झाल्यावर पाऊस तरी कसा यावा? माणसानंच रीत सोडल्यावर, निसर्गाने तरी ती कशी पाळावी?”

PHOTO • Sanket Jain

सांगोला शहराच्या बाहेरून वाहणाऱ्या माण नदीच्या कोरड्या ठाक पात्रातला जुना बंधारा

कार्यकर्ते शहाजी गडहिरे आणि दत्ता गुळीग यांनी दिलेला मोलाचा वेळ आणि माहिती याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

शीर्षक छायाचित्रः संकेत जैन/पारी

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

Reporter : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale
Editor : Sharmila Joshi

ਸ਼ਰਮਿਲਾ ਜੋਸ਼ੀ ਪੀਪਲਸ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਦੀ ਸਾਬਕਾ ਸੰਪਾਦਕ ਹਨ ਅਤੇ ਕਦੇ ਕਦਾਈਂ ਲੇਖਣੀ ਅਤੇ ਪੜ੍ਹਾਉਣ ਦਾ ਕੰਮ ਵੀ ਕਰਦੀ ਹਨ।

Other stories by Sharmila Joshi

ਪੀ ਸਾਈਨਾਥ People’s Archive of Rural India ਦੇ ਮੋਢੀ-ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਹ ਕਈ ਦਹਾਕਿਆਂ ਤੋਂ ਦਿਹਾਤੀ ਭਾਰਤ ਨੂੰ ਪਾਠਕਾਂ ਦੇ ਰੂ-ਬ-ਰੂ ਕਰਵਾ ਰਹੇ ਹਨ। Everybody Loves a Good Drought ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਕਿਤਾਬ ਹੈ। ਅਮਰਤਿਆ ਸੇਨ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਾਲ (famine) ਅਤੇ ਭੁੱਖਮਰੀ (hunger) ਬਾਰੇ ਸੰਸਾਰ ਦੇ ਮਹਾਂ ਮਾਹਿਰਾਂ ਵਿਚ ਸ਼ੁਮਾਰ ਕੀਤਾ ਹੈ।

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

ਸ਼ਰਮਿਲਾ ਜੋਸ਼ੀ ਪੀਪਲਸ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਦੀ ਸਾਬਕਾ ਸੰਪਾਦਕ ਹਨ ਅਤੇ ਕਦੇ ਕਦਾਈਂ ਲੇਖਣੀ ਅਤੇ ਪੜ੍ਹਾਉਣ ਦਾ ਕੰਮ ਵੀ ਕਰਦੀ ਹਨ।

Other stories by Sharmila Joshi