रस्त्यात पडलेली एक फांदी जमिनीवर आपटत थलकम्मा ए. के. नारळाच्या वाडीत आल्याचं जाहीर करतात. “झाडझाडोरा वाढलेल्या या जागेत येताना काळजी घ्यावी लागते. काठी आपटायची आणि आवाज करायचा. एखादा साप-बिप असला तर तो निघून जातो,” नारळाच्या उंचच उंच झाडांखाली वाढलेला झाडा, वेली आणि खाली पडलेल्या झापांमधून वाट काढत जात असलेल्या थनकम्मा म्हणतात.
एर्णाकुलमच्या निवासी वसाहतीतल्या एका रिकाम्या भूखंडात रान माजलंय. “वाटेत चांगले नारळ मिळाले तर मग नशीबच म्हणायचं!” ६२ वर्षांच्या थनकम्मा अशा मोकळ्या रानात पडलेले नारळ गोळा करतात, विकतात आणि आपलं पोट भरतात. मल्याळी स्वयंपाकात नारळाचा सढळ वापर होत असल्याने वर्षभर त्याला चांगलीच मागणी असते.
“पूर्वी काम संपलं की मी [पुतिया रोड जंक्शन] या परिसरात नारळ गोळा करायचे. पण आता वेगवेगळी दुखणी मागे लागलीयेत त्यामुळे मला जाणं होत नाही,” कंबरभर वाढलेल्या गवतातून माग काढत थनकम्मा पुढे जातात. थोड्या थोड्या अंतराने श्वास घ्यायला थांबत, वरती नारळ पाहत, दुपारच्या टळटळीत उन्हात डोळ्यावर हात धरत त्या आपलं काम सुरू ठेवतात.
पाच वर्षांपासून थनकम्मांना थायरॉइडशी संबंधित त्रास व्हायला लागले. धाप लागणं, खूप थकवा आणि इतर काही समस्या सुरू झाल्या. त्या घरकाम करायच्या ते काम सुटलं आणि महिन्याला मिळणारा ६,००० रुपये पगारही थांबला. थनकम्मांना घरी बसून चालणार नव्हतं. पैसे कमवायलाच लागणार होते. त्यामुळे मग त्या शेजारच्याच घरांमध्ये सामान सुमान पुसणं, अंगण झाडणं अशी थोडी हलकी कामं करू लागल्या. कोविड-१९ ची महासाथ आणि तेही काम थांबलं.
त्यानंतर मात्र थनकम्मा रिकाम्या जागेत पडलेले नारळ विकून आपला प्रपंच चालवतायत. त्यांना राज्य सरकारकडून १,६०० रुपये पेन्शन देखील मिळते.
“इथे यायला मला आजवर कुणीच मनाई केलेली नाहीये. इथे सगळेच मला ओळखतात आणि मी काही नुकसान करणार नाही हेही त्यांना माहितीये,” थनकम्मा सांगतात. अनेक घरांमध्ये कसलीच राखण नाही. पण तिथल्या चांगल्या वाढलेल्या नारळाच्या झाडांबद्दल आणि फळांबद्दल त्या म्हणतात.
हे बोलत असताना एकीकडे हाताने झाडोरा साफ करणं सुरूच असतं. तोडून टाकलेली झुडपं एकीकडे टाकत त्या झाडाच्या बुंध्याचा भाग साफ करतात. कारण नारळ तिथे पडलेले सापडतात. नारळ मिळाला की त्या शेजारच्या एका भिंतीवर ठेवतात आणि पुढच्याचा शोध सुरू करतात.
एक तासभर नारळ गोळा केले की त्यांचं काम थांबतं. त्यानंतर थनकम्मा त्या भिंतीवरून पलिकडच्या आवारात जातात. त्या पूर्वी तिथे घरकाम करायच्या. तिथे त्यांना पेलाभर पाणी रोज मिळतं.
कपडे झटकून, गवत-काड्याकुड्या साफ करून थनकम्मा नारळ निवडायला सुरुवात करतात. वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून त्या त्यांच्याच वस्तीतल्या हॉटेल किंवा घरांमध्ये माल विकतात. सामान्य आकाराच्या नारळाला वीस रुपये आणि मोठा असला तर ३० रुपये मिळतात.
एकदा का वाटणी झाली की थनकम्मा जरा हातपायतोंड धुतात. कामाचे कपडे म्हणजे एक जुना गाउन बदलून साडी नेसतात आणि घाईत एलूरची बस पकडतायत. तिथे जाऊन त्या नारळ विकतात.
“दर वेळी आलं की नारळ मिळतातच असं काही नाही. सगळा नशिबाचा खेळ आहे. कधी कधी चिक्कार मिळतात, कधी कधी काहीच नाही,” त्या सांगतात.
