पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, मुंबईच्या अरबी समुद्रात रू. ३,६०० करोडच्या शिवस्मारकाचे भूमिपूजन करून २४ तासही उलटले नाहीत; ख्रिसमसच्या सकाळी, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात, मुंबईहून २०० किलोमीटर अंतरावरील, धोंडेगावात, यशवंत आणि हिराबाई बेंडकुळे आपल्या शेतात पिकलेल्या टोमॅटोंच्या वेली कापून टोमॅटो उपटून काढत होते. “गेल्या एक महिन्यापासून टोमॅटोच्या किंमती कोसळत आहेत, तयार पीकं आता शेतात नुसती उभी ठेवणंही परवडत नाही,” यशवंतराव पुटपुटले. रू. २०,००० गुंतवून आणि दिवसरात्र कष्ट करून उभ्या केलेल्या टोमॅटोंच्या वेलींच्या वेली नष्ट करण्याचं कारण ते आदिवासी जोडपं आम्हांला सांगत होते. आता ते जमिनीत गहू पेरणार आहेत. “उन्हाळ्यात निदान जेवायला अन्न तर असेल,” हिराबाई सांगतात.

मोदींनी ८ नोव्हेंबरला केलेल्या निश्चलनीकरणाच्या घोषणेनंतर चलन तुटवडा निर्माण झाल्याने, टोमॅटोच्या आधीच कमी झालेल्या किंमती रसातळाला पोहचल्या. नाशिक शहरापासून २० किलोमीटर अंतरावरील, गिरणारे मंडीत आता किंमती, किलोमागे ५० पैसे ते रू. २ असे हेलकावे खात आहेत. ही किंमत आता एवढी कमी झालीय की, मालाची कापणी आणि बाजारापर्यंतचा वाहतूकीचा खर्चही त्यातून सुटत नाही. किरकोळ भाव किलोला रू. ६-१० असा मिळतोय. भारताचा प्रमुख बागायती जिल्हा असलेल्या नाशकात, सर्व ठिकाणी, शेतकरी चिडून माल मुळासकट उपटत आहेत, फेकून देतायत, आणि जनावरांना भाजीपाला चरावयास देतायत, ज्यासाठी त्यांनी आताच्या पावसाळ्यात, एकरामागे, रू. ३०,००० ते १.५ लाख गुंतविले होते.


व्हिडिओ पहा: धोंडेगावात आदिवासी शेतकरी हिराबाई आणि यशवंत बेंडकुळे त्यांच्या टोमॅटोच्या शेतात टोमॅटो उपटून काढत आहेत


टोमॅटोला मागच्या वर्षी एका क्रेटला (२० किलोचं खोकं/करंडा) रू. ३०० ते रू. ७५० असा चांगला भाव मिळाला होता. म्हणूनच शेतकर्यांनी मोठ्या आशेने २०१६ च्या पावसाळ्यात टोमॅटो लावला. ऑक्टोबरपर्यंत शेतकर्यांना कळालं होतं की, यंदा हवामान चांगलं, कोणतीही मोठी किड नाही, आणि वाढते टोमॅटो उत्पादक यामुळे भरपूर पिक येणार. म्हणजे, दर जरी मागच्या वर्षीसारखा फार चांगला नाही, तरी बरा मिळेल. अनेक शेतकरी सांगतात, दसर्यापर्यंत भाव चांगला होता आणि दिवाळी पर्यंत क्रेटमागे रू. १३० मिळत होते.

परंतु, जशा ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बाद झाल्या, कापणीच्या आगमनाची, गंभीर चलन तुटवड्याशी गाठ पडून, मालाची किंमत आणि खरेदी घसरली. "११ नोव्हंबरपासून जे दर घसरलेत ते नंतर सावरलेच नाहीत," गिरणारे-स्थित शेतकरी, नितीन गायकर सांगतात. तेव्हापासून एका क्रेटला रू. १०-४० असा भाव घसरलेला आहे. गायकर आवर्जून सांगतात की, शेतकरी, व्यापारी, मालवाहक, कृषी औषध व खतांचे दुकानदार आणि मजूर यांच्यातील व्यवहारांसह, संपूर्ण ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था रोख पैशांवरच चालते.


