देबोहाला जन्माला आले तेव्हा आकाशाच काळे ढग दाटून आले होते. म्हणून त्यांच्या आई-वडलांनी छोट्या बाळाचं नाव ठेवलं 'देबोहाला'. चकमा भाषेत याचा अर्थ होतो भरून आलेलं आभाळ. या काळोखाने देबोहालांची साथ आयुष्यभर सोडली नाही. तीन वर्षांचे असताना त्यांना कांजिण्या झाल्या आणि त्यानंतर खूप तीव्र जुलाब झाले. त्यातून रातांधळेपणा आला आणि हळूहळू त्यांची दृष्टी लोप पावत गेली.
पण देबोहाला या सगळ्यामुळे विचलित झाले नाहीत. वयाच्या १६ व्या वर्षी ते बांबूच्या सुंदर टोपल्या करायला शिकले. आणि आज वयाच्या ६५ व्या वर्षी ते म्हणतात, “बांबूच्या पट्ट्या विणून त्याच्यापासून वेगवेगळे आकार, नक्षी कशी करायची ते माझा मी शिकलो. तरुण होतो तेव्हा तर बांबूचं अख्खं घर बांधण्याची शक्ती माझ्यात होती.”
देबोहाला मिझोरामच्या मामित जिल्ह्यातल्या झॉलनुम तालुक्यातल्या राजीवनगरमध्ये राहतात. हे ३,५३० लोकसंख्येचं गाव आहे. ते चकमा या अनुसूचित जमातीचे आहेत. अनेक चकमा बौद्ध धर्माचं अनुपालन करतात आणि बहुतेक जण शेती करून गुजराण करतात. या जिल्ह्यातल्या डोंगरउतारांवरची माती सुपीक असून अनेक जण झूम किंवा फिरती शेती करतात. मका, तांदूळ, तीळ, सुपारी अननस आणि इतर पिकं इथे घेतली जातात. या भागात बांबूची घनदाट जंगलं आहेत आणि या भागातल्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कुंच्यांसाठी लागणाऱ्या शिंदीची बनं आहेत.
गेली पन्नास वर्षं देबोहाला बांबूच्या पट्ट्यांच्या टोपल्या विणून त्यांचा चरितार्थ चालवला आहे. ते अतिशय निष्णात कारागीर आहेत. आता ते इतरांना बांबूच्या पट्ट्यांचं विणकाम शिकवतात. एखादी नक्षी स्पर्शाने आपल्याला समजू शकते, ते म्हणतात. “मी वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूच्या टोपल्या विणतो. टोपल्या, मासे धरण्यासाठीची मलई, कोंबड्यांची खुराडी आणि बांबूचे मोडे. मी खराटे देखील बांधतो. आणि बांबूचं विणकाम करण्याच्या जवळपास सगळ्या पद्धती मला माहित आहेत. तोलोई टोपली, हुलो, हालाँग, दुलो आणि हाझा... देबोहालांना हे सगळं करता येतं.”
“मला चार मुलं आणि एक मुलगी आहे. चारही मुलांची लग्नं १८ वर्षांचे व्हायच्या आधीच झाली,” देबोहाला सांगतात. घरची कमाई बेताचीच आहे. गावातल्या बाजारात टोपल्या विकून देबोहाला महिन्याला ४,००० रुपये कमवतात. त्यांच्या पत्नी, ५९ वर्षांच्या चंद्रमाला घरची शेती करतात आणि २४ वर्षांची मुलगी जयललिता रोजंदारीवर शेतात कामाला जाते.
अगदी लहानपणी त्यांची दृष्टी गेली तरीसुद्धा देबोहाला एका जागी बसून राहिले नाहीत. ते कित्येकदा गावातल्या बाजारात किंवा इतर कुठे जायचं असलं तर चालत जातात. सोबत कुणाला तरी घेतात आणि हातात काठी असतेच. आणि कधी गरज पडलीच आणि घरचं कुणी सोबत असेल तर लांबून ते तांदळाची अवजड पोती किंवा सरपणसुद्धा घेऊन येतात. “मी तरुण होतो ना तेव्हा मला ऊन आलं की कळायचं, खास करून दुपारच्या वेळी,” ते सांगतात. “पण आता वय होत चाललंय तसं ते समजेना गेलंय.”
या चित्रफितीमध्ये देबोहाला बांबूच्या बारीक पट्ट्या काढतायत आणि त्यापासून कोंबड्यांचं खुराडं तयार करतायत. हाताने काम चालू असतानाच ते आपल्या आयुष्याविषयी काय काय सांगतात. बांबूकामात इतके तरबेज असतानाही ते मला नंतर सांगतात की त्यांना काही त्यांची कला फार वेगळी असल्याचं जाणवलं नाहीये. आणि तसं कौतुकही दुसऱ्या कुणी केलेलं नाही.
अनुवादः मेधा काळे