पुरुष मंडळींनी झाडाचे बुंधे तोडून रस्त्यात आडवे टाकले होते. ७०-८० जणांचा गट असेल. आदल्या रात्री भेटून त्यांनी भेलोनीलोध ते ललितपूर (दक्षिणेकडे अंदाजे ४० किमीवर) आणि झाशीपर्यंत (उत्तरेकडे अंदाजे ९० किमी) अशा खड्ड्यांनी भरलेल्या, धुऊन गेलेल्या दोन रस्त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं नियोजन केलं. उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधल्या या गावातल्या लोकांनी या आधीही पत्रव्यवहार, सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटी घेणं हे सोपस्कार पार पाडले होते – रास्ता रोको करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
आदल्या दिवशी संध्याकाळी, २५ वर्षीय राजबेती वंशकारला इतर बायांकडून या आंदोलनाविषयी समजलं होतं. पूर्ण सकाळभर आंदोलनाच्या आवाजांकडे तिचे कान लागलेले होते, पण तिला फार काही ऐकू आलं नाही. १,९०० लोकसंख्येच्या या गावात राहणारी राजबेती बासोर या अनुसूचित जातीची आहे. तिचं घर गावातल्या लोधी या मागासवर्गीयांच्या वस्तीपासून थोड्याच अंतरावर आहे. १२ वर्षांपूर्वी ती सिद्धार्थनगर जिल्ह्यातल्या जामला जोत गावाहून भेलोनीलोधमध्ये रहायला आली. ती बांबूच्या टोपल्या विणून विकते आणि घराच्या कमाईला अंदाजे १००० रुपयांचा हातभार लावते.
त्या दिवशी, तिचा आठ वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी शाळेत गेली, नवरा कामावर गेला आणि मग तिच्या कानावर काही तरी आवाज यायला लागले. “११-१२ वाजण्याच्या सुमारास मला झिंदाबादचे नारे आणि विजयी झाल्याच्या घोषणा ऐकू यायला लागल्या. नंतर दुपारी माझी हातपंपावर इतर बायांशी भेट झाली तेव्हा ताई [मीरा देवी] कडून मला काय घडलं ते कळलं. उपदंडाधिकारी साहिबा आहेत त्यांनी दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याचं वचन दिलंय,” राजबेती वंशकार सांगते.
गावातल्या लोधींच्या आळीतल्या शेवटच्या घरापासून १०० मीटरवर मीरा देवी वंशकार यांचं पहिलंच बसोर समाजाचं घर. त्यांच्या घरच्या काही खिडक्यांमधून गावातला मधला चौक दिसतो जिथे पुरुष मंडळी निदर्शनांसाठी जमा झाली होती. त्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीतून डोकावून पाहिलं. “लोक रस्त्यात बसून राहिले होते आणि कुणालाच जाऊ-येऊ देत नव्हते आणि मग मॅडम आल्या,” ५१ वर्षांच्या मीरा देवी सांगतात. “मग काही तरी चर्चा झाली आणि मग त्या गेल्या. मी दारापाशी आले तर तिथल्या काही मुलांनी सांगितलं की मोर्चा मागे घेतलाय कारण दोन दिवसांत रस्त्याचं काम होणार आहे. आता हे खरं असावं अशी आशा आहे,” त्या म्हणतात.
“बेकारातली बेकार गावं पण सुधारलीयेत,” २३ वर्षांची संध्या वंशकार म्हणते. “पण आमच्याकडे पहा. मी धुणं धुऊन वाळत टाकते परत सगळे धुळीने माखतात. मला धुळीपायी पदर घ्यायला लागतोय. आम्ही बांबूच्या टोपल्या विणतो त्याही धुळीने भरतात.” संध्याचे वडील आणि दोन भाऊ मजुरी करतात तर ती आणि आई घर सांभाळतात आणि बांबूच्या टोपल्या विकून थोडी फार कमाई करतात.