02-IMG_0362-AA&CC-Notebandi takes the sauce out of Nashik's tomatoes.jpg

५०० आणि १,००० रूपयांच्या नोटा बाद झाल्या आणि कापणीच्या विपुल आगमनाची, गंभीर चलन तुटवड्याशी गाठ पडून, मालाची किंमत आणि खरेदी घसरली


जिल्हा प्रशासनाला फार काळजी असल्याचं दिसत नाही. "हा एक मुक्त बाजार आहे, आणि आम्ही काही तो नेहमी नियंत्रित करू शकत नाही," नाशिक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन सांगतात. "किंमती ह्या निव्वळ बाजारातील हालचालींवर अवलंबून असतात."

ग्रामीण घरांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण आहे. "मी माझ्या दोन एकर टोमॅटोच्या शेतात रू. २ लाख खर्च केले आहेत, पण रू. ३०,००० सुद्धा अजून सुटले नाहीत," गणेश बोबडे सांगतात. "फार कमी खरेदीदार आहेत, म्हणून मी माझ्या गायी टोमॅटोंच्या शेतात चरायला सोडून दिल्या," सोमनाथ थेटे सांगतात, आम्ही त्यांच्या भल्यामोठ्या शेतात फिरत होतो आणि सोबत वेलींवर चरणार्या गायीही होत्या.


03-Somnath-Thete-Cow-AA&CC-Notebandi takes the sauce out of Nashik's tomatoes.jpg

फार कमी खरेदीदार असल्याने, सोमनाथ थेटेंनी त्यांच्या गायी टोमॅटोच्या पिकावर चरायला सोडल्या


योगेश गायकरांची नाराजी तीव्रपणे दिसत होती, त्यांनी त्यांच्या १०-एकर शेतात टोमॅटो लावले होते, "मी आतापर्यंत २,००० क्रेट विकलेत, पण जवळ जवळ सगळेच घाट्यात. हे सगळं ना त्या नोटांच्या लफड्यामुळं (नोटबंदीचा गोंधळ) झालंय. आता कुठे आम्हांला जरा बरे पैसे मिळाले असते, तर लगेच मोदींनी झटका दिला."

या खरीप हंगामात, संपूर्ण देशात विकला गेलेला, साधारणपणे, प्रत्येक चौथा टोमॅटो नाशिकमधून आलेला होता. भारत सरकारच्या डेटाप्रमाणे, वजनानुसार, सप्टेंबर १, २०१६ आणि जानेवारी २, २०१७ या दरम्यान विकल्या गेलेल्या टोमॅटोंपैकी २४ टक्के (म्हणजे, १४.३ लाख टनांपैकी ३.४ लाख टन) नाशिक जिल्ह्यातून आलेले होते.

वर्षानुवर्षांचे शेतमालाच्या दरातील भयावह चढ-उतार आणि असुरक्षित उत्पन्न काय, आणि चिंतातुर विक्री किंवा माल फेकून देण्याची आलेली वेळ, ह्या गोष्टी शेतकर्यांसाठी काही नवीन नाहीत. पण प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयार पिके अशा प्रकारे नष्ट करण्याची ही परिस्थिती दिसतेय, नाशिक-स्थित, मराठी कृषी दैनिक अॅग्रोवनचे वार्ताहर ज्ञानेश्वर उगळे सांगतात. "प्रत्येक क्रेटमागे शेतकर्याचा उत्पादन खर्च रू. ९० आहे. जर त्यांना रू. १५-४० मिळायला लागले, तर विचार करा शेतकर्याचं किती नुकसान होत असेल."

