रायमंगल नदीतून पूर्णिमा मिस्त्री माशांचे जाळे घेऊन बाहेर येत आहेत, पाणी त्यांच्या कमरेभोवती खेळतंय. गेल्या अर्ध्या तासापासून त्या नदीकिनारी पोहून, जाळं आपल्या मागे खेचून, समुद्री कोळंबींचे अंकुर शोधत आहेत.
नदीकिनारी पूर्णिमा जाळ्यातील तण, डहाळ्या आणि इतर माशांपासून अंकुर शोधून वेगळे करत आहे. तापलेल्या सूर्याच्या प्रकाशात त्यांची साडी आणि वेणी आता सुकत आहेत. पण पूर्णिमाला पुन्हा पाण्यात जावे लागणार. "बाजारात विकायला अजून पुरेसे अंकुर शोधावे लागतील, त्यासाठी मला २-३ तासांचा वेळ लागणार," त्या सांगतायत.
चिखलाने भरलेल्या किनारी पाय दुमडून जाळ्यातील वस्तू वेगवेगळ्या करत असताना, पूर्णिमा सांगत होत्या की कशा प्रकारे त्यांना खारं पाणी आणि चिखलात तासन् तास घालवावे लागतात, ज्यामुळे त्या त्वचा संसर्ग आणि खाजेने ही त्रस्त असतात. "आमचं काम बघा किती अवघड आहे," त्या म्हणतात. "सुंदरवन मधील लोक असंच जीवन जगतात आणि उदरनिर्वाह करतात."
पूर्णिमा यांनी हे काम आपल्या कुटुंबाला हातभार लागावा म्हणून दोन वर्षांपूर्वी सुरू केले. त्यांच्या परिवारात त्यांचे पती, दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या पतींना पाण्याची भीती असल्याने ते मासेमारीसाठी पाण्यात जाऊ शकत नाहीत, जो इथे सर्वांचाच उदरनिर्वाहाचा प्रमुख व्यवसाय आहे. म्हणून ते घरी भाज्या पिकवून विकण्याचे काम करतात.
व्हिडीओ पहा: पूर्णिमा मिस्त्री रायमंगल नदीत पोहून विकण्यासाठी पुरेसे अंकुर जमविण्यासाठी मोठे जाळे टाकत आहेत
सुंदरवनाच्या काही भागात मगरी आणि वाघ तर सर्रास वावरत असतात - पूर्णिमांना त्याची भीती नाही का वाटत? कधी कधी, मला मगरींची भीती वाटते; गावातल्या लोकांवर मगरींचा हल्ला झालेला आहे," पूर्णिमा सांगतात. "जंगलाजवळ असलेल्या सुरक्षा जाळ्यामुळे वाघ येथे येत नाहीत."
पूर्णिमा जोगेसगंज मध्ये राहतात, पश्चिम बंगालच्या हिंगलगंज ब्लॉक मध्ये रायमंगल नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या जोगेसगंज गावाची लोकसंख्या ७, ००० हून अधिक असून, तेथील घरे विखुरलेली आहेत. सुंदरवनच्या इतर भागांप्रमाणे जोगेसगंजमधील बहुतेक महिला आणि लहान मुले अंकुर जमविण्याचे काम करतात. मासे आणि खेकडे तसेच वन्य उत्पादने, जसे मध आणि लाकूड, यांच्या विक्रीतून घरी येणाऱ्या मिळकतीत, ही अंकुरांची छोटीशी मिळकत मदतीची ठरते.
राज्य सरकारची आकडेवारी [२००९ मधील] दर्शविते की, गरिबीमुळे सुंदरवनमध्ये राहणाऱ्या ४४ लाख लोकसंख्येपैकी, २ लाखाहून अधिक लोकांना समुद्री कोळंबींच्या अंकुर संचयनाचे काम करावे लागते.
हेमनगर गावच्या शोमा मोंडल म्हणतात की हे काम तर प्रामुख्याने महिलाच करतात. "पुरुष सामान्यत: मोठे खेकडे पकडायला जातात, ज्यात त्यांना जास्त पैसे मिळतात [आणि या कामासाठी ते समूहाने बोटही भाड्याने घेऊन जातात]. अंकुर गोळा करण्याचे काम महिलांच्या वाट्याला येते, अतिशय गरीब घरांमध्ये तर लहान मुलेही हे काम करतात. यातून येणारी मिळकत फारच कमी असली तरी दुसरं कोणतं कामही त्यांच्यासाठी उपलब्ध नाही. गावातल्या प्रत्येक घरातील निदान एक महिला हे काम करतेच. आम्ही इथे व्यवस्थित शेती देखील करू शकत नाही, कारण बहुतेकदा तर इथे खारंच पाणी असतं, फक्त पावसाळ्यात आम्ही भात शेती करतो."
