त्यांचं संगीत तयार होतं हातोडे, छिन्नी, पाने आणि इतर अवजारांमधून. आणि हा बॅण्ड कामाच्या मधल्या सुट्टीत नाही तर त्यांचं काम म्हणूनच त्यांची कला सादर करतो. त्यांचे श्रम आणि त्यांचं संगीत हातात हात घालून येतं. केरळ राज्यात ४४ नद्या आहेत आणि फार आधीपासून इथे जलवाहतूक सुरू आहे. मात्र आता रस्त्यांचं जाळं विस्तारत असल्याने आणि मोठ्या संख्येने तयार, यांत्रिक पद्धतीने बनवलेल्या बोटी उपलब्ध होऊ लागल्यामुळे होड्या बांधण्याच्या व्यवसायातल्या कामगारांची संख्या झपाट्याने खालावत चालली आहे. आता जे मोजके कारागीर राहिलेत ते अत्यंत निष्णात आहेत आणि त्यांनी आजही जुनं होत चाललेलं अगदी पुरातन म्हणावं असं कसब त्यांच्या अतुलनीय अशा अनुभवाच्या जोरावर जिवंत ठेवलंय. या चित्रफितीत ते आपल्याला त्यांची कहाणी सांगतायत.
अनुवादः मेधा काळे