“या सगळ्या याचिका घेऊन जा आणि फाडून टाका,” चामरुने आदेश दिला. “या ग्राह्य नाहीत. आणि म्हणून हे कोर्ट त्यांची दखल घेणार नाही.”
मॅजिस्ट्रेटचं काम चामरुला आवडू लागलं होतं.
ऑगस्ट १९४२. सगळा देश धुमसत होता. संबलपूरचं न्यायालय तर नक्कीच. चामरु परिदा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी नुकताच कोर्टावर कब्जा केला होता. चामरू स्वतः ‘जज’ झाला होता. आणि त्याचा ‘ऑर्डर्ली’ होता जितेंद्र प्रधान. पूर्णचंद्र प्रधानने पेशकाराची जबाबदारी स्वीकारली होती.
कोर्टाचा ताबा म्हणजे चले जाव चळवळीतलं त्यांचं मोलाचं योगदान.
“या सगळ्या याचिका इंग्रज सरकारच्या नावे लिहिल्या आहेत”, आधीच बुचकळ्यात पडलेल्या कोर्टातल्या गर्दीला उद्देशून चामरु म्हणाला. “आपण स्वतंत्र भारतात राहतो. तुम्हाला तुमच्या याचिका दाखल व्हाव्या असं वाटत असेल तर त्या परत घेऊन जा. महात्मा गांधींच्या नावाने त्या नव्याने लिहा. मगच मी त्यांची योग्य ती दखल घेईन.”
या घटनेला साठ वर्षं उलटून गेली, पण चामरु आजही मोठ्या खुशीत त्या दिवसाची गोष्ट कथन करत होते. ते आज ९१ वर्षांचे आहेत आणि त्यांच्या मागे बसलेले जितेंद्र प्रधान ८१ वर्षांचे. पूर्णचंद्र आता नाहीत. ओडिसाच्या बारगड जिल्ह्यातल्या पाणिमारा गावात चामरु राहतात. स्वातंत्र्य चळवळ भरात असताना या गावच्या मातीतले कित्येत जण या लढाईत सामील झाले होते. केवळ १९४२ मध्ये या गावचे ३२ जण तुरुंगात गेल्याची नोंद आहे. त्यातले चामरू आणि जितेंद्र धरून सात जण आजही जिवंत आहेत.
एक काळ असा होता, जेव्हा या गावचा जवळजवळ घरटी एक जण सत्याग्रह चळवळीत सामील झाला होता. या गावाला इंग्रज राजवट सहन होत नव्हती. त्यांची एकी अतूट होती. आणि त्यांचा निर्धार सर्वदूर ख्यात होता. आणि इंग्रजांचा सामना करणारे हे सत्याग्रही मोठे कुणी नाही तर गरीब आणि निरक्षर शेतकरी होते. दोन घासासाठी खस्ता खाणारे छोटे कास्तकार. स्वातंत्र्यानंतर आजही त्यांची दशा मात्र तशीच आहे.
इतिहासाच्या पुस्तकांमध्ये त्यांचा साधा उल्लेखही सापडणार नाही. इतकंच काय ओडिशालाही त्यांचा तसा विसरच पडलाय. पण बारगडमध्ये मात्र पाणिमारा आजही स्वातंत्र्याचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावातल्या फारसा कुणाला याचा वैयक्तिक कसलाच फायदा झालेला नाही. पारितोषकं, पदं किंवा नोकऱ्यांसाठी तर नक्कीच नाही. तरीही त्यांनी जोखीम पत्करली. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ते लढले.
या लढ्याचं हे पायदळ होतं म्हणा ना. अनवाणी. एरवीही पायताणाचा पत्ता नसणारं स्वातंत्र्य संग्रामाचं हे पायदळ.
* * *
“कोर्टातले पोलिस हबकूनच गेले. काय करावं तेच त्यांना सुधरत नव्हतं,” चामरुंना आजही हसू आवरत नाही. “जेव्हा ते आम्हाला अटक करायला आले, तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘मी इथला मॅजिस्ट्रेट आहे. तुमचं काम माझ्या आदेशाचं पालन करणं आहे. जर तुम्ही भारतीय असाल तर मी सांगतो तसं करा. आणि तुम्ही इंग्रज असाल तर तुमच्या देशात चालते व्हा’.”