नाशिक जिल्ह्याच्या पाच मंडींमध्ये (कृषी उत्पन्न बाजार) आलेल्या एकूण मालावर आधारित, उगळेंच्या गणितानुसार, शेतकर्यांचे आतापर्यंत रू. १०० करोडचे नुकसान झालेले आहे. आणि सरकारी आकडेवारीचं काय? कृषी कार्यालयाच्या नाशिक जिल्हा अधीक्षक येथील कृषी पर्यवेक्षक, भास्कर रहाणे, यांच्या मते, जिल्ह्यातील टोमॅटोची लागवड आणि उत्पादन याचे अनुमान २०११-१२ मध्येच संपले. "शेतकर्यांच्या नुकसानीचं मोजमाप करणारी कोणतीही यंत्रणा नाही. शेतकर्यांनी त्यांच्या इतर खर्चाप्रमाणे, स्वत:च्या उत्पन्नाचाही स्वत:च हिशोब ठेवला पाहिजे," त्यांनी सांगितले.


व्हिडिओ पहा : 'टोमॅटोच्या सध्याच्या दरातून माझा उत्पादनाच्या कापणीचा खर्चही सुटू शकणार नाही,' आदिवासी शेतकरी दत्तु बेंडकुळे म्हणतात


यंदा गिरणारे मंडीचे, एक अग्रगण्य टोमॅटो केंद्र, धुळीचे मैदान एकदम सुस्त दिसत आहे. एरव्ही, मंडीपर्यंत जाणारा रस्ता, टोमॅटोंनी भरलेल्या ट्रॅक्टरांनी बंद झालेला असतो. तो आता दुदैवाने स्वच्छ आहे. दरवर्षी, महाराष्ट्रात येथे, ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, देशाच्या इतर राज्यांमधून व्यापारी येऊन तंबू ठोकून बसतात, टोमॅटोंची खरेदी करून संपूर्ण देशात, माल वाहून नेतात. ते सर्व व्यापारी यावर्षी लवकर निघून गेले.

त्यांच्यापैकीच एक आहेत, राहत जान, ते आता त्यांच्या घरी, अमरोहा, उत्तर प्रदेशात आहे. "नाशिकच्या आयसीआयसीआय बॅन्केत माझं खातं आहे," त्यांनी फोनवर बोलताना सांगितलं. "पण आठ दिवसांचे त्यांनी मला फक्त रू. ५०,००० दिले. मला रोजच्या व्यापारी व्यवहारांसाठी रू. १-३ लाखांची आवश्यकता असते," ते पुढे म्हणाले. "जोपर्यंत शेतकरी आणि पेट्रोल पंपांवर जुन्या नोटा स्वीकारल्या जात होत्या, तोपर्यंत सांभाळून घेतलं. पण नोटांच्या कमतरतेसाठी, मी अजून १५ दिवसांचे टोमॅटो खरेदी केले असते."

देशातले व्यापारी निघून गेले, आता मंडीत फक्त स्थानिक खरेदीदार, जसे मुंबई जवळच्या वाशी आणि विरारचे व्यापारी, येताना दिसतात. ते देखील कमी किंमती आणि चलन तुटवड्यामुळे धडपडत आहेत. आम्ही पिंपळगावचे व्यापारी, कैलाश साळवे यांना रू. ४,००० मध्ये १०० क्रेट खरेदी करताना पाहिले. "माझ्याकडे अजून पैसे नाहीत," ते म्हणतात, "त्यामुळे मी जास्त खरेदी करू शकलो नाही." त्यांनी सांगितले की, ते गुजरातला सूरतमध्ये खरेदीदार शोधत होते.

"मागच्या वर्षी, यावेळेस, आम्ही टोमॅटोंचा रू. ५० लाखांचा व्यापार केला आणि रू. ३ लाख कमविले," साळवेंनी सांगितलं. "या वर्षी आम्ही आतापर्यंत फक्त रू. १० लाखांचे टोमॅटो खरेदी केले, पण ते नुकसानीतच गेले." दोन दिवसांनंतर, त्यांनी टोमॅटो सूरतच्या विक्रेत्याला विकले पण त्यातून नुकसानच हाती लागले.

