केहल्या वसावे त्यांच्या मच्छरदाणीने झाकलेल्या खाटेवर उताणे पडून, वेदनेने अस्वस्थ, झोपेतच कण्हत होते. त्यांचा त्रास न बघवून थोडा आराम मिळावा यासाठी त्यांची १८ वर्षांची लेक लीला त्यांचे पाय चेपू लागली.
गेले अनेक महिने ते असेच खाटेला खिळून आहेत – त्यांच्या डाव्या गालावर जखम तर उजव्या नाकपुडीतून अन्न-पाण्यासाठी नळी घातली आहे. "तो फार हालचाल करू शकत नाही किंवा बोलूही शकत नाही नाही तर जखम ठणकायला लागते," त्यांची बायको पेसरी, वय ४२ सांगते.
या वर्षी २१ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील वायव्येकडच्या नंदुरबार जिल्ह्यातील चिंचपाडा ख्रिस्ती रुग्णालयात तपासणीसाठी गेला असता केहल्यांच्या आतील गालाला कर्करोग झाल्याचे (buccal mucosa) निदान करण्यात आले.
१ मार्च पासून सुरु करण्यात आलेल्या कोविड-१९ लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने ४५ ते ५९ वयोगटातील पात्र लाभार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या सह-आजार सूचित केहल्यांच्या आजाराचा, म्हणजेच कर्करोगाचाही समावेश होता. त्या सूचनांनुसार जे "नागरिक वयानुरूप केलेल्या गटात मोडतात, प्रथमतः ६० वर्षांवरील सर्व आणि त्या नंतर ४५ ते ६० वयोगटातील असे नागरिक ज्यांना काही सह-आजार आहेत" अशा सर्वांसाठी लसीकरण खुले आहे. (एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून ४५ वर्षांवरील सर्वांसाठी, सह-आजार नसले तरीही लसीकरण खुले करण्यात आले आहे).
पण, वयोगट, सह-आजारांची यादी किंवा शिथिल करण्यात आलेली पात्रता यासगळ्यामुळे केहल्या आणि पेसरी यांना फारसा फरकच पडत नाहीये. भिल्ल आदिवासी असणारे वसावे कुटुंब लसीकरणापासून वंचितच राहिले आहे. अक्राणी तालुक्यातील त्यांच्या कुंभारी या पाड्यापासून सर्वांत जवळचं लसीकरण केंद्र म्हणजे साधारण २० किलोमीटर अंतरावर असणारं धडगावचं ग्रामीण रुग्णालय. "आम्हाला चालत जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही”, पेसरी सांगतात.












