गाठ कडक झाली होती, “हड्डी की तरह,” प्रीती यादव सांगते.
२०२० साली जुलै महिन्यात प्रीतीला उजव्या स्तनामध्ये मटाराच्या आकाराची काही तरी वाढ झाल्याचं जाणवलं. त्याला वर्ष झालं. पटण्यामधल्या कर्करोग रुग्णालयातल्या कर्करोगतज्ज्ञांनी बायोप्सी करून ही वाढ काढून टाकावी लागेल असा सल्ला दिला होता त्यालाही आता वर्ष उलटेल.
पण प्रीती काही परत हॉस्पिटलमध्ये गेलेली नाही.
“करवा लेंगें,” ती म्हणते. प्रीतीचं घरं चांगलं प्रशस्त, मोठं अंगण, फुलांची झाडं. घराच्या ओसरीत प्लास्टिकच्या विटकरी रंगाच्या खुर्चीवर प्रीती बसली होती.
ती हलक्या आवाजात बोलते. तिचे शब्द थकून आल्यासारखे भासतात. गेल्या काही वर्षांत तिच्या कुटुंबातल्या किमान चार व्यक्ती कॅन्सरने मरण पावल्या आहेत. बिहारच्या सरन जिल्ह्यातल्या तिच्या सोनेपूर गावात मार्च २०२० मध्ये कोविडची महासाथ पसरण्याआधी काही वर्षांपासून कॅन्सरचे अनेक रुग्ण आढळले आहेत. (तिच्या विनंतीवरून तिच्या गावाचं आणि तिचं नाव बदलण्यात आलं आहे.)
शस्त्रक्रिया करून गाठ कधी काढून टाकायची हा काही २४ वर्षीय प्रीतीचा एकटीचा निर्णय नाही. तिच्या घरचे तिच्या लग्नाचं पाहतायत, सैन्यदलात नोकरी असणारा शेजारच्या गावातला एक मुलगा पसंतही केला आहे. “मी लग्नानंतर सुद्धा ऑपरेशन करून घेऊ शकते ना? डॉक्टर म्हणाले की कधी कधी मूल झाल्यावर अशा गाठी आपोआप विरघळून जातात,” ती म्हणते.
पण जर लग्न ठरलं तर नवऱ्या मुलाकडच्यांना या गाठीबद्दल तसंच ही गाठ ऑपरेशन करून काढून टाकावी लागू शकते हे सांगणार का? किंवा तिच्या कुटुंबातल्या अनेकांना कॅन्सर झाल्याची माहिती देणार का नाही? “वही तो समझ नही आ रहा,” ती म्हणते. या गुंत्यापायी ऑपरेशनचा निर्णय होत नाहीये.