त्यानंतर पोलिस खऱ्या मॅजिस्ट्रेटकडे गेले. तो घरी होता. “त्याने आम्हाला अटक करण्याच्या आदेशावर सही करायला नकार दिला कारण वॉरंटमध्ये कुणाची नावंच लिहिलेली नव्हती,” जितेंद्र प्रधान तेव्हाच्या आठवणी सांगतात. “पोलिस आमची नावं विचारायला परत आले. पण आमची नावं-बिवं आम्ही थोडंच सांगतोय.”
बुचकळ्यात पडलेले पोलिस मग संबलपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. “तो सगळा गोंधळ ऐकून कलेक्टर पार थकून गेला. ‘काही तरी नावं घाला. त्यांना अ, ब, क म्हणा आणि फॉर्म भरा.’ पोलिसांनी तेच केलं आणि आम्हाला गुन्हेगार अ, ब आणि क अशी अटक झाली,” चामरू सांगतात.
पोलिसांसाठी तो दिवस म्हणजे खरंच परीक्षाच होती. चामरूंना हसू आवरत नाही. “तुरुंगात गेलो तर तिथला वॉर्डन आम्हाला घ्यायला तयारच होईना. त्याच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये चांगलीच जुंपली. वॉर्डन त्यांना म्हणाला, ‘मी तुम्हाला मूर्ख वाटलो? उद्या हे तिघे पळून गेले, गायब झाले तर मी काय अ, ब, क पळाल्याची नोंद करणार आहे का? सगळ्यांसमोर मी मूर्ख नाही ठरणार?’. तो पठ्ठ्या काही तयार होईना.”
भरपूर कीस काढल्यावर अखेर पोलिसांना यश आलं. तुरुंगाचे सुरक्षा अधिकारी तयार झाले. “जेव्हा आम्हाला कोर्टात हजर केलं तेव्हा मात्र कहर झाला”, जितेंद्र आठवून सांगतात. “खजील झालेल्या ऑर्डर्लीने आमची नावं पुकारली: ‘अ हाजिर हो! ब हाजिर हो! क हाजिर हो!’ मग कुठे कोर्टाने खटल्याचं काम सुरू केलं.”
या सगळ्या मानहानीचा वचपा न्याय यंत्रणेने काढला. त्यांना सहा महिन्याची सक्तमजुरी सुनावण्यात आली आणि त्यांची रवानगी गुन्हेगारांच्या तुरुंगात करण्यात आली. “खरं तर एरवी आम्हाला राजबंदी असतात त्या तुरुंगात पाठवलं गेलं असतं. पण बंड टिपेला पोचलं होतं. आणि पोलिस तर कायमच क्रूर आणि बदला घेतल्यासारखं वागायचे”, चामरू त्यांचं मत मांडतात.
“त्या काळी महानदीवर पूल नव्हता. त्यामुळे ते आम्हाला नावेतून घेऊन जात होते. त्यांना माहित होतं की आम्ही स्वतःहून अटक करवून घेतली आहे आणि पळून जायचा आमचा कसलाही विचार नाही. तरी त्यांनी आमचे हात बांधून एकमेकांनाही बांधून ठेवलं होतं. तेव्हा जर बोट कलंडली असती – आणि हे नित्याचंच होतं – तर आम्ही सगळे बुडून मेलो असतो. सुटण्याची शक्यताच नव्हती.
“पोलिसांनी आमच्या घरच्यांनाही सोडलं नाही. एकदा कधी तरी मी तुरुंगात होतो आणि मला ३० रुपये दंड ठोठावला होता. (त्या काळी ३० रुपये फोर मोठी रक्कम होती. त्यांना दिवसभर काम केल्यावर दोन आण्याच्या किमतीचं धान्य मजुरी म्हणून मिळत असे – साइनाथ). दंड वसूल करण्यासाठी ते माझ्या आईकडे गेले. ‘पैसे भरा नाही तर त्याला अजून मोठी शिक्षा होईल’,” त्यांनी दम भरला.
