पंजाबातलं हे प्रचंड मोठं जाळं आहे – १५२ मुख्य मार्केड यार्ड-बाजारसमित्या, २७९ उप-समित्या आणि १,३८९ पीक खरेदी केंद्रं (२०१९-२०). जसविंदर सिंग यांच्यासाठी जणू हे सुरक्षा कवच. शेतकऱ्याला या सगळ्या मंडी किंवा बाजारसमित्यांच्या यंत्रणेत सुरक्षित वाटतं, संगरूर जिल्ह्यातल्या लोंगोवालचे ४२ वर्षीय जसविंदर सांगतात. तिथे ते १७ एकरावर शेती करतात. “मी माझा माल बिनघोर मंडीत नेतो कारण त्याचा पैसा मला तिथे लागलीच मिळणार आहे याची मला खात्री असते. मला तिथली सगळी प्रक्रिया माहिती आहे आणि माझ्या नावचे पैसे मला मिळणार म्हणजे मिळणारच.”
मुख्य बाजारसमित्या म्हणजे प्रचंड मोठ्या बाजारपेठा आहेत. (इथे फोटोंमध्ये सुनामची मंडी दिसते, तशा.) या बाजारांमध्ये विविध प्रकारच्या सेवा-सुविधा असतात. शेतकऱ्यांना येऊन आपल्या मालाची रास करण्यासाठी विशिष्ट जागा दिलेली आहे. शक्यतो ही जागा आडतीसमोर, म्हणजेच अडत्यांच्या दुकानांसमोर असते. एखाद्या वर्षी विक्रमी पीक आलं आणि मुख्य बाजारातली जागा कमी पडायला लागली तर जवळपासच अतिरिक्त जागेची सोय केलेली असते तो भाग म्हणजे उप-समित्या. खरेदी केंद्रं म्हणजे छोटे बाजार (छायाचित्रांमधल्या शेराँ मंडीसारखे). हे सगळं मिळून तयार होतं पंजाब राज्यातलं बाजार आणि बाजारसमित्यांचं अवाढव्य असं जाळं.
“माझा माल विकला की मला अडतिया 'जे' फॉर्म देतो. पैसे जमा होईपर्यंत माझ्यासाठी तो फॉर्म मोठा आधार असतो,” जसविंदर सांगतात. “पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सगळी सरकारी यंत्रणा असल्यामुळे जर काही काळंबेरं झालं किंवा पैशाचा काही घोटाळा झाला तर मला कायद्याचं संरक्षण आहे. आणि ही माझ्यासाठी फार मोठी सिक्युरिटी आहे,” पंजाब कृषी उत्पन्न बाजार कायदा, १९६१ चा हवाला देत ते सांगतात.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या या जाळ्याचा मुख्य फायदा म्हणजे खाजगी व्यापारी किंवा राष्ट्रीय अन्न महामंडळ किंवा मार्कफेड (पंजाब राज्य सहकारी पुरवठा व विपणन महासंघ मर्यादित) कडून होणारी खरेदीची प्रक्रिया यामध्ये नियंत्रित होते. या दोन्ही सरकारी यंत्रणा शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीला गहू आणि तांदूळ खरेदी करतात. ही धान्यं पंजाबमधल्या कोणत्याही बाजारसमितीत आली की अन्न महामंडळ किंवा मार्कफेडचे अधिकारी त्याची गुणवत्ता तपासतात, उदाहरणार्थ आर्द्रता किती आहे ते मोजतात. त्यानंतर धान्याचा सौदा करून त्याची विक्री होते. ही सगळी प्रक्रिया आडत्यांमार्फत होते आणि या सगळ्या साखळीतले ते महत्त्वाची कडी आहेत.
बाजारपेठ सहज उपलब्ध असणं आणि तिची विश्वासार्हता हे या व्यवस्थेचे मुख्य फायदे आहेत, पतियाळा जिल्ह्याच्या पातरन तालुक्याच्या दुगर कलान गावातली ३२ वर्षीय अमनदीर कौर सांगते. “माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझा माल थेट गावातल्या मंडीत घेऊन जाऊ शकते. ते सोयीचं पण आहे आणि माझ्या मालाला काय भाव मिळणार तेही मला माहित असतं. उसाबाबत काय होतंय ते आपण पाहिलंच आहे. उसासाठी एक अशी काही यंत्रणा नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस जिथे भाव मिळतोय ते पाहून कधी या तर कधी त्या शहरात घेऊन जावा लागतो. आता चांगल्या भावाच्या शोधात आम्ही काही राज्यभर हिंडत बसणार की काय?”




