डावीकडे: समुद्री कोळंबींच्या अंकुरांचे संचयन करण्यासाठी जवळ जवळ पाच तास पाण्यात राहते लागते उजवीकडे: एक महिला ओहोटीच्या वेळी जाळ नदीत खेचताना, ओहोटीची वेळ जास्त अंकुर मिळविण्यासाठी उत्तम असते
शोमा जवळजवळ रोज ओहोटीच्या वेळी अंकुरांच्या शोधात नदीत जाते. ओहोटीची वेळी अंकुर जास्त प्रमाणात मिळण्याची चांगली शक्यता असते - असे असले तरी ओहोटीच्याही वेगवेगळ्या वेळा असतात. त्यामुळे कधी कधी शोमा मध्यरात्री किंवा पहाटे ४ वाजता नदीत जातात. "काळाकुट्ट अंधार असला की मगर किंवा जंगली प्राणी दिसत नाही. दिवसा नदीत किमान प्राणी दिसला तर दूर तरी जाता येतं."
वेगवेगळ्या ऋतुत, पूर्णिमा आणि शोमा प्रमाणे अंकुर जमविणाऱ्यांची मिळकतही वेगवेगळी असते. "थंडींच्या दिवसात, जेव्हा अधिक हंगामाचा काळ असतो, आम्हांला १, ००० अंकुरांचे रू. ३०० मिळतात," त्या सांगतात, "इतर वेळी, भाव रू. १०० पर्यंत पडू शकतो आणि कधी कधी तर रू. ६० पर्यंत कमी होतो."
चांगला व्यापार झाल्यास, जाळ्यात २, ००० अंकुरेही जमा होतात, पण असं वर्षातून फार कमी वेळा होतं. साधारणपणे, शोमा रोज २००-५०० अंकुर गोळा करू शकते. "ज्यामुळे हेमनगरच्या बाजारात जाऊन आवश्यक डाळ आणि तांदूळ विकत घेण्याएवढे पैसे जमविता येतात. पण त्यापेक्षा अधिक नाही," त्या म्हणतात.
समुद्री कोळंबींचे अंकुर लहान असतात, अगदी केसाच्या लहान तुकड्यासारखे. १,००० अंकुरांची किंमत आधीच ठरलेली असते
थंडीच्या महिन्यांमध्ये, डिसेंबर ते फेब्रुवारी पर्यंत, शोमा तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात त्यांचे पती कपड्यांच्या ज्या फॅक्टरीत काम करतात, तेथे पडदे आणि उशांचे कव्हर शिवण्याचे काम करतात. थंडीच्या दिवसांमध्ये तर अंकुरांना जास्त चांगली किंमत मिळते, पण अनेक महिला त्या कडाक्याच्या थंडीत नदीच्या पाण्यात जाऊन काम करण्याचे टाळतात. शोमाचे पती सौमेन मोंडल इरोडच्या त्याच फॅक्टरीत पूर्ण वेळ काम करतात. शोमा जेथे रोज रू. २००-५०० कमवतात, तेथे त्यांचे पती थोडं जास्त मिळवतात. त्यांची पाच वर्षांची मुलगी गावी आजी जवळ राहते.
राज्याचा वन विभाग तसेच पर्यावरणवादी यांनी कोळंबीच्या अंकुरांच्या संचयन पद्धतीवर टीका केली आहे. अंकुरांव्यतिरिक्त जाळ्यात अन्य माशाच्या जाती पण फसतात. पण महिला ते अन्य जातीचे मासे फेकून देतात, ज्यामुळे त्या जाती नष्ट होण्याची भीती असते. माशांचे जाळे खेचून नेल्याने जमिनीची धूप होऊन काठ कमकुवत होतात, नदीचे काठ कमकुवत झाल्यास नदीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे कठीण होते.
पण पूर्णिमा अन्य जातीचे मासे फेकून न देता आपल्या घराजवळील छोट्या तलावात प्रजातींची उपज होण्यासाठी सोडून देते. "ज्यांच्या जवळ तलाव नाही त्यांना उरलेली मच्छी फेकून द्यावीच लागते, " रायमंगलच्या किनारी अंकुर वेगळे करण्याचे काम सुरू असताना पूर्णिमा म्हणाल्या.