“माझी आई म्हणाली: ‘तो माझा एकटीचा नाही अख्ख्या गावाचा पुत्र आहे. त्याला माझ्यापेक्षा या गावाची जास्त काळजी आहे’. तरी त्यांनी त्यांचं म्हणणं सुरूच ठेवलं. ती म्हणाली, ‘या गावची सगळी मुलं माझी मुलंच आहेत. मी काय सगळ्यांचा दंड भरणारे की काय?’”
पोलिस वैतागलेच. “ते म्हणाले, ‘आम्हाला काही तरी दे, जे आम्ही वसुली म्हणून दाखवू शकतो, विळा, सुरा... काही चालेल’. तिनं सरळ सांगितलं, ‘आमच्याकडे विळा नाहीये’. नंतर तिने गोमूत्र आणलं आणि ती त्यांना म्हणाली, ‘तुम्ही जिथे उभे आहात ती जागा मला शुद्ध करायची आहे. त्यामुळे तुम्ही आता निघालात तर बरं.’ आणि ते निघून गेले.”
* * *
कोर्टात ही धमाल चालू होती तेव्हा पाणिमाराच्या सत्याग्रहींची दुसरी तुकडी वेगळ्याच कामात गुंतली होती. “संबलपूरचा बाजार ताब्यात घ्यायचा आणि सगळ्या इंग्रजी वस्तू नष्ट करायचं काम आमच्याकडे होतं”, दयानिधी नायक सांगतात. चामरु त्यांचे मामा. “माझी आई बाळंतपणात वारली. मला चामरुंनीच वाढवलं. माझ्यासाठी ते एकदम मोठे नेतेच आहेत.”
इंग्रजांना पहिल्यांदा भिडले तेव्हा दयानिधी फक्त ११ वर्षांचे होते. १९४२ उजाडलं तेव्हा त्याचं वय होतं २१, तोपर्यंत ते एक मुरलेले सेनानी झाले होते. आज एक्क्याऐंशीव्या वर्षीही ते दिवस दयानिधींना स्वच्छ आठवतात.
“इंग्रजांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनमत तयार होत होतं. आम्हाला दाबून टाकण्याचे इंग्रजांचे प्रयत्न आमचा निर्धार जास्तच पक्का करत होते. त्यांचं सशस्त्र सैन्य गावात परेड करायचं. आम्हाला घाबरवण्याचे त्यांचे प्रयत्न फोल ठरत होते.
“शेतमजुरापासून ते शाळेच्या शिक्षकांपर्यंत सगळेच इंग्रजांना विरोध करू लागले होते. शिक्षकांचा पण चळवळीला पाठिंबा होता. त्यांनी राजीनामा वगैरे दिला नव्हता. पण त्यांनी काम थांबवलं होतं. त्यांचं कारण भारी होतं. त्यांचं म्हणणं होतं, ‘आम्ही त्यांना आमचा राजीनामा कसा देणार? कोण इंग्रज? आम्ही त्यांना ओळखत नाही.’ त्यामुळे त्यांनी ‘काम न करणं’ तसंच चालू ठेवलं!
“आमचं गाव त्या काळी सगळ्यांपासून तुटलेलं होतं. अटकसत्र आणि इंग्रजांच्या कारवायांमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते काही काळ आमच्या भागात आलेच नव्हते. त्यामुळे आम्हाला बाहेर काय चालू आहे याचा पत्ता लागण्याची कसलीच सोय नव्हती. १९४२ च्या ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती होती.” मग गावच्या काही जणांना बाहेर काय चालू आहे याची माहिती काढायला पाठवण्यात आलं. आणि मग आमच्या कारवाया सुरू झाल्या. मी दुसऱ्या तुकडीत होतो.
“आमच्या तुकडीतले पाचही जण खूपच लहान होते. आधी आम्ही संबलपूरमध्ये काँग्रेस नेते फकीरा बेहेरांच्या घरी गेलो. त्यांनी आम्हाला फुलं आणि दंडाला बांधायला एक पट्टी दिली. त्यावर लिहिलं होतं – ‘करो या मरो’. आम्ही बाजारावर चालून गेलो. खूपशी शाळेतली मुलं आमच्यासोबत पळत येत होती.
