गोदातीरावरच्या कदाचित सर्वात पवित्र स्थळी, रामकुंडाच्या तीरावर तो हात जोडून, स्तब्ध उभा होता. त्यानंतर त्याने पाण्यात डुबकी घेतली आणि स्नान केलं – पवित्र पाण्यात, टँकरच्या.

तर असं आहे महाराष्ट्रावरचं पाण्याचं संकट – अथांग अशा गोदावरीच्या अगदी उगमापासचं.

गेल्या १३९ वर्षांत पहिल्यांदाच पवित्र आणि ऐतिहासिक असं हे रामकुंड कोरडं पडलंय. गेल्या दोन महिन्यांपासून रोज ६० ते ९० टँकरच्या पाण्यावर हे कुंड भरलं जातंय. थोडक्यात काय, महाराष्ट्र राज्यात टँकरच्या पाण्यावर नद्या वाहतायत. साक्षात गोदावरीदेखील संकटात आहे. आतापर्यंत असं काही झाल्याचं कुणाच्याच स्मृतीत नाही पण काही काही ठिकाणी नदी चक्क कोरडी पडलीये. मे महिना उजाडेपर्यंत नाशिक जिल्ह्यात, त्र्यंबकच्या वरच्या बाजूस असणाऱ्या ब्रह्मगिरीतला गोदेचा उगम म्हणजे थेंब-थेंब पडणारी बारीकशी धार होती. नुकता सुरू झालेला पाऊसच काही दिलासा देईल अशी लोकांना आशा आहे.

PHOTO • P. Sainath

नदीत पाणी ओतताना एक टँकर. उजवीकडेः नदीच्या नाही तर टँकरच्या पाण्यात स्नान करणारा एक भाविक

“या नदीच्या थेट उगमाशीच असणाऱ्या या गावात पाणी टंचाईच्या काळात तीन दिवसांतून एकदा पाणी येतं होतं म्हणजे बघा,” कमलाकर अकोलकर हसत हसत सांगतात. ते वर्तमानपत्रांसाठी छायाचित्रकार म्हणून काम करतात आणि त्र्यंबकमध्ये पुरोहित आहेत जिथली सगळी अर्थव्यवस्था या तीर्थक्षेत्रावर अवलंबून आहे. “वीस वर्षं इथे जंगलतोड चालू आहे,” अकोलकर सांगतात. “आमचं हिरवं आच्छादन पूर्ण गेलंय. असंख्य रस्ते, हॉटेल, धर्मशाळा, विकासकामं आणि प्रचंड बांधकाम. या गावाची स्वतःची लोकसंख्या आहे दहा हजार. पण इथे किमान ५०,००० लोकांचा राबता असतो, भक्त, विक्रेते आणि पर्यटन आधारित अर्थव्यवस्थेतले असंख्य इतर. या सगळ्यांमुळेच इथल्या जलसाठ्यावर ताण येतोय. दोन दशकांपूर्वी इथे चार महिने पावसाळा होता पण आता कसा बसा दीड महिना पाऊस पडतोय.”

काही किलोमीटर पुढे रामकुंडाचे मुख्य पुरोहित सतीश शुक्ल सरळ म्हणतात की “महानगरपालिकेने आमची वाट लावलीये.” काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असणारे शुक्ल गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष आहेत. या नदीशी ऋणानुबंध असलेल्या पुरोहितांची ही ७० वर्षं जुनी संघटना आहे. “महानगरपालिकेने शतकानुशतकं अस्तित्वात असलेला एक चिऱ्यांनी घडवलेला घाट पाडला आणि तिथे काँक्रीटचा घाट बांधला. त्यांनी असं करायला नको होतं. शेकडो वर्षांत जे कधी झालं नाही ते गेल्या दोन वर्षांत झालं,” शुक्ल सांगतात. “प्रचंड मोठ्या प्रमाणावर जे काँक्रिटीकरण चालू आहे त्यामुळे नदी मृत व्हायला लागलीये. जुने झरे आटलेत, उगमस्थानातले पाण्याचे नैसर्गिक स्रोत नाहिसे झालेत. हे करताना त्यांनी एकदाही आमचा, पुरोहितांचा सल्ला घेतला नाही. त्यांच्या मनाला येईल तसं त्यांनी बदल करायला सुरुवात केली. नदीचा नैसर्गिक प्रवाहच बदलून गेलाय. पावसासाठी आम्हा पुरोहितांनी केलेलं आवाहन वरुणराजाने कधीच व्यर्थ जाऊ दिलेलं नाही. पण आता, सगळंच थांबलंय.”