गेल्या १५ वर्षांमध्ये, टोमॅटो या प्रदेशातील द्राक्षानंतरचे लोकप्रिय उत्पादन झालेले आहे. जमीन कितीही लहान का असेना, थोडं भांडवल आणि पाणी असेल, तर आदिवासी आणि मराठा (जसे बेंडकुळे अणि गायकर, अनुक्रमे) टोमॅटो पिकवायचाच प्रयत्न करतात. परिणामत: टोमॅटोच्या बाजाराच्या कोसळण्याने फारच नुकसान झाले. जान सारख्या काही व्यापार्यांच्या मते, ज्यादा उत्पादनामुळे, किंमती घसरल्या. शेतकरी म्हणतात ते कदाचित खरे आहे, पण भाज्यांचे दरही घसरले याकडे ते लक्ष वेधून घेतात, भाज्या तर कोणी व्यापक प्रमाणावर पिकवल्या नाहीत.


04-AA&CC-Notebandi takes the sauce out of Nashik's tomatoes.jpg

डावीकडे: योगेश गायकर म्हणतात, 'आता कुठे आम्हांला जरा बरे पैसे मिळाले असते, तर लगेच मोदींनी झटका दिला’. उजवीकडे: नाशिकमध्ये, यशवंत बेंडकुळेंसारख्या अनेक शेतकर्यांसाठी, उभी पिके शेतात तशीच सोडणं म्हणजे नुकसानच


"फ्लॉवर, वांगी, कोथिंबीर, दुधीभोपळा या भाज्यांचंच पाहा ना - अशी कोणती भाजी आहे का जिचे भाव मागील आठवड्यांमध्ये कोसळले नाहीत?" नाना आचारी उपहासाने विचारतात. धोंडेगावचे सामान्य, आदिवासी शेतकरी असलेले आचारी, २० दिवसांपूर्वी नाशिकच्या मंडीत वांग्याचे २० क्रेट घेऊन आलेले, पण कोणीही खरेदीदार न मिळाल्याने माघारी गेले. दुसर्या दिवशी त्यांनी सगळा माल, वाशी मंडीत रू. ५०० ला विकला, ज्यातून त्यांना, वाहतूकीचा सर्व खर्च वग़ळता, स्वत:साठी फक्त रू. ३० राहीले. अन्य शेतकरी, वडगावचे केरू कसबे, यांनी आम्हांला सांगितले की, त्यांनी आठ दिवसांपूर्वी वाशीत ७०० किलो वांगी विकली, ज्यातून निव्वळ रू. २०० मिळाले.

काही व्यापारी शेतकर्यांना चेकद्वारे पैसे देतात. पण डिझेल, रसायने, मजदूरांची मजूरी या सर्वांना रोख पैसे द्यावे लागतात. शेतकरी किंवा व्यापारी, कोणालाही, चेक जमा करायला किंवा पैसे काढण्यासाठी, बॅन्केच्या लांब रांगेत उभं राहायला वेळ नाही. आणि रांगेत उभं राहूनही, एकावेळी फक्त रू. २००० ची नवी नोट मिळते. याशिवाय, शेतकरी चेकवर विश्वास ठेवत नाहीत. एका व्यापाराने पैसे नसल्याने, विजय कसबेंना चेक ने पैसे घेण्यास भाग पाडले, ते म्हणतात जर चेक वटला नाही तर त्यांची परिस्थिती अतिशय असहाय्य होईल.


05-Shivaji-Kasbe-cheque-AA&CC-Notebandi takes the sauce out of Nashik's tomatoes.jpg

विजय कसबेंच्या वडीलांच्या नावे चेक - व्यापार्याकडे पैसे नसल्याने त्यांना चेक घेण्यास भाग पाडले गेले, पण चेक न वटल्यास ते असहाय्य होतील


कोसळणारे दर आणि चलन तुटवड्याचे व्यापक परिणाम झालेले आहेत. आदिवासी मजदूरांना पुरेसे काम मिळेनासे झालेय, आणि नवीन २,००० ची नोट तर जखमांवर जणू मीठच चोळत आहे. "सुट्टे मिळविण्यासाठी, दुकानदार रू. १,१०० खर्च करा सांगतात. पेट्रोल पंपाचे मालक निदान रू. ३०० चं पेट्रोल भरा म्हणतात," राजाराम बेंडकुळे सांगतात. "ते सर्व पेट्रोल घरीच घेऊन ये, सर्वजण पिऊयात." त्यांच्या काकू खिन्नपणे म्हणतात.