“बाजारात आम्ही चले जावचा नारा दिला. तिथे ३० सशस्त्र पोलिस होते. आम्ही चले जावचा नारा देताच त्यांनी आम्हाला अटक केली.
“इथेही गोंधळ झालाच आणि आमच्यातल्या काहींना त्यांनी सोडून दिलं.”
का बरं?
“११ वर्षांच्या पोरांना अटक करून बंदी बनवणं हा त्यांचा मूर्खपणाच होता. त्यामुळे आमच्यातल्या १२ वर्षांखालच्या पोरांना त्यांनी सोडून दिलं. पण दोन छोटी मुलं – जुगेश्वर प्रधान आणि इंदरजीत प्रधान काही जायला तयारच होईनात. ते हटूनच बसले. त्यांची समजून काढून त्यांना जायला भाग पाडावं लागलं. आमची रवानगी बारगड तुरुंगात करण्यात आली. दिब्यसुंदर साहू, प्रभाकर साहू आणि मी 9 महिने तुरुंगात होतो.”
* * *
८० वर्षाचे मदन भोई, आजही खड्या आवाजात एक फार छान गाणं गातात. “संबलपूरमधल्या काँग्रेसच्या कार्यालयावर आम्ही चालून गेलो. तेव्हा आमच्या गावातल्या तिसऱ्या तुकडीतले आम्ही सारे हे गीत गात होतो. इंग्रजांनी देशविरोधी कारवायांच्या आरोपाखाली काँग्रेसच्या कचेरीला टाळं ठोकलं होतं.”
तिसऱ्या तुकडीकडे सोपवलेली कामगिरी – काँग्रेसचं ऑफिस टाळं तोडून खुलं करणे
“मी छोटा असतानाच माझे आई-वडील वारले. माझ्या काका-काकूनी मला वाढवलं, पण त्यांना माझ्याबद्दल फार काही वाटत नसे. मी काँग्रेसच्या बैठकांना जातो हे कळल्यावर ते जरा चपापले. मी सत्याग्रहींसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मला एका खोलीत डांबून ठेवलं. मी पश्चात्ताप झाल्याचं आणि माझं वागणं सुधारण्याचं नाटक केलं आणि त्यांनी मला सोडलं. मी शेतात कामाला चाललोय असं भासवत कुदळ, टोपलं, वगैरे घेऊन घराबाहेर पडलो ते थेट बारगडच्या सत्याग्रहात सामील झालो. माझ्या गावचे इतर १३ जण तिथे होते. आम्ही संबलपूरला जायला तयार होतो. माझ्याकडे खादीचा सोडा, साधा सदरादेखील नव्हता. गांधींना ९ ऑगस्टला अटक झाली. पण आमच्याकडे ती बातमी बऱ्याच दिवसांनी पोचली. तेव्हाच आमच्या आंदोलकांच्या तीन चार तुकड्या संबलपूरला पाठवायची योजना आखण्यात आली. आलं लक्षात?”
“पहिल्या तुकडीला २२ ऑगस्ट रोजी अटक झाली, आम्हाला २३ तारखेला पकडण्यात आलं. चामरू आणि त्याच्या साथीदारांनी कोर्टात पोलिसांचा असा फज्जा उडवला होता की त्या भीतीने आम्हाला कोर्टातही नेलं नाही. आम्ही काँग्रेसच्या कचेरीपर्यंतही पोचू शकलो नाही. आम्ही थेट तुरुंगातच गेलो.”
पाणिमारा खरंच खोडसाळ होतं. “आम्हाला सगळे बदमाश गाव म्हणूनच ओळखत असत.” मदन भोईंच्या आवाजातला अभिमान आजही लपत नाही.
छायाचित्रं – पी. साईनाथ
पूर्वप्रसिद्धी – द हिंदू, सन्डे मॅगझिन, २० ऑक्टोबर २००२
या लेखमालेतील इतर लेखः
इंग्रज सरकारला अंगावर घेणारी ‘सलिहान’
शेरपूरः कहाणी त्यागाची आणि विस्मृतीत गेलेल्या गावाची
गोदावरीः पोलिस अजूनही हल्ला होण्याची वाट पाहताहेत
सोनाखानः वीर नारायण सिंग दोनदा मेला