PHOTO • P. Sainath

रामकुंडाच्या तीरावर भाविकांची गर्दी. उजवीकडेः सतीश शुक्ल, गोदावरीस्थित पुरोहित संघटनेचे अध्यक्ष

वरुणराजाने या पुरोहितांची साद ऐकली नसेल पण शासनाने मात्र नाशिकमध्ये पार पडलेल्या कुंभमेळ्यासाठी पर्जन्यदेवाचीच भूमिका पार पाडली आहे. सिंचन विभागाचे अधिकारी सांगतात की गोदावरी आणि गौतमी व काश्यपी या तिच्या दोन उपनद्यांवरच्या प्रमुख गंगापूर धरणातून कुंभ मेळ्यासाठी १.३ अब्ज घन फूट पाणी सोडण्यात आलं. २०१५ च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये शाही स्नानासाठी तीन दिवस पाणी सोडण्यात आलं, पण हे इतकंच नाही. जानेवारी महिन्यात कुंभमेळ्याच्या समाप्तीच्या वेळीही प्रचंड पाणी लागलं. शाही स्नानामुळे नदीमध्ये जी घाण जमा झाली होती ती वाहून नेण्यासाठी याहून अधिक पाणी योवळी सोडावं लागलं होतं.

थोडक्यात काय तर कुंभमेळा आणि त्याच्याशी संबंधित अनेक कारणांसाठी काही महिन्यांच्या काळात १.३ अब्ज घन फूट पाणी सोडण्यात आलं. म्हणजे संपूर्ण नाशिक शहरासाठी २०१५-१६ मध्ये सोडण्यात आलेल्या ३.७ अब्ज घन फूट पाण्याच्या जवळ जवळ निम्मं पाणी. या पाण्याने मेळ्याला आलेल्या सगळ्या भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण झाल्या असतील कदाचित, पण नदीच्या खालच्या टप्प्यावरच्या शेतकऱ्यांच्या याचना मात्र कोणाच्याच कानावर पडल्या नाहीत. गंगापूर धरणातून वेळेत विसर्ग होणं त्यांच्यासाठी फार मोलाचं आहे.

PHOTO • P. Sainath

कुंभ मेळ्यासाठी पाणी वळवण्यात आल्यामुळे आपल्या पिकाचं कसं नुकसान झालं ते प्रशांत निमसे सांगतायत

“आम्हाला खरं तर तीन आवर्तनांची गरज होती, पण एकच आवर्तन सोडण्यात आलं. दीड म्हणा हवं तर, पण पहिलं पाणी खूपच लवकर आणि आम्हाला कसलीच कल्पना न देता सोडलं गेलं,” प्रशांत निमसे सांगतात. ते नांदुरगावचे शेतकरी आहेत. गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यातून त्यांच्या गावाला पाणी सोडलं जातं. निमसेंची द्राक्ष, अंजीर आणि इतर काही फळांची बाग आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या जागेत एक मंगल कार्यालय बांधलंय आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचं जरा बरं चाललंय. हे गाव आता नाशिक शहराच्या हद्दीत सामावलं गेलं असल्यामुळे त्यांना भरपूर गिऱ्हाईक मिळतं. “माझं निभावलं, पण जे पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत, त्यांची पार वाट लागली.”

