“आम्ही आमचा ट्रॅक्टर तिरंग्याने सजवलाय कारण आमचं आमच्या देशावर प्रेम आहे,” शमशेर सिंग सांगतात. तिरंग्याच्या रंगातल्या फिती, फुगे आणि फुलांनी त्यांचा ट्रॅक्टर सजलाय. “जशी शेती आम्हाला प्यारी आहे तशीच आमची मायभूमी,” ते पुढे म्हणतात. “आम्ही महिनोनमहिने शेतात राबतो, आमच्या आईनी आम्हाला जसं सांभाळलं तसं आमच्या पिकाला जपतो. अगदी तीच भावना मनात ठेवून आम्ही धरतीमातेच्या रंगात आमचा ट्रॅक्टर सजवलाय.”
दिल्लीतल्या आंदोलनांच्या ठिकाणी शेतकरी विविध विषयांभोवती आपल्या ट्रॅक्टरची सजावट करताना दिसतायत. जसं दर वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ वेगवेगळे विषय मांडतात तसंच त्यांचा मोर्चाही रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण असावा असा त्यांचा प्रयत्न आहे. फुलं, झेंडे आणि वेगवेगळे देखावे यामुळे ट्रॅक्टरचं रुपडंच बदलून गेलंय. शेतकरी एकेकटे किंवा शेतकरी संघटनांचे गट गेल्या काही दिवसांपासून तयारीला लागलेत जेणे करून २६ जानेवारी पर्यंत ते सज्ज असतील.
“गौरे नांगलहून, माझ्या घरून इथे यायला मला दोन दिवस लागले,” ५३ वर्षीय शमशेर सिंग सांगतात. पंजाबच्या अमृतसर जिल्ह्यातल्या आपल्या गावाहून इतर २० शेतकऱ्यांसोबत ते हरयाणा-दिल्लीच्या सीमेवर टिक्री इथे आलेत. कृषी कायदे रद्द करा ही शेतकऱ्यांची मागणी लावून धरण्यासाठी जो मोर्चा काढण्यात येणार आहे त्याला समर्थन देण्यासाठी ते सगळे इथे आले आहेत.




