रविवार सकाळचे १०.३० वाजलेत आणि हनी कामावर जाण्यासाठी तयार होतीये. आरशासमोर बसून ती आरक्त लाल रंगाची लिपस्टिक ओठांना लावतीये. “माझ्या ड्रेसला अगदी मॅच होईल हा रंग,” ती म्हणते आणि लगबगीने आपल्या सात वर्षांच्या लेकीला खाणं भरवायला उठते. आरशासमोरच्या ड्रेसिंग टेबलवर काही मास्क आणि इयरफोन इथेतिथे पडलेत. टेबलावर मेकअपचं साहित्य आणि सौंदर्य प्रसाधनं विखुरलीयेत. खोलीच्या एका कोपऱ्यात भिंतीवर टांगलेल्या देवी-देवतांच्या तसबिरी आणि नातेवाइकांचे फोटो आरशात दिसतायत.
हनी (नाव बदललं आहे) हॉटेलमध्ये एका क्लायंटला किंवा गिऱ्हाइकाला भेटायली निघालीये. नवी दिल्लीच्या मंगोलपुरी भागातल्या वस्तीत तिची एक खोली आहे. तिथून हे हॉटेल ७-८ किलोमीटरवर आहे. हनीचं वय अंदाजे ३२ वर्ष असेल आणि ती धंदा करते. देशाच्या राजधानीच्या नंगलोई जाट परिसर हे तिचं कामाचं क्षेत्र. ती मूळची हरयाणातल्या एका खेड्यातली आहे. “दहा वर्षं झाली, मी इथे आले. आणि आता मी इथलीच झालीये. पण दिल्लीला आले आणि माझ्या आयुष्यात एका मागोमाग एक संकटं येत गेली.”
कसली संकटं?
“चार वेळा गर्भ पडून गेला, बहुत बडी बात है! माझ्यासाठी तरी निश्चितच. त्यात मला खायला घालणारं, माझी काळजी घेणारं आणि मला दवाखान्यात नेणारं देखील कुणी नव्हतं,” काहिशा खेदाने हनी सांगते. या सगळ्या गोष्टी मागे टाकून ती फार पुढे गेलीये असं तिच्या बोलण्यातून सूचित होत होतं.
“केवळ याच कारणासाठी मी या धंद्यात आले. माझं, तेव्हा पोटात असणाऱ्या माझ्या बाळाचं पोट भरायला माझ्याकडे पैसे नव्हते. पाचव्यांदा दिवस गेले होते. दोन महिने झाले तेव्हाच माझा नवरा मला सोडून गेला होता. माझ्या आजारामुळे काही घटना घडल्या होत्या, आणि मग मी ज्या प्लास्टिकचे डबे बनवणाऱ्या कारखान्यात काम करत होते तिथल्या मालकाने मला कामावरून काढून टाकलं. मला महिन्याला १०,००० रुपये मिळत होते त्या कामावर,” ती म्हणते.
हनीच्या आई-वडलांनी वयाच्या १६ व्या वर्षीच हरयाणात हनीचं लग्न लावून दिलं होतं. ती आणि तिचा नवरा काही वर्षं तिथेच राहिले – तो ड्रायव्हरचं काम करायचा. ती २२ वर्षांची असताना ते दिल्लीला आले. आणि मग तिचा दारुडा नवरा अधून मधून गायब व्हायला लागला. “कित्येक महिने तो गायब असायचा. कुठे? मला माहित नाही. अजूनसुद्धा त्याचं तसंच चालू आहे. तो कधीच काही सांगत नाही. इतर बायांबरोबर जातो आणि त्याचे खिसे खाली झाले की मग परत येतो. तो फूड डिलिव्हरीचं काम करतो. पण मिळणारा पैसा फक्त स्वतःवर खर्च करतो. चारदा माझा गर्भ पडून गेला त्याचं हेच मुख्य कारण होतं. मला लागणारी औषधं, खाणं तो काहीच आणायचा नाही. मी प्रचंड अशक्त झाले होते.”