कृषी औषध व खतांचे दुकानदार गंभीर चिंतेत आहेत. "माझा सगळा व्यापार त्याच्यावरच अवलंबून आहे," आबा कदम, एक दुकानदार, मंडीकडे इशारा करून सांगतात. "माझं तर दोन्ही बाबतीत नुकसान आहे. शेतकरी त्यांची उभीच्या उभी पिके नष्ट करतील तर ते आता माझ्या कडून माल घेणार नाहीत. आणि जर ते स्वत: विक्रीतून पैसे कमावू शकले नाहीत तरी, त्यांना वाढीव हंगामात मी दिलेले आगाऊ पैसेही मला परत येणार नाहीत."

मोदींनी निश्चलनीकरणाची घोषणा केल्यानंतर देशाकडे मागितलेली ५० दिवसांची मुदत ३० डिसेंबरला संपली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला, ताणतणावाच्या पातळीवर अपेक्षाही वाढल्या आहेत. एक शेतकरी म्हणतात की, मोदींनी आमच्या नुकसान भरपाईसाठी आमच्या खात्यात पैसे जमा केले पाहिजेत; अन्य शेतकर्याच्या मते कर्ज माफी; तर तिसर्या शेतकर्याची मागणी की, पीक कर्जावर कमी व्याजदर पाहिजेत. तथापि, मोदींनी ३१ डिसेंबरच्या, देशाला उद्देशून केलेल्या भाषणात, शेत संकट आणि नुकसान या विषयाचा तर मुळी उल्लेखही केला नाही.

आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते, जानेवारीच्या शेवटी सुरू होणार्या द्राक्षाच्या कापणीवर. चांगला भाव मिळाल्यास द्राक्ष शेतकरी काही फायदा मिळवू शकतील. कदमांसारख्या दुकानदारांचे काही आगाऊ दिलेले पैसे परत येऊ शकतील. पण व्यापारी मात्र निराश आहेत. जान यांच्या मते, जोपर्यंत चलन कमतरता आहे, तोपर्यंत ते शेतकर्यांकडून खरेदी करू शकणार नाहीत. खिन्न साळवेंना वाटते की द्राक्षाचेही भाव कोसळणार आहेत.

छायांकन आणि व्हिडिओ: चित्रांगदा चौधरी

Chitrangada Choudhury

ਚਿਤਰਾਂਗਦਾ ਚੌਧਰੀ ਇੱਕ ਸੁਤੰਤਰ ਪੱਤਰਕਾਰ ਹਨ ਤੇ ਪੀਪਲਜ਼ ਆਰਕਾਈਵ ਆਫ਼ ਰੂਰਲ ਇੰਡੀਆ ਦੇ ਕੋਰ ਗਰੁੱਪ ਦੀ ਮੈਂਬਰ ਹਨ।

Other stories by Chitrangada Choudhury

ਅਨੀਕੇਤ ਅਗਾ ਇੱਕ ਮਾਨਵ ਵਿਗਿਆਨੀ ਹਨ। ਉਹ ਅਸ਼ੋਕਾ ਯੂਨੀਵਰਸਿਟੀ, ਸੋਨੀਪਤ ਵਿਖੇ ਵਾਤਾਵਰਣ ਅਧਿਐਨ ਪੜ੍ਹਾਉਂਦੇ ਹਨ।

Other stories by Aniket Aga
Translator : Pallavi Kulkarni

Pallavi Kulkarni is a Marathi, Hindi and English translator.

Other stories by Pallavi Kulkarni