जंगलातल्या घुबडाचं हलक्या आवाजातलं घुमणं असो किंवा चार वेगवेगळ्या साळुंक्यांची साद, त्यांना झटक्यात ओळखू येते. आणि स्थलांतर करून येणाऱ्या वुली नेक करकोच्यांना कोणत्या तळ्यांवर उतरायला आवडतं हेही त्यांना पक्कं माहित आहे.
बी. सिद्दन शाळा पूर्ण करू शकले नाहीत. पण तमिळ नाडूतल्या नीलगिरीमधल्या आपल्या घराच्या भोवताली असलेल्या पक्ष्यांबद्दलचं त्यांचं ज्ञान एखाद्या पक्षीतज्ज्ञाला लाजवेल.
“आमच्या बोक्कापुरम गावात सिद्दन नाव असलेले आम्ही तिघं होतो. त्यातला नेमका कोणता सिद्दन हे ओळखायला लोक म्हणून लागले ‘तो नाही का, कुरुवी सिद्दन – सारखा पक्ष्यांच्या मागे धावणारा पोरगा’,” हसत आणि अगदी अभिमानाने सिद्दन आम्हाला सांगतात.
कागदोपत्री त्यांचं नाव बी. सिद्दन असलं तरी मुदुमलईच्या सभोवती असलेल्या गावांमध्ये आणि जंगलांमध्ये मात्र ते ओळखले जातात, कुरुवी सिद्दन म्हणून. कुरुवी म्हणजे ‘पॅसरीफॉर्म’ या प्रकारचे पक्षी. पक्ष्यांच्या सगळ्या प्रजातींचा विचार केला तर जवळ जवळ निम्मे पक्षी याच प्रकारात मोडतात.
“तुम्ही पश्चिम घाटांमध्ये कधीही जा, तुम्हाला चार पाच पक्ष्यांचे आवाज तरी नक्कीच ऐकू येणार. तुम्ही फक्त इतकंच करायचं, शांत ऐकायचं आणि समजून घ्यायचं,” २८ वर्षीय विजया सुरेश म्हणते. नीलगिरीच्या पायथ्याशी असलेल्या अनइकट्टी गावात त्या शिक्षिका आहेत. मुदुमलई व्याघ्र प्रकल्पाच्य आसपास राहणाऱ्या अनेकांसाठी मार्गदर्शक असणाऱ्या सिद्दन यांच्याकडून पक्ष्यांबद्दल मी खूप काही शिकले असं ती सांगते. या परिसरातले किमान १५० पक्षी विजया ओळखू शकते.
