या तिघींना कसंही करून पक्का रस्ता हवाय. त्यातल्या खड्ड्यांचा काही त्यांना त्रास होण्याचा प्रश्न नाही (कारण त्या बहुतेक पायीच हिंडतात) पण या कच्च्या रस्त्याच्या धुळीला त्या पुरत्या वैतागल्या आहेत.
निदर्शनं मागे घेतल्यानंतर काही पुरुष मंडळी बाहेरच गप्पा ठोकत उभी होती. नन्हीबाई लोधी, वय ५३, उंबऱ्याशी येऊन आपले पती केहर सिंग, वय ६० यांना जेवायला बोलावतात. काही महिन्यांपूर्वी केहर सिंग रस्त्याने चालत चालले होते आणि तेवढ्यात तिथून जाणाऱ्या गाडीमुळे उडालेली खडी त्यांना जोरात लागली. “तेव्हापासून मी त्यांना जरा जपून रहायला सांगितलंय,” नन्हीबाई सांगतात. जखम दिसत नसली तरी केहर सिंग यांना वेदना होतायत. “सगळीकडे नुसती धूळ,” नन्हीबाई पुढे म्हणतात. “पाण्यात, खाण्यात. आमची बसायची खोली [जी रस्त्याला लागून आहे] तिचा तर काहीच उपयोग नाही. डोळ्यात सतत कचरा जातो. डोळ्यातून पाणी येतंय, शिंका येतायत. मी आणि माझे पती दोघांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागलाय.” त्यांच्या दोन्ही मुलींची लग्नं झालीयेत आणि मुलं (वय ३२ आणि ३०) दिल्लीत काम करतात आणि तिथेच राहतात. आणि नन्हीबाईंच्या असं कानावर आलंय की “तिथे इतकी वाईट स्थिती नाहीये. आता ते तर मोठं शहर आहे. पण हे आमचं गाव इतकं घाण का बरं असावं?”
इतका सगळा त्रास होत असूनही गावातली पुरुष मंडळी निदर्शनं करत होती तेव्हा नन्हीबाई काही घर सोडून तिथे गेल्या नाहीत. “बाया अशा घर सोडून बाहेर जात नाहीत,” त्या म्हणतात. “आणं तसंही आमची मागणी एकच आहेः नवा रस्ता.” त्यांच्याही कानावर आलं होतं की उप-जिल्हा दंडाधिकारी आल्या आणि निदर्शनं मागे घेण्यात आली. “रस्ता बांधून द्यायचं त्यांनी वचन दिलंय आणि कदाचित त्या तो पूर्णही करतील, कारण त्या दिसायला तरी प्रामाणिक वाटतात,” त्या म्हणतात. “आणि तरीसुद्धा हा त्रास असाच राहिला तर मग मी त्यांना पीडब्ल्यूडीला (सार्वजनिक बांधकाम विभाग) पत्र लिहायला सांगणार आहे. सगळ्या गावांमध्ये सुधारणा व्हायला लागल्यात, मग आमच्याच गावाचा विकास का बरं होऊ नये? आता तर वेळ आली तर मी पण रस्त्यावर उतरणार आहे...”
संध्या मात्र रस्त्यावर उतरण्याबद्दल साशंक आहे. “चांगल्या घरातली, मोठी माणसं तिथे अठाईत [चावडीवर] बसलेली असतात. आम्ही तिथून जात नाही.” राजबेती म्हणते, “तिथे जाण्यापासून आम्हाला कुणी थांबवेल असं काही नाही, पण आम्ही अजून तसा प्रयत्नच करून पाहिला नाहीये. आमची एकच माणगी आहे,” सुस्कारा टाकत ती म्हणते, “या धुळीपासून सुटका.”
ही निदर्शनं झाली ती होती २०१८ च्या डिसेंबरमधली एक रविवार सकाळ. रस्ता अजूनही पूर्ण झालेला नाही.
अनुवादः मेधा काळे