तारावंती कौर यांना घोर लागून राहिलाय. “आता थोडंफार तरी काम मिळतंय, हे कायदे लागू झाले की तेही मिळेनासं होईल,” त्या म्हणतात.
म्हणून त्या पंजाबच्या किल्लियनवाली गावाहून पश्चिम दिल्लीच्या टिक्री आंदोलन स्थळी येईन ठेपल्या आहेत. तारावंती आणि त्यांच्यासोबत सुमारे ३०० इतर महिला ७ जानेवारी रोजी इथे आल्या. बठिंडा, फरीदकोट, जलंधर, मोगा, मुक्तसर, पतियाळा आणि संगरूर या राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून एकूण १५०० जणांचा जत्था इथे आला. हे सगळे पंजाब खेत मजदूर युनियनचे सदस्य आहेत. ही संघटना दलितांच्या उपजीविका, त्यांचे जमीन अधिकार आणि जातीभेदाच्या विषयावर काम करते.
भारतातल्या लाखो महिलांप्रमाणे – देशभरातल्या एकूण १४.४३ कोटी शेतमजुरांपैकी ४२ टक्के स्त्रिया आहेत – त्याही आपल्या चरितार्थासाठी शेतीकामावर अवलंबून आहेत.
तारावंती ७० वर्षांच्या आहेत. मुक्तसर जिल्ह्यातल्या मलौत तहसिलातल्या आपल्या गावातल्या गहू, भात आणि कपाशीच्या रानात दिवसभर राबल्यानंतर त्यांना २५०-३०० रुपये मजुरी मिळते. “पण आधी मिळायची तशी जास्त काही कामच मिळत नाहीयेत. हरित क्रांती आली ना तेव्हापासून मजुरांचे हे हाल सुरूच आहेत,” त्या म्हणतात. १९६० च्या दशकात जेव्हा पंजाबमध्ये शेतीक्षेत्रात मोठे बदल झाले आणि त्यातलाच एक म्हणजे शेतीचं व्यापक स्तरावर यांत्रिकीकरण.