आता मान मागे करून वरती नारळाच्या झाडांकडे पाहणंही त्यांना अवघड होऊ लागलंय. धाप लागलेली असतानाच आवंढा गिळत त्या म्हणतात, “घेरी येते.” घराजवळच्या कारखान्यांच्या प्रदूषणामुळे आपली तब्येत झपाट्याने खराब होत चालली असल्याचं त्या सांगतात.
गंमत म्हणजे थनकम्मांना स्वतःला स्वयंपाकात नारळ फारसा आवडत नाही. “नारळ घातलेले पदार्थ मला फार आवडत नाहीत. मी फक्त पुट्टू किंवा आयला – बांगड्याच्या कालवणात नारळ वापरते,” त्या म्हणतात. नारळाच्या शेंड्या जळणासाठी आणि सुकं खोबरं तेलाच्या कारखान्यात दिलं की त्या बदल्यात नारळाचं तेल मिळतं. एखाद्या नारळात कोंब असेल तर बोनसाय तयार करण्यासाठी तसले नारळ त्या आपल्या मुलाला, कन्ननला देतात.
थनकम्मांची तब्येत चांगली होती तेव्हा नारळ काढणीच्या चक्राप्रमाणे – दर ४० दिवसांनी - त्या झाडांकडे जात असत. तेव्हा ताजे नारळ मिळण्याची शक्यता जास्त असायची. आजकाल त्यांना एलूरच्या घरून पुतिया रोडला प्रवास करून येणं अवघड व्हायला लागलंय त्यामुळे त्या नियमित येत नाहीत. “मी पुतिया रोडला रहायचे तेव्हा हे सगळं फार सोपं होतं. ता २० मिनिटांचा बसचा प्रवास त्यानंतर पायी १५ मिनिटं चालत जायचं हे सगळं फार दमवणारं आहे,” बससाठी थांबलेल्या थनकम्मा सांगतात.
थनकम्मा पुतिया रोड जंक्शन परिसरात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांची पाच भावंडं आहेत. वडिलोपार्जित घर होतं ती जागा नंतर त्यांच्या भावा-बहिणींमध्ये विभागली गेली. थनकम्मा यांच्या वाट्याला आलेली जमीन त्यांचे दिवंगत पती वेलयुथन यांनी विकून टाकली. डोक्यावर छप्परच नाही मग ते कधी पुतिया रोडवर आपल्या बहिणीकडे किंवा कधी कधी तर पुलाखाली मुक्काम करायचे. त्या सध्या राहतात ते घर तीन सेंट जागेवर (१३०६.८ चौ. फूट) बांधलं आहे. एलूरच्या एस. सी. कॉलनीमधली ही जागा बेघरांना आधार म्हणून पंचायतीने पट्टायम (जमिनीचा करार) म्हणून दिली आहे.
थनकम्मा आणि पुतिया जंक्शन परिसरात नारळाच्या झाडांवर चढण्याचं काम करणारे वेलयुथन यांची दोन मुलं – कन्नन, वय ३४ आणि कार्तिका, वय ३६. कन्नल थ्रिसूरमध्ये राहतो आणि आपल्या सासरच्या शेतीत मदत करतो. कार्तिका आणि नात तीन वर्षांची वैष्णवी जवळच राहतात. थनकम्मा नातीला लाडाने थक्कली (टोमॅटो) म्हणतात. “लहान लेकरांबरोबर वेळ मजेत जातो. पण हे काम सोपं नाही, फार दमवतात,” त्या म्हणतात.
*****
“आजकाल मला डोळ्याला स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे आजकाल मी नारळ शोधायला जात नाही,” कपड्यांच्या घड्या घालत, काही कागद आवरत आणि आपल्या लाडक्या पोपटाचा पिंजरा पलंगावर ठेवत ठेवत त्या सांगतात. थनकम्मा एकट्याच राहतात, सोबत त्यांचा लाडका पोपट, तातू. घरात कुणी अनोळखी माणूस आलं तर हाळी घालायलाही तो शिकलाय.
जुन्या दिवसांच्या आठवणी सांगत त्या म्हणतात, “एकदा जवळनंच एक साप चाललेला दिसला. मी शांत उभी राहिले. माझ्या फाटक्या चपलेवरून तो सरसर गेला. आता साप राहू द्या, नारळसुद्धा ओळखू येत नाही मला!” आपली नजर अधू झाल्याचं त्या सांगतात. आजारपणासाठी औषधं किंवा पोटभर खाणंसुद्धा त्यांना आता परवडत नाही.
“आजवर मी ज्यांच्याकडे काम केलंय ते मला लागले तर पैसे देतात किंवा काही वस्तू देऊन मदत करतात. पण आता जाऊन त्यांना भेटणं देखील मुश्किल होऊ लागलंय,” थनकम्मा सांगतात. त्यांना मदत करणाऱ्या एकांना भेटायला त्या निघाल्या होत्या. पण चालता चालता त्यांना थकल्यासारखं होतं आणि घशाला कोरडही पडते. साखरेने जरा तकवा येईल असं वाटून त्या पटकन एक गोळी तोंडात टाकतात.