समुद्री कोळंबींचा व्यापार या गावांमधील महिलांच्या कष्टावर अवलंबून आहे, तरीही पुरवठा साखळीत त्यांना सर्वांत कमी पैसे मिळतात. अंकुर जमा केल्यावर या व्यापाऱ्यातील फायद्याचा बराचसा हिस्सा पुरुष हस्तगत करतात.
साधारणत: मध्यस्थ व्यापारी, गावांमध्ये जाऊन महिलांकडून अंकुर विकत घेऊन, भेरींमध्ये, मत्स्य व्यवसाय संसाधनात लागवडीसाठी विकतात. ही संसाधने म्हणजे खार्या पाण्यात जल शेतीसाठी उभारलेले मोठे कृत्रिम कोंदण आहेत. ही दक्षिण परगणा जिल्ह्यात कॅनिंग, जिबांतला, सारबेरिया आणि अन्य स्थानी आढळतात. येथे तीन महिने अंकुर ठेवतात आणि जेव्हा ते आकाराने मोठे होतात, तेव्हा त्यांना कॅनिंग, बारासात आणि धामाखली इथल्या घाऊक बाजारात विकतात. नंतर ते निर्यातीसाठी पाठवले जातात - सामान्यपणे, तेच पुरूष निर्यात करतात, जे मोटरबाईकवर पाणी भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून अंकुर घेऊन जातात.
दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात खार्या पाण्याच्या कोंदणात लागवड केल्यानंतर, अंकुरांची वाढ होऊन त्या मोठ्या कोळंबी बनतात
पूर्ण-विकसित समुद्री कोळंबी घाऊक बाजारात आकर्षक किंमती मिळवून देतात. कॅनिंग मच्छी बाजाराचे घाऊक व्यापारी, तरूण मोंडल म्हणतात की, त्यांचा मुख्य आर्थिक स्त्रोत समुद्री कोळंबी विकूनच त्यांना मिळतो. "हा चांगला व्यापार आहे. आम्ही भेरीतून कोळंबी रू. ३८०-८८० प्रती किलो ने खरेदी करून, त्यांच्या आकारानुसार, रू. ४००-९०० प्रती किलोच्या दराने विकतो. प्रती किलो आमचा नफा रू. १०-२० आहे. आमचा बहुतेक पुरवठा हा सुंदरवनच्या वासंती आणि गोसाबा यांसारख्या ब्लॉक्समधून येतो. ह्या कोळंबी आम्ही मोठ्या कंपन्यांसाठी काम करणार्या एजंटांना विकतो, जे शेवटी त्यांची निर्यात करतात.
२०१५-१६ मध्ये, भारताच्या सागरी खाद्याची निर्यात ४.६८ अमेरिकी अब्ज डॉलर एवढी होती; जपान, चीन आणि अमेरिकेत निर्यात होणार्या या खाद्यात ७० टक्के कोळंबी असतात. समुद्री कोळंबी, ज्याला ब्लॅक टाइगर झींगा असेही म्हणतात, या कोळंबींच्या निर्यातीतील एक प्रमुख भाग आहे. पश्चिम बंगाल हा भारतातील सर्वांत मोठ्या कोळंबी आणि सागरी खाद्यपदार्थ उत्पादक आणि निर्यात करणार्यांपैकी एक आहे.
शोमा आणि पूर्णिमा सारख्या संचयनकर्त्यांना या अमेरिकी अब्जावधी पैशांमधून केवळ काही पैसेच मिळतात. मध्यस्थ व्यापारी ह्या महिलांच्या कार्याचे दर निर्धारण आणि व्यापार नियंत्रण करतात, ज्यामुळे महिला जास्त किंमत मागू शकत नाहीत. "अंकुरांच्या किंमतींशिवाय, मध्यस्थ व्यापारी, महिलांना वार्षिक ठेव म्हणून रू. २००-५०० प्रती व्यक्ती देतात, जे ते परत मागत नाहीत," शोमा सांगत होत्या. "ह्या ठेव राशीमुळे आम्ही केवळ विशिष्ट व्यापार्यांनाच अंकुर देऊ शकतो, दुसर्या कोणालाही नाही. आम्ही महिला मोठ्या संख्येने एकत्र येऊन फायद्याच्या किंमतीचा सौदा करण्यास असमर्थ ठरलो आहोत."
पण ही तर शोमा आणि पूर्णिमा सारख्या महिलांची मेहनत आहे की समुद्री कोळंबींचा घाऊक आणि निर्यात व्यापार टिकून आहे, आणि भारत तसेच संपूर्ण जगात श्रीमंतांच्या घरी ताटात हा महागडा, स्वादिष्ट पदार्थ वाढला जाऊ शकतो.
सर्व छायाचित्रे : ऊर्वशी सरकार