“द्राक्ष पिकाचं नुकसान झालं की सगळ्याच दृष्टीने फटका बसतो,” वासुदेव खाटे या शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं होतं. “दुष्काळात पाणी मिळत नाही त्याचा पिकाला फटका बसतो. अगदी द्राक्षांचं पीक हातात पडलं तरी त्याच्या दर्जात फरक पडतो. एक लक्षात घ्या, एकरामागे दर वर्षी किमान १०० दिवसांची मजुरी निघते. ४०,००० एकरावरचं द्राक्ष पीक जर धोक्यात असेल तर मजुरांचे पण हाल होणार, आणि एकूण ३० लाख दिवसांची कामं निघणार नाहीत. इथे बाहेरगावहून मजूर येतात, मराठवाड्यातून, अगदी लातूर, बीड, औरंगाबाद आणि उस्मानाबादहून.” म्हणजे इथे झालेल्या नुकसानाची झळ मराठवाड्यातल्या हजारो कुटुंबांना पोचते.

आता पाऊस राज्यभर बरसू लागलाय. पण अनेक शेतकरी आणि मजुरांना माहित आहे की केवळ पाऊस पडल्याने ही समस्या सुटणार नाहीये. “काही तरी दिलासा मिळेल,” छायाचित्रकार-पुरोहित अकोलकर म्हणतात, “पण दूरगामी असं जे संकट वाढत चाललंय ते काही यामुळे सरणार नाहीये.”

पी. बी. मिसाळ, अधीक्षक अभियंता, सिंचन विभाग, नाशिक यांचं मात्र या समस्येबाबत वेगळंच मत आहे. “महाराष्ट्रात खरं तर कोणत्याच नद्या बारमाही नाहीत,” मिसाळ सांगतात. “गेल्या २० वर्षांत भूजलाच्या साठ्यात प्रचंड घट झाली आहे. शेतीसाठी पाण्याचा प्रचंड उपसा होतोय. नाशिक शहराची लोकसंख्या २० लाखावर पोचलीये, वर येऊन जाऊन असणारे ३ लाख लोक पकडा. जमिनीच्या वापराचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर बदललंय. शहराच्या भोवती जी हिरवीगार माळरानं होती तिथे आता सगळीकडे बांधकाम झालीयेत,” पाऊस लहरी झालाय हे ते मान्य करतात मात्र कोणतीच आकडेवारी पाऊसमान “सर्वत्र समान कमी झालंय” असं दाखवत नसल्याचं ते सांगतात. प्रा. माधव गाडगीळ यांच्यासारख्या पर्यावरण तज्ज्ञांच्या मते मात्र महाराष्ट्रात बारमाही नद्या होत्या. मात्र या नद्यांचं रुपांतर आता “मोठ्या प्रमाणावर हंगामी नद्यांमध्ये झालं आहे.”

या सगळ्यातून आपण शेवटी महाराष्ट्राच्या महा जल संकटामध्ये मानवाचा काय हात आहे याकडेच येऊन पोचतो. त्र्यंबकेश्वरातली पाण्याची समस्या आणि साताऱ्यातील जुन्या महाबळेश्वरमधल्या कृष्णेच्या उगमाची स्थिती सारखीच असल्याचं दिसतं. (तिथेही मे महिन्यात मी माझ्या सहकाऱ्यांसोबत नदीच्या उगमापासून तिच्या पात्राचा वेध घेतला होता, पहाः उगम नद्यांचे, उद्योगखोरी राज्यकर्त्यांची)

“एक लक्षात घ्या, नाशिक एक मोठं औद्योगिक क्षेत्र बनलंय. आणि इथल्या पाणी वापराच्या सगळ्या पद्धती बदलून गेल्या आहेत,” अकोलकर म्हणतात. “प्रत्येक भागात, प्रत्येक वस्तीत पाण्याचा प्रचंड मोठा असा अनियंत्रित बाजार तयार झाला आहे. अगदी पुरेपूर पाऊस झाला तरी काहीही फरक पडत नाही. पर्यटनाचा परिणाम हा की शहराचा कानाकोपरा काँक्रीटचा झालाय. त्यामुळे पाण्याला वाहण्यासाठी सोडा नुसता श्वास घेण्यासाठीही जागा उरलेली नाही.”

PHOTO • P. Sainath

त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापाशी असलेल्या गंगासागर तलावाची पातळी एरवीपेक्षा लक्षणीयरित्या कमी झाली आहे. खरं तर गोदावरी नदीवरचा हा अगदी पहिला साठवण तलाव आहे.

ब्रह्मगिरीहून त्र्यंबकेश्वरातील गंगासागर तलावात वाहत जमा होणारे झरे म्हणजे कोरड्या ठक्क काळ्या पाषाणावरच्या वाहत्या झऱ्यांच्या खुणा दाखवणाऱ्या पिकट पांढऱ्या रेषा उरल्या आहेत. जे काही झरे आम्ही पाहू शकत होतो ते सगळे शुष्क झाले होते. कदाचित आता पाऊस पडल्यावर हे झरे परत एकदा जिवंत होऊन वाहू लागतील.

बेसुमार जंगलतोड, नद्यांवरची उदंड धरणं, उद्योगांकडे आणि श्रीमंत राहणीमानाला साजेशा भव्य गृहप्रकल्पांकडे पाणी वळवण्यात येत असल्याचं चित्र राज्यभर पहायला मिळतंय. तसंच, नद्यांच्या उगमापाशी चालू असलेलं अनिर्बंध काँक्रिटीकरण, भूजलाचा अफाट उपसा आणि गरीब व श्रीमंतांमधली पाण्याच्या वाटपातली प्रचंड विषमताही आहेच. महाराष्ट्राच्या या भयंकर जल संकटाच्या मुळाशी हे सारं आहे. आणि केवळ पाऊस बरसला म्हणून हे सगळं पुसून जाणार नाहीये. पावसाच्या आगमनाने प्रसारमाध्यमांवरचा दुष्काळ संपला असला तरीही.


अनुवादः मेधा काळे

ਪੀ ਸਾਈਨਾਥ People’s Archive of Rural India ਦੇ ਮੋਢੀ-ਸੰਪਾਦਕ ਹਨ। ਉਹ ਕਈ ਦਹਾਕਿਆਂ ਤੋਂ ਦਿਹਾਤੀ ਭਾਰਤ ਨੂੰ ਪਾਠਕਾਂ ਦੇ ਰੂ-ਬ-ਰੂ ਕਰਵਾ ਰਹੇ ਹਨ। Everybody Loves a Good Drought ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਪ੍ਰਸਿੱਧ ਕਿਤਾਬ ਹੈ। ਅਮਰਤਿਆ ਸੇਨ ਨੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਕਾਲ (famine) ਅਤੇ ਭੁੱਖਮਰੀ (hunger) ਬਾਰੇ ਸੰਸਾਰ ਦੇ ਮਹਾਂ ਮਾਹਿਰਾਂ ਵਿਚ ਸ਼ੁਮਾਰ ਕੀਤਾ ਹੈ।

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

ਮੇਧਾ ਕਾਲੇ ਪੂਨਾ ਅਧਾਰਤ ਹਨ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਨੇ ਔਰਤਾਂ ਅਤੇ ਸਿਹਤ ਸਬੰਧੀ ਖੇਤਰਾਂ ਵਿੱਚ ਕੰਮ ਕੀਤਾ ਹੈ। ਉਹ ਪਾਰੀ (PARI) ਲਈ ਇੱਕ ਤਰਜ਼ਮਾਕਾਰ ਵੀ ਹਨ।

Other stories by Medha